आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आक्रोश टिपणारी कविता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वसाधारणपणे कुणाही कवीची कविता गुणगुणता येत असते. मात्र, लोकनाथांची कविता गुणगुणता येत नाही. त्यांची कविता साध्या आणि सोप्या भाषेत समकालीन जीवनावर भाष्य करणारी आहे. म्हणूनच ती मनाला भिडते आणि विजेच्या गतीने विचार करण्यास भाग करते. आज भूमिका घेऊन लिहिणाऱ्या कवींना वाईट दिवस पाहावे लागत असताना संग्रहाच्या मुखपृष्ठावरील ‘मुखवटे’ शोषितांना प्रचंड शक्ती देऊन जातात. पहिल्याच ‘अक्रीत’ या कवितेत धर्मांची चिरफाड करण्यात आली आहे. या कवितेत विद्रोहाची भावना दिसून येते.
काय काय ऐकायला मिळते?
गजबच आहे
एक तथाकथित भाषा होती
भोपंजी तिला देवभाषा म्हणून वापरायचे
फेकलेल्यांनी ती ऐकली की,
कानात तप्त शिसे ओतायचे
बोलायचा प्रयत्न केला की, जीभच छाटायचे
अशी एक भाषा होती
तिला काही लोक सर्वश्रेष्ठ वगैरे म्हणायचे
आता ती शेवटचे आचके देताहे
आणि वंचित बांधव आतुरतेने तेरवीची वाट बघताहेत...
आज काळ झपाट्याने बदलला. एका वृक्षाची गोष्ट, बल्लारशहा, संभ्रम, भविष्य, न दिसलेले दु:ख, पर्सनल मुलाखत, मन्नत, गौडबंगाल, विश्वंभर पूर्णचंद्र चक्रपाणी यांना मानपत्र, सत्य घटनेवर आधारित पुरातन नाटक उन्माद यांसारख्या कवितांमधून मानवी मनाच्या संवेदना किती बोथट झाल्या आहेत, यावर उपरोधिक मारा लोकनाथ करताना दिसतात. ‘शेतमजूर’ या कवितेत शेतकऱ्यांना थेट आव्हान दिले आहे.
एकदाच मिळणाऱ्या जीवनावर करतो खूप प्रेम
आणतो अमलात कलंदराची व्याख्या
शेतकऱ्यांसारखी करत नाही मी आत्महत्या...
एकीकडे शेतकरी आत्महत्या करीत असताना शेतमजूर राब राब राबून जीवनावर कलंदरासारखे प्रेम करतो. या कवितेत शेतमजुरांच्या भावना अश्रू टिपण्यासारख्या आहेत. ‘बैठक’मध्ये मानवी धर्माचा विचार करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला पारंपरिक धर्माच्या चौकटीतून वाळीत टाकले जात असल्याचे दिसून येते. सिस्टम, दुनिया गोल आहे, सोन्याचा दात, स्पर्श, डॉग म्हणजे कुत्रा, पॉलिटिक्स, युद्ध असे सुरू होते..., आई कौसरबानूचे स्वप्न या कविता वाचकांचे लक्ष वेधून घेतात.

जगभरात वेगवेगळ्या विचारांचा ‘किस’ पाडला जातो. हजारो वर्षांपासून वैचारिक युद्ध सुरू आहे. मात्र, लोकांच्या मानसिकतेत कोणता बदल झाला? बुद्ध, मार्क्स, बाबासाहेब असो की एंगल्स, माओ; कुणी बंदुकीच्या गोळीची क्रांती सांगितली, तर कुणी शांती, अहिंसा सांगितली. जगातली कोणतीही सत्ता बंदुकीच्या बळावर चिरकाळ टिकून राहात नाही. हे माहीत असूनही अनेक जण हिंसेचा आधार घेतात. शांततेने तर जगालाही जिंकून घेता येतो. मात्र, किती गौडबंगाल आहे हे. सर काल आज तेच सांगत होते अन् उद्याही तेच सांगणार आहेत का? पण, माणसाच्या मूलभूत प्रश्नांचे काय? भांडवलशाही तर विजेच्या गतीने येत असताना धर्म मेंदूत कालवाकालव करीत आहे. जन्मापासून हेच सुरू आहे. भाषेचा फडशा पाडता अन् शब्दांना टोलविले जात असल्याचा प्रश्न लोकनाथांना पडतो. तोच त्यांच्या ‘गौडबंगाल’ या कवितेत उमटतो.

जातींनी शेकडो वर्षांपासून माणसाला प्रमाणपत्र दिले आहे. दलितांना तर गावाच्या वेशीबाहेर ठेवले गेले, अन् हजारो वर्षांपासून त्यांच्या आयुष्याला पेटविण्यात आले. मात्र, कवीला प्रश्न पडतो. तूप वितळवण्यासाठी वस्त्या जाळल्या; पण असे का केले? सर्वांना वंचित करून ठेवले. माणसाला माणूस म्हणून तर जगू द्या. संतप्त भावनेचा प्रत्यय ‘प्रमाणपत्र’ या कवितेत दिसून येतो. आज नवी पिढी प्रश्न विचारतेय. तुम्हाला श्रेष्ठत्वाचे प्रमाणपत्र कुणी दिले? हा आगडोंब सातत्याने उसळतो आहे. मात्र, काही लोक सवालजवाब करण्यापूर्वीच इंग्लंड-अमेरिकेत पळाल्याचे कवी म्हणताहेत. आज दलितांची संस्कृतीच बदलली आहे अन् तथाकथित संस्कृतीला कवी झोडपून काढतो आहे.

उपरोधातून खरपूस समाचार घेण्याची ‘नरबळी’ कवितेतून डोकावणारी लोकनाथांची शैली वास्तवाची जाणीव करून देणारी आहे. माणूस हा जगताना मनाच्या शांतीसाठी सातत्याने संघर्ष करीत असतो. मात्र, समाजमन सुन्न करणाऱ्या घटना मनाची चिरफाड करतात, तेव्हा धर्म कुणासाठी? असा प्रश्न निर्माण होतो.

आईवर अनेकांनी कविता केल्या, कादंबऱ्या लिहिल्या. आईची महती अनादी काळापासून आदी काळापर्यंत कुणालाही नाकारता येत नाही. मात्र, कोण्या आईने जन्म घ्यावा अन् कोण्या आईने घेऊ नये... हा कवीने ‘जन्म आईचा’ कवितेद्वारे विचारलेला प्रश्न अचंबित करणारा आहे. कोणत्याही आईला वाटत नाही की, माझ्या पोटी राक्षसाने जन्म घ्यावा. बंदूक, अणूबॉम्ब, नरसंहार या शब्दांनी जगाला तर उद्ध्वस्त केले आहे. जपानमधील हिरोशिमा-नागासाकी किंवा आताचे इराक-सीरिया, अफगाणिस्तान कोण विसरले बरे. माणसामाणसांत भेद करणाऱ्या ‘दगडी’ बाळांना कुणाही आईने जन्मास घालू नये, अशी विनवणी कवी करतात. तर दुसरीकडे राईट बंधू, मार्कोनी, मायकल फॅरेडे, एडिसन यांच्या आईंनी अगणित वेळा जन्म घ्यावा. जगाला सुंदर करण्यासाठी येणाऱ्या अर्भकांना ‘विज्ञान युगा’च्या कवेत घ्यावे, असेही सुचवतात.
लोकनाथ यशवंत यांच्या कवितेत असलेला उपरोध, विसंगती एक प्रकारची ताकद घेऊन येते. त्यांची कविता एक वेळ विनोदी वाटते; मात्र वाचकांच्या मनात प्रश्नच प्रश्न निर्माण करून जाते. काट्याने काटा काढत व्यवस्थेचा चिमटा घेणारी अन् उपहासाने उपहासावर व्यंगाचा प्रहार करणारी, नव्या व्यवस्थेला नवा आयाम देणारी ही कविता आहे.

म्हणूनच प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ, लेखक जयंत नारळीकर म्हणतात, “लोकनाथजी, आपल्या दोन-तीन ओळींच्या हाकेत लाखो माणसांचा आक्रोश आहे.” हा संग्रह समुद्र पब्लिकेशनने प्रकाशित केला असून पाकिस्तानातील पेशावर येथील सैनिकी शाळेत दहशतवाद्यांनी बळी घेतलेल्या चिमुकल्यांना अर्पण करण्यात आला आहे. लोकनाथांची विश्वात्मक भावना त्यातून दिसून येते. एकूणच मराठी कवितेत ही कविता लोकांच्या संवेदनाहीन मानसिकतेवर प्रहार करणारी ठरते.
...बाकी सर्व ठीक आहे
- कवी : लोकनाथ यशवंत
- प्रकाशक : समुद्र पब्लिकेशन, नागपूर
- मूल्य : ~ १५०/-

hemaparas.barsagade82@gmail.com