आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Health Story Of Dilip Kulkarni In Marathi, Niramay, Divya Marathi

आजारा अशी केली मात: अन् जीर्ण दम्यातून झाली सुटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: दिलीप त्र्यंबक कुलकर्णी)
दमा एकदा जडला की जडलाच. पुन्हा त्यातून मुक्ती नाही. शत्रूलाही हा रोग होऊ नये, अशी वाक्ये ज्या रोगाविषयी नेहमी उच्चारली जातात त्याच रोगाचा सामना मागील पंधरा वर्षांपासून मी करीत होतो. अगदी वयाच्या 59 व्या वर्षीही या चिवट रोगाने माझी पाठ सोडली नव्हती. मीच काय माझे कुटुंबही त्यामुळे प्रयत्नरत होतो कितीतरी अ‍ॅलोपॅथिक औषधे घेतली होती. तज्ज्ञ डॉक्टरांकडून अ‍ॅर्लेजिक टेस्ट ही केली होती. स्टेरॉईडयुक्त औषधेही घेऊन झाली होती. या औषधांमुळे तात्पुरता फरक पडायचा अन्, कालांतराने पुन्हा दम्याचा त्रास सुरू व्हायचा. मी खरोखरच हताश झालो होतो.

या हताश मन:स्थितीमध्ये असताना माझ्या नातेवाईक सौ. कुलकर्णी यांनी एवढे केले आहे तर आयुर्वेद उपचार करुन पाहायला काय हरकत आहे. असा सल्ला दिला व एका आयुर्वेदिक दवाखान्याची माहिती सांगितली. त्यानुसार मी डॉक्टरांची भेट घेतली. त्यांनी आयुर्वेद पध्दतीने माझ्या विकाराचे निदान करुन मला दिलासा दिला. प्रथम माझ्या दिनचर्येतल्या चुकांची जाणीव करुन देऊन त्यावर मात कशी करायची याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले व पंधरा दिवसांची औषधे दिली. या पंधरा दिवसातच मला उत्साह वाटू लागला.भूक छान लागू लागली. दम्याला थोडा उतार पडल्याचे जाणवू लागले अन् पुढे याच मार्गाने जाण्याचा मी मनोमन निर्धार केला.

या डॉक्टरांनी मला पंचकर्माची माहिती दिली आणि कफ व सर्दी हटविण्यासाठी वमन चिकित्सा सुरु केली. त्यानुसार शास्त्रोक्त पध्दतीने 5 दिवस सिध्दघृत चढत्या क्रमाने घेतले तसेच 3 दिवस स्वेदन (स्टिम बाथ) घेतले सहाव्या दिवशी मी वमनासाठी दवाखान्यात पोहोचलो. डॉक्टरांनी 5 - 6 ग्लास ज्येष्ठमध काढा पाजून अर्धा चमचा मदनफळ चाटण मधासोबत दिले. वमनामध्ये भरपूर कफ पडला आणि मला खूप हलके वाटू लागले. त्यानंतर तीन दिवस पातळ वरण-भात व पातळ मुगाची पेज एवढाच आहार डॉक्टरांनी मला घ्यायला लावला. तसेच वमनाच्या पाचव्या दिवसापासून चढत्या क्रमाने पिप्पळी रसायन औषधी 21 दिवस मला दिले. विशेष म्हणजे या सर्व चिकित्सेसाठी मला फार आर्थिक भार सोसावा लागल नाही.

आयुर्वेदिक पद्धतीने निदान होऊन इलाज सुरु व्हायला तीन वर्षे लोटली. आज माझा अ‍ॅलर्जिक दमा पूर्णपणे नाहीसा केला आहे. त्याशिवाय या चिकित्सेतून माझे वाढलेले वजनही भरपूर कमी झाले आहे. माझ्या जीवनातला आनंद मला परत मिळाला आहे. त्यासाठी डॉक्टर व त्यांचे सहकारी यांच्याविषयी माझ्या मनात कृतज्ञता आहेच, पण आयुर्वेदाची महती गाण्यासाठी माझ्याजवळ शब्द नाहीत.

अत्यंत कमी खर्चात रोगमुक्तीचे वरदान देणारी उपचार पध्दती म्हणजे आयुर्वेद हे मला मनोमन पटले आहे. ते सर्वांना कळाले पाहिजे या आंतरिक तळमळीतून माझा अनुभव मी
शब्दबद्ध केला आहे.