आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनरी आर्टर्री डिसीज; हृदयविकाराचा झटका येण्यामागचे प्रमुख कारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिला व हृदयरोगाचा प्रतिबंध
भारतातील प्रत्येक 4 पैकी एका महिलेचा मृत्यू हा हृदयरोगामुळे होतो. महिलांमध्ये आढळणार्‍या हृदयरोगाचे एक सर्वसाधारणपणे आढळणारे कारण म्हणजे हृदयाला रक्तपुरवठा करणारी प्रमुख रक्तवाहिनी आकुंचन पावून किंवा या रक्तवाहिनीमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे तिचे कार्य अनियमित होते आणि हृदयरोग उद्भवतो. याच आजाराला कोरोनरी आर्टर्री डिसीज (हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या प्रमुख रक्तवाहिनीसंबंधीचा आजार) असे म्हटले जाते. हा आजार हळुहळू वाढत जातो आणि अनेक रुग्णांना हृदयविकाराचा झटका येण्यामागचे प्रमुख कारण हा आजारच ठरतो.
पुरुषांपेक्षा महिलांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळणारे हृदयरोग असे आहेत : कोरोनरी मायक्रो व्हस्क्युलर डिसीज (एमव्हीडी)-हृदयातील लहान लहान रक्तवाहिन्यांच्या कार्यावर परिणाम करणारी समस्या
ब्रोकन हार्ट सिंड्रोम-प्रचंड प्रमाणात असलेल्या भावनिक ताणामुळे हृदयातील स्नायूंच्या कार्यामध्ये अल्पमुदतीसाठी परंतु तीव्र अडथळे निर्माण होतात.
वाढत्या वयानुसार महिलांमध्ये हृदयरोग निर्माण होण्याची शक्यता वाढत जाते. अर्थात तरीही सर्वच वयोगटातील महिलांनी हृदयरोग होणार नाही याची काळजी घेणे जरूरीचे आहे. यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून या आजाराचा प्रतिबंध करण्याच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलणे सर्वच महिलांना शक्य होऊ शकेल.
अ) कोरोनरी हार्ट डिसीज
सीएचडी - कोरोनरी हार्ट डिसीज या आजारामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांच्या आतील बाजूस अनावश्यक घटकांचे अडथळे निर्माण होतात. या रक्तवाहिन्यांमधून हृदयास ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा होत असतो. अशा प्रकारचे अडथळे रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होतात, तेव्हा त्या स्थितीस ऐथरोस्लेरोसिस असे म्हटले जाते.
रक्तवाहिनीतील हे अडथळे चरबी, कोलेस्टेरॉल, कॅल्शियम आणि रक्तात समाविष्ट असणार्‍या इतर घटकांमुळे तयार होतात. कालांतराने हा मळ घट्ट होतो किंवा पसरतो. मळ घट्ट झाल्यामुळे रक्तवाहिन्यांचा मार्ग अरुंद होतो आणि हृदयास होणारा ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठादेखील मंदावतो. साहजिकच याचा परिणाम म्हणून छातीत वेदना किंवा जळजळ सुरू होते, ज्याला अंजायना असे म्हणतात.
रक्तवाहिनीतील मळ पसरला तर त्यामुळे रक्तवाहिनीमध्ये गाठ तयार होते. अशा प्रकारची गाठ आकाराने मोठी असल्यास रक्तवाहिनीतून होणारा रक्तपुरवठा संपूर्णपणे थांबतो. हेच हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका येण्याचे एक सर्वसाधारण कारण आहे. कालांतराने रक्तवाहिनीमध्ये पसरलेला हा मळदेखील घट्ट होतो आणि त्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिनीचा मार्ग अरुंद होतो.
क्षतिग्रस्त स्नायू आणि खंडित रक्तवाहिनीचा समावेश असलेले हृदय : अंजायना आणि हार्ट अटॅकबरोबरच सीएचडीमुळे हृदयात इतरही अनेक प्रकारच्या गंभीर समस्या निर्माण होतात. यामुळे हृदयाचे कार्य बंद पडते, हृदयाचे ठोके अनियमित होतात ज्याला अरिहथमियास असे म्हणतात. तसेच हृदयरोगामुळे अचानक मृत्यूही संभवतो.
ब) कोरोनरी मायक्रो व्हस्क्युलर डिसीज
कोरोनरी मायक्रो व्हस्क्युलर डिसीज या आजारामुळे हृदयातील लहान लहान रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. या आजारास कार्डियाक सिंड्रोम एक्स किंवा नॉनऑब्स्ट्रक्टिव्ह सीएचडी असेही म्हटले जाते. कोरोनरी एमव्हीडीमध्ये हृदयातील लहान लहान रक्तवाहिन्यांच्या अंतर्गत बाजू क्षतिग्रस्त होतात. महिलांमध्ये कोरोनरी एमव्हीडी हा आजार होण्याची शक्यता पुरुषांपेक्षा अधिक असते. अनेक संशोधकांनी नोंदविलेल्या मतानुसार रजोनिवृत्तीच्या काळात इस्ट्रोजनमध्ये होणारी घट आणि हृदयरोगासाठी कारणीभूत ठरणार्‍या इतर धोकादायक कारणांमुळे कोरोनरी एमव्हीडी हा आजार होऊ शकतो.
हृदयरोगामुळे मृत्यू ओढवण्याचे प्रमाण मागील 30 वर्षांत कमी झालेले असले, तरी पुरुषांइतके महिलांमध्ये हे प्रमाण कमी झालेले नाही. यामागेही कोरोनरी एमव्हीडी हा आजारच कारणीभूत असू शकतो.
क) ब्रोकन हार्ट सिंड्रोम
महिलांमध्ये ब्रोकन हार्ट सिंड्रोम हे लक्षण आढळण्याचे प्रमाणदेखील पुरुषांपेक्षा जास्त दिसते. अलीकडेच आढळलेल्या या समस्येमध्ये भावनिक ताण प्रचंड प्रमाणात वाढल्याने हृदयाच्या स्नायूंच्या कार्यामध्ये तीव्र (परंतु बहुतेकवेळेस अल्पमुदतीकरिता) अडथळे निर्माण होतात. ब्रोकन हार्ट सिंड्रोम या लक्षणास ताणामुळे निर्माण झालेली कार्डिओमायोपॅथी किंवा ताकोत्सुबो कार्डिओमायोपॅथी असेही म्हटले जाते.
ब्रोकन हार्ड सिंड्रोममध्ये हार्ट अटॅकप्रमाणेच लक्षणे दिसत असल्याने डॉक्टरांकडून या परिस्थितीचे हार्ट अटॅक असे चुकीचे निदान होऊ शकते. मात्र, हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांत अडथळे आढळल्याचा उल्लेख ब्रोकन हार्ट सिंड्रोमच्या संदर्भात दिसत नाही. तसेच या समस्येने ग्रस्त असलेले बहुतेक रुग्ण वेगाने आणि पूर्णपणे बरे झालेले आहेत.
ही समस्या निर्माण होण्यामागे काय कारणे असू शकतात आणि त्यांचे निदान व उपचार कसे करता येईल यासंबंधीचे संशोधनकार्य संशोधकांकडून नुकतेच सुरू होते आहे. अनेकदा, असे दिसून येते की ज्या रुग्णांमध्ये ब्रोकन हार्ट सिंड्रोमची समस्या दिसते त्यांची प्रकृती आधी निरोगी होती.
दृष्टिक्षेप
महिलांमध्ये पुरुषांपेक्षा 10 वर्षे उशिरा सीएचडीचा आजार झाल्याचे आढळते. मात्र, तरीही सीएचडी हे भारतीय महिलांच्या मृत्यूचे प्रमुख कारण आहे. याविषयीची चांगली बातमी किंवा बाजू ही आहे की सीएचडीसाठी कारणीभूत ठरणारे धोके आपल्याला टाळता येऊ शकतात. सीएचडीसाठी कारणीभूत ठरणारे धोके म्हणजे अशी परिस्थिती किंवा सवयी ज्यांमुळे सीएचडी आणि हार्ट अटॅकची शक्यता वाढू शकते. आधीच अस्तित्वाच असलेला सीएचडी आजार बळावण्याची शक्यताही या धोकादायक घटकांमुळे वाढते.
जीवनशैलीतील बदल, औषधे आणि वैद्यकीय किंवा शल्यचिकित्साविषयक प्रक्रियांमुळे महिलांमधील सीएचडीची शक्यता कमी करण्यास मदत होऊ शकते. अशाप्रकारे, सीएचडीचा सुरुवातीच्या टप्प्यातील आणि निरंतर प्रतिबंध करणे खूप महत्त्वाचे आहे.
हृदयरोगासाठी कारणीभूत ठरतील असे धोकादायक घटक आणि त्यांचे नियंत्रण
उच्च रक्तदाब : उच्च रक्तदाबामुळे हृदयरोग, स्ट्रोक, हृदयाचे कार्य बंद पडणे आणि मूत्रपिंडाचे आजार अशा समस्या उद्भवू शकतात. अगदी उच्च रक्तदाब पूर्वस्थितीमुळेदेखील (80-89 च्या तुलनेत 020-139) हृदयरोगाची शक्यता वाढते.
रक्तातील कोलेस्टेरॉलचे उच्च प्रमाण : कोलेस्टेरॉल हे रक्तामध्ये लिपोप्रोटिन्सच्या स्वरूपात प्रवाहित होते. अ) लो डेन्सिटी लिपोप्रोटिन (एलडीएल) म्हणजेच कमी घनता असलेल्या लिपोप्रोटिनचे प्रमाण अतिरिक्त असल्यास रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होऊन पुढे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे त्याला वाईट कोलेस्टेरॉल असे म्हटले जाते. रक्तातील एलडीएलचे प्रमाण जितके अधिक तितकीच हृदयरोगाची शक्यता अधिक असते. (160 किंवा त्यापेक्षा अधिक एलडीएल हे अतिरिक्त प्रमाण मानले जाते. 100 पेक्षा कमी हे प्रमाण योग्य असते) ब) कोलेस्टेरॉलचा दुसरा प्रकार म्हणजे हाय डेन्सिटी किंवा उच्च घनतेचे लिपोप्रोटिन, ज्याला चांगले कोलेस्टेरॉल असेही म्हटले जाते. कारण एचडीएलमुळे रक्तातील कोलेस्टेरॉल हटविण्यास मदत होते.
अतिरिक्त वजन किंवा स्थूलता : जर तुमचे वजन गरजेपेक्षा जास्त असेल किंवा तुम्ही स्थूल असाल तर इतर कोणतेही धोकादायक घटक नसूनसुद्धा तुम्हाला हृदयरोग होण्याची शक्यता असते. अतिरिक्त वजनामुळे स्ट्रोक, कन्जेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, गॅलब्लॅडर डिसीज, मधुमेह, अर्थरायटिस आणि श्वसनाची समस्या, तसेच फुप्फुसाचा कर्करोग, मोठय़ा आतड्याचा कर्करोग व अन्य प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यताही वाढते.
शारीरिक चलनवलनाचा अभाव : नियमितपणे शारीरिक चलनवलन न झाल्यामुळे हृदयरोगाबरोबरच उच्च रक्तदाब, मधुमेह व स्थूलता यासारख्या इतर समस्या उद्भवण्याची शक्यताही वाढते. विशेषत: वयस्कर महिलांमध्ये शारीरिक चलनवलनाच्या अभावामुळे ऑस्टिओपोरोसिस हा आजार होण्याची शक्यता असते. या आजारामुळे हाडे मोडण्याचा धोका वाढतो.
मधुमेह : हृदयरोग, स्ट्रोक, मूत्रपिंडांचे कार्य बंद होणे आणि इतर अनेक आजारांकरिता मधुमेह हे महत्त्वाचे कारण आहे. प्रौढ व्यक्तींमध्ये सर्वसाधारणपणे टाइप टु या प्रकारचा मधुमेह अधिक प्रमाणात दिसून येतो. तुमचे वजन प्रमाणापेक्षा खूप अधिक असेल (विशेषत: पोटाभोवतीच्या भागात अधिक वजन असल्यास), शारीरिक हालचाल कमी असेल किंवा कुटुंबात पूर्र्वी कोणाला मधुमेह असेल तर तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता अधिक असते.

प्रत्यक्ष कृती (उपाययोजना)
या पाश्वर्भूमीवर तुम्ही आता प्रत्यक्ष प्रतिबंधात्मक कृती करण्यासाठी सज्ज आहात. संशोधनातून असे आढळलेले आहे की महिलांनी आपल्या जीवनशैलीमध्ये आरोग्यकारक बदल केले तर त्यांच्यामध्ये हृदयरोग होण्याचा धोका मोठय़ा प्रमाणात म्हणजे 82 टक्क्यांनी कमी होतो. अनेक उदाहरणांमध्ये आरोग्यकारक जीवनशैली अंतर्गत हृदयासाठी पोषक असा आहार, नियमितपणे शारीरिक व्यायाम, वजनावरील नियंत्रण आणि धूम्रपान न करणे यासारख्या गोष्टींचा समावेश दिसून येतो. काही महिलांना हृदयरोगासाठी कारणीभूत ठरणारे घटक नियंत्रित ठेवण्यासाठी औषधे घेण्याचीही गरज पडू शकते.
(लेखक हे एशियन हार्ट इन्स्टिट्यूटचे इन्टरव्हेन्शनल, मुंबई येथे कार्डिओलॉजिस्ट आहेत)