आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केरळचे स्वास्थ्‍यवस्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहा! त्या सर्वतोसुपरिचित गोष्टीतल्यासारखे जर आपल्यास कळले की ‘सुखी माणसाचा सदरा’ खरोखरच मिळतोय तर? काय होईल नं? तो तयार करणा-यांकडे / विकणा-यांकडे / त्या दुकानांतून / मॉल्समधून काय झुंबड उडेल, नाही?
हाय! अजून आपलं नशीब एवढं फळफळलं नाही. वस्त्रांच्या दुनियेत औद्योगिक क्रांती झाली, मात्र अजूनही त्याचे फळ एवढे अमृतासम गोडीस नाही आले. हं, पण आपल्याकडे एक कली मात्र अशी विकसित झाली जिच्यामुळे असे वस्त्र तयार होऊ लागले जे (परिधान करणा-यास) ‘स्वास्थ्यसुख’ मिळवून देते!


हो, तुम्ही अगदी बरोबर वाचलेत. आता हे कसे काय?
आपण मागच्या लेखात पाहिले की आपल्याकडे कसे वस्त्रकलेत वैविध्य आढळते. साडी-सफरीत आपल्याला हेही लक्षात आले की विणणे, रंगवणे या मूलभूत प्रक्रियासुद्धा विविध प्रदेशांत विविध पद्धतीने केल्या जातात. प्रोसेसिंग तेच मात्र रंगवणं असो वा ब्लीचिंग वा फिनिशिंग घातक रासायनिक पदार्थ न वापरता केलं जातं, नैसर्गिकरीत्या तयार केलेल्या द्रवपदार्थांच्या साह्याने ही गोष्ट भारतभरात इतरत्रही होते. मात्र सर्व ठिकाणी ती ‘रंग’ आणण्यासाठी होते. येथे ‘रंग’ नसतोच- सर्व साम्राज्य आहे शुभ्रतेचं, वा मोतिया तेजाचं. रंगांचं प्रमाण अत्यल्प. मात्र या सर्व प्रोसेसिंगसाठी वनस्पतिजन्य वा नैसर्गिक द्रव्ये वापरली जातात व त्यातसुद्धा तुळस, कडुनिंब इ. आयुर्वेदातील प्रमाणित वनस्पती अर्क घातले जातात. बघा म्हणजे हे एक वेगळेपण. म्हणजे इतरत्र - स्वास्थ्य हे ‘बायप्रॉडक्ट’ आहे (सप्लिमेंटरी म्हणा हवे तर) मात्र येथे तेच ‘उद्देश्य’ आहे. अशा या वस्त्रांना त्यामुळे आयुर्वस्त्र असे नाव दिले गेले आहे. या आयुर्वस्त्रांनी इथल्या अर्थकारणालाही चांगले स्वास्थ्य आणले आहे. त्याच्या बाल्यावस्थेतच त्याने तब्बल 10 कोटींची उलाढाल केली व आता त्याच्या जन्मदात्यांची आकांक्षा त्यास 50 कोटींच्या घरात नेऊन बसवण्याची आहे! त्यासाठी केवळ देशभरातच नाही तर परदेशी-इटली, जर्मनी, मलेशिया, तैवान, सिंगापूर, जॉर्डन सर्वत्र याचा संचार आहे. माहेरघरी त्रावणकोरच्या राजमहाली सभासदत्व असून आता ते त्याने सौदीपर्यंत नेऊन ग्लोबल केले आहे - तब्बल एक लाख नग निर्यात करून! स्वत:बरोबर इतर रेशीम, ताग, लोकर, औषधी) बाजारपेठ खुली केली.
हे डायनॅमिक डिझायनर अपत्य जन्माला घालण्याचं त्याच्या जन्मदात्यांना सुचलं तरी कसं? कमालीच्या चतुराईनं, चिकाटीनं. विजयानंद व राजन यांनी आपले पूर्वज जे राजमहाली प्रमुख वैद्य होते, त्यांच्या आयुर्वेदाचे मंत्र आपल्या वस्त्रविश्वात विणले व कमालीच्या कलात्मकतेने वस्त्रोद्योगाला सुदृढता आणली. बलरामपूर, करलकोड, मुल्लोथ, कासावुकोड, हँटेक्स, हँडलूम वीव्हर्स डेव्हलपमेंट सोसायटी इ. येथे 6500 विणकर हा सर्व उद्योग सांभाळतात. हा डोलारा आज एवढा दिसतोय खरा, पण त्याची पायाभरणीही तेवढीच भक्कम असावी, खोल असावी! पार इतिहासकालीन. एका राजाने योजिलेले स्वप्न व त्याच्या तितक्याच कुशल मुख्यमंत्र्याने चोख वास्तवात उतरवलेले. राजेशाही दरबारी शोभेल असेच कृत्य होते. इ.स. 1798-1810च्या दरम्यान राजा बलरामवर्माने सर्वप्रथम हातमागावरच्या विणकामाचा परिचय लोकांना दिला. त्यानेच हेही ठरवले की, स्थानिक कृषिप्रधान प्रदेशाचे ‘उद्योगपट्ट्यात’ रूपांतर करावयाचे! झाले तर मुख्यमंत्री उम्मिनी थम्पी यांनी चंग बांधला. आपल्या राजाचा शब्द शिरसावंद्य मानला. आखणी केली. जुळणी करायला खास तामिळनाडूमधून सात निष्णात व पारंपरिक विणकर ‘शालियार’ कुटुंबं यासाठी बलरामपूरमध्ये स्थायिक केली. त्यामुळेदेखील या वस्त्रप्रकारास ‘बलरामपूर’ असेच नाव पडले आहे. मूळ पारंपरिक प्रकारात हे खास सुती व जरीकाठाचे असे - जरीचे बुट्टे, काड्या व पल्लू डिझाइनला मयूर व टेम्पल मोटिफ सहजच सामावले. स्त्रीपुरुष आबालवृद्धांसाठी हे आहे. नेसण्याची पद्धत वेगवेगळी व त्यामुळे कमालीची व्हर्सटॅलिटी त्यात पाहायला मिळते. मात्र हे स्टार्च केल्याशिवाय नेसायचे नसते बरे. नेसण्याच्या पद्धतीवरून वेगवेगळी नावेही आहेत व कॉम्बिनेशनही - पुरुषांचे असेल तर लुंगीसारखे - मुंडुम. स्त्रियांसाठी मात्र ब्लाऊज-पेटीकोट त्यावरून दोन भागांमध्ये परिधान करण्याचे असते. मुंडुम म्हणजे पेटीकोटवरून रॅप स्कर्ट वा लुंगीसारखे नेसायचे. त्याची जरीची बॉर्डर उभी, डाव्या मांडीवर व्यवस्थित यायला हवी व दुसरे (उत्तरीयासारखा भाग) तेथून खोचून आपण नेटका साडी-पदर घेतो त्याप्रमाणे मागून येऊन पुढून डाव्या खांद्यावरून मागे सोडला जातो. दिसायला साडीसारखेच दिसते यास हाफ सारी अथवा सेट सारी वा मुंडु सेट असेही संबोधतात. आता आपल्यासाठी हे नेहमीच्या पाचवार साडीसारखेही मिळते व ड्रेस मटेरियलसारखेही.


हिरव्याकंच, समृद्ध केरळमध्ये जिल्हास्तरीय, वार्षिक बोट शर्यत, ओणमसारख्या सोहळ्यांना विशेषकरून नेसले जाणारे हे वस्त्र प्रगल्भ, अभिजात, शालीन सौंदर्य, वैभव व सात्त्विकतेचे दर्शन घडवते. आपल्याकडच्या येत्या श्रावणमासी वा रमजान ईदच्या तितक्याच व तशाच सोवळ्या, सोहळ्यांमध्ये हे सुरेखच जमून येईल नं? शिवाय स्वातंत्र्य दिनानिमित्तही होईलच! अ‍ॅक्सेंट कलर्सचा क्रिएटिव्ह उपयोग केला तर उठावही आणता येईल.
राजा रविवर्मांच्या पेंटिंग्जची आठवण जागवणारे, प्राचीन बुद्ध-जैन संस्कृतीतील ‘अंतरीय + उत्तरीय’ या (साडी) सत्तिकेची सर्वात प्राचीन उत्तराधिकारी असणारी. तत्पूर्वीच्या कोरोमंडल-मेडिटरेनियन यातील व्यापार संस्कृती-परंपरेचे जागृत स्वरूप असणारीही बलरामपुरम अक्षरश : साता उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण आहे हेच खरे!