Home | Magazine | Madhurima | health-care-bapat

तब्येतीची काळजी घ्या सुरुवातीपासून

डॉ. अंजली बापट, स्त्रीरोग तज्ञ | Update - Jun 04, 2011, 11:43 AM IST

स्वत:च्या आरोग्याकडे संपूर्ण दुर्लक्ष... सगळया स्त्रियांमध्ये आढळणारा एक समान गुण. गृहिणी स्वत: लक्ष देत नाही म्हटल्यावर घरातले इतरही तिची काळजी घेत नाहीत आणि मग इथूनच सुरू झालेले अनेक आजार उतारवयापर्यंत आपले पाय घट्ट रोवतात. त्यामुळे वेळीच टेक केअर ...

 • health-care-bapat

  प्रसूती म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच. परंतु, हे त्या निसर्गदेवतेला माहीत असल्यामुळेच प्रसूतीच्या वेदना सहन करण्याचे बळ निसर्ग तिला देतो.

  आज सकाळी सिझेरियन शस्त्रक्रिया करत होते. सर्व काही सुरळीत चालू होते. बाळ गर्भाशयाच्या बाहेर काढून बालरोगतज्ज्ञाकडे सोपवले आणि पुढचे काम सुरू केले. पाच-सात मिनिटांतच दरवाजाच्या बाहेरून जोरदार गलका कानावर पडला, मुलगा झाला, अहो, मुलगा झाला. नंतरच्या पाच दिवसांत पेढे, लाडू, शीतपेये, नातेवाइकांची रीघ आणि आनंदाचा जल्लोष. आणि माझ्या रुग्णाच्या चेह-यावर त्या गुंगीच्या स्थितीतही उमटलेले अत्यंत कृतकृत्यतेचे हास्य.
  याच्या अगदी उलट परिस्थिती मुलगी झाल्यावर बघायला मिळते. अक्षरश: सन्नाटा आणि अनेकांच्या चेह-यावर ओढून ताणून आणलेले कसनुसे हसू... जर ही मुलगी दुसरी किंवा तिसरी असेल तर मग बघायलाच नको... दुर्दैवाने हे चित्र आज आपल्या समाजातील बहुसंख्य वर्गात कमी-अधिक प्रमाणात दिसते. आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक स्तरांचा फारसा परिणाम पुत्रेच्छेवर होताना दिसत नाही.
  मुलींमधे असलेली ती गुणसूत्रीय समीकरणे तिला मुलाच्या गर्भापेक्षा जास्त काटक बनवतात. नवजात शिशूला जर काही आजार उत्पन्न झाला तर स्त्री गर्भ। बालक त्याला जास्त कणखरपणे तोंड देऊ शकते. याउलट ते बालक जर मुलगा असेल तर अशा शारीरिक लढाईत तो मरण पावण्याची शक्यता जास्त असते. हे एक वैज्ञानिक सत्य आहे.
  लहान मुलांची आणि मुलींची मानसिकता अगदी शिशुअवस्थेपासून भिन्न असते. स्त्री आणि पुरुषांच्या मेंदूच्या कार्यपद्धतीत विशेषत: भावनिक आणि वैचारिक स्तरावर वेगळेपणा असतो, वयाच्या साधारण सातव्या आठव्या वर्षापासून मुलीच्या शरीरांतर्गत झपाट्याने बदल व्हायला सुरुवात होते. मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी दोनतीन वर्षे आधी तिच्या शरीरातील संप्रेरकांचे हार्मोनचे प्रमाण बदलायला लागते. त्यामुळे स्तनांची थोडी वाढ होणे, केसांची वाढ होणे इत्यादी बाह्य लक्षणे दिसायला लागतात.त्याचबरोबर मनाची घडणही बदलायला लागते.
  शरीरातील अनेक ग्रंथी. झपाट्याने कार्यरत झालेल्या असतात. त्याचे बाह्य परिणाम तिच्या शरीरातील आमूलाग्र बदलात दिसून येतात. तिची मानसिकताही पूर्णत: बदलत असते आणि दिसामाजी हे बदल वाढत जाऊन हळूच एका मुग्ध कळीचे सुंदर फुलात रूपांतर होते...
  अशाच प्रकारे वयात येतानाच्या बदलांना मुलालाही सामोरे जावे लागते पण थोडे उशिरा. त्यानंतरचा म्हणजे 18- 19 वर्षांनंतरचा काळ त्यांच्यात फारसे बदल घडवत नाही. मुलीच्या जीवनात मात्र अशी शारीरिक, मानसिक व सामाजिक वादळे अनेक वेळा येतात.
  शिक्षण, लग्न आणि त्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे मातृत्व. मातृत्वाच्या अगदी पहिल्या तासातच म्ह्णजे गर्भधारणा झाल्यानंतर लगेचच पुन्हा एकदा स्त्रीच्या शरीराची फिजिऑलॉजी बदलायला सुरुवात होते. गर्भारपणाच्या नऊ महिन्यांत शरीरातील रक्ताभिसरण, श्वसन अशा प्रत्येक संस्थेवर अनेक परिणाम होतात.
  नऊ महिन्यांच्या गोड प्रतीक्षेनंतर येतो तो प्रसूतीचा अवघड क्षण. खरोखरच तो अनेक वेळा स्त्रीचा दुसरा जन्मच असतो. परंतु हे त्या निसर्गदेवतेला माहीत असल्यामुळेच हे सर्व बदल आणि प्रसूतीच्या वेदना सहन करण्याचे बळ निसर्ग तिला देतो. बाळाच्या पहिल्या स्पर्शानेच तिच्यातील आई जागी होते आणि प्रसूतीनंतरच्या दोन-तीन दिवसांतच ती आपल्या लहानग्याला पूर्ण स्तनपान देऊ शकते. मुलांच्या संगोपनात पूर्णपणे रममाण झालेल्या आजच्या युगातील स्त्रीला मातृत्वाबरोबरच आर्थिक आणि स्वताचा विकासही 25 ते 40 या वयात करायचा असतो. तिच्या आयुष्यातील ही वर्षे जणू तारेवरच्या कसरतीचीच असतात.
  आणि आता 40- 45 च्या आसपास पुन्हा एकदा तिला रजोनिवृत्तीच्या वादळाला तोंड द्यावे लागते. मासिक पाळीची अनियमितता, शरीरातील कमी होणारी हार्मोन्स, त्याचे हाडांवर व त्वचेवर होणारे परिणाम, तसेच मानसिक बदल खूपच झपाट्याने होतात. साधारण याच सुमारास तिच्या पिल्लांना पंख फुटतात व घरट्याबाहेरचे जग त्यांना खुणावत असते. त्यामुळे तिला ब-याचदा एकटेपणाला सामोरे जावे.. तर अशी ही आपली नायिका. आयुष्यातील अनेक वळणे सफाईने घेण्यासाठी ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ व सक्षम असणे आवश्यक आहे. जेव्हा ही स्त्री चहुअंगाने सबला बनेल तेव्हाच तिची ही साठा उत्तराची कहाणी सफळ संपूर्ण होईल.

Trending