आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञानाच्या जाळ्यात नात्यांची रस्सीखेच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुक, व्हॉट्सअॅपमुळे माणसांचं आभासी मित्रविश्व वाढत असतानाच नाती मात्र दुभंगत चालली आहेत. त्यामुळे सोशल वेबसाइटचा सुरक्षित आणि मर्यादित वापर कसा करायचा, हे आपणच ठरवायला हवे.

नाे करीसाठी परदेशात राहावे लागणार, म्हणून नितेशने व्हाॅट्सअॅप चॅटिंगसाठी नवीन सिमकार्ड घेतलं. बाेलायचंच असेल तर विशिष्ट नंबरवर काॅल करावा, असेही त्या नितेश आणि नयनाचं ठरलं. त्याप्रमाणे दाेघे रात्री व्हाॅट्सअॅपवर चॅट करायचे. एके दिवशी नितेशच्या इंटरनेटला अडथळा अाला. त्यामुळे रात्री त्याने नयनाला मेसेज करून माहिती दिली. दुसऱ्या दिवशीही समस्येचे निराकरण झाले नाही. पण त्याच वेळी नितेशच्याच माेबाइलवरून तिला ‘हाय’ असा मेसेज अाला. इंटरनेटचा प्राॅब्लेम मिटला असावा, म्हणून ती त्याच्याशी माेकळेपणाने चॅट करू लागली. अादल्या दिवशीच्या पार्टीचे फाेटाेही नयनाने त्याला शेअर केले. परंतु, समाेरून वेगळीच मागणी अाली. मला तुझी खूप गरज वाटतेय. तुझे विवस्त्र अवस्थेतील फाेटाे मला लगेच पाठव. नवऱ्याचा हा लडिवाळ अाग्रह बघून नयनानेही त्याला लगेचच व्हिडिअाे क्लिप काढून पाठवून दिली. सकाळी मात्र तिला संशय अाला की, लग्नाच्या पाच वर्षांत नवरा अापल्याशी अशा पद्धतीने कधी बाेलला नाही अाणि मागणीही केली नाही. तिने तातडीने नितेशला फाेन केला. तेव्हा लक्षात अालं की, नितेशच्या नंबरवरून काेणीतरी दुसराच मेसेज करत हाेता. एव्हाना तिची क्लिप त्याच्या माेबाइलमध्ये सेव्ह झाली हाेती. त्यामुळे ती प्रचंड घाबरली. पण नितेशने धीर देत तिला पाेलिस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला लावली. तेव्हा एका १९ वर्षांच्या युवकाला पकडण्यात अालं. त्याच्या माेबाइलमध्ये नयनासह अन्य महिलांच्या अश्लील क्लिप्स अाढळल्या. नवरा ज्या सिमकार्डचा वापर करत हाेता, त्या कंपनीने एक नंबर बंद झाल्यावर वर्षभरानंतर ताे दुसऱ्याला दिला. परंतु, या अाधीच्या व्यक्तीने याच नंबरवर व्हाॅट्सअॅप अॅक्टिव्हेट ठेवलं हाेतं. त्यामुळे ताे व्हाॅट‌्सअॅपसाठी जुनाच नंबर वापरत हाेता. त्यातून हे कांड झाल्याचं उघडकीस अालं. नितेश समंजस नसता तर दोघांचा संसार उलथून पडायला वेळ लागला नसता. पण बहुतांश प्रकरणांत असं होत नाही. नातं फुलण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होत असला तरी त्याचा वापर करताना पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळे अनेक नात्यांत वितुष्ट येत असल्याचं चित्र आहे. राज्यभरातील महिला साह्य कक्षांमध्ये येणाऱ्या तक्रारींमध्ये चॅटिंगमुळे नवरा-बायकाेत निर्माण झालेले गैरसमज, तंत्रज्ञानाच्या अपुऱ्या माहितीचा काेणीतरी उचललेला फायदा अाणि साेशल मीडिया हा वाईट कामासाठीच अाहे, असा समज करून त्याचा केला जाणारा गैरउपयाेग या तीन बाबी प्रामुख्याने समस्या निर्मितीचं कारण असल्याचं पुढे अालं अाहे.

एकीकडे तंत्रज्ञानाची पूर्ण माहिती नसल्याने ग्रामीण तसेच निमशहरी भागातील महिला फसवणुकीच्या जाळ्यात ओढल्या जात आहेत, तर तंत्रज्ञानाचा कोपरा न् कोपरा माहिती असलेल्या उच्चशिक्षितांमध्येही यामुळे नाती दुरावत आहेत.

राज आणि नीतू दाेघेही अायटी क्षेत्रातील. साखरपुड्यानंतर लग्न काही दिवसांवर येऊन ठेपल्यावर त्याने अचानकपणे लग्नाला नकार दिला. कारण काय तर म्हणे, गेल्या पाच दिवसांपासून ती रात्री दाेन-तीन वाजेपर्यंत अाॅनलाइन हाेती. परंतु, हे करताना त्याने मुलीची बाजू िवचारातच घेतली नाही. ऐन वेळी नकार अाल्यानं मुलीच्या घरचे चिडले. पाेलिस स्टेशनमध्ये तक्रार केली. मुलीची चुलत बहीण परदेशात राहात हाेती. लग्नाची राेजची तयारी अाणि पुढचं नियाेजन कसं असावं, याची चर्चा त्या दाेघी रात्री व्हाॅट्सअॅपवर करत. ही बाब जेव्हा मुलीने पुराव्यासह दाखविली, तेव्हा मुलाने माफी मागून लग्नाला तयारी दर्शविली.

अन्य एका केसमध्ये रात्रीच्या वेळी बायकाे झाेपी गेल्यावर नवरा तिच्या माेबाइलवरून तिच्या मैत्रिणींशी व्हाॅट्सअॅप चॅट करायचा. नंतर ते चॅट डिलिट करत असे. मैत्रिणींना वाटायचे, तीच चॅट करतेय. हळूहळू चॅटींग अश्लील संदेशांकडे वळले. एका मैत्रिणीने अापल्या नवऱ्याला हे संदेश वाचायला दिले. त्या वेळी हसू येण्याएेवजी ताे कमालीचा चिडला. एखादी स्त्री असे संदेश पाठवूच कसे शकते अाणि पाठवत असेल तर तिच्या मनात काहीतरी काळंबेरं असेल, असंही त्याने सांगितलं. दुसऱ्या दिवशी मैत्रिणीनं फाेन करून असे संदेश का पाठविले, याचा जाब विचारला. त्यानंतर अन्य काही मैत्रिणींच्याही अशाच तक्रारी अाल्या. त्यामुळे व्यथित हाेऊन बायकाेनं नवऱ्याला याविषयी विचारणा केली, तर नवऱ्याने तिला मारझाेड करायला सुरुवात केली. प्रकरण पाेलिसात गेलं. सायबर सेलने नवऱ्याच्या या विकृत कृतींचा पुराव्यानिशी शाेध घेतला. अाज दाेघांचा घटस्फाेट हाेण्याच्या मार्गावर अाहे.

जग जवळ आणणाऱ्या माध्यमांचा वापर चांगल्या कामासाठीच हाेणं अपेक्षित अाहे. पण त्यात काही विघातक शक्तींनी प्रवेश केल्याने महिलांनीही सावध व्हायला हवं.
hemant.bhosale@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...