आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कावीळ आणि आहार योजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अचानक लघवी, डोळे, त्वचेच्या रंगात आलेलं पिवळेपण, अन्नावर इच्छा कमी होणे, मळमळ, उलट्या किंवा जेवल्यानंतर पोट जड होऊन दुखणे, ही प्राथमिक लक्षणे दिसताच कावीळ तर नाही ? अशी शंका येते. पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने सगळीकडे पाणी नक्की कोणते पिले जाते, याकडे अनास्था आहेच. शिवाय उघड्यावरचे पदार्थ, अस्वच्छ आणि गचाळ ठिकाणी बनलेले अन्न तसेच माशा, थुंकी, लघवी आणि विष्ठेच्या मार्गानेही काविळीच्या विषाणूंचे संक्रमण होते. बहुतेक वेळा पावसाळ्यात फ्लू, मलेरिया बरोबरच काविळीची साथच येते. तसेच या नेहमीच्या मेडिकल पॅयोफिजिओलॉजीपेक्षा अलीकडे पाहण्यात आलेल्या यकृताच्या बिघाडामध्ये खूप वेळ उपाशी राहाणे किंवा जास्तच उपवास करणे, सोशल स्टेट्सच्या नावाखाली अल्कोहलचे अतिसेवन करणे, या सगळ्याच घटकातून हळूहळू लिव्हरची कार्यप्रणाली कमजोर होते आणि त्यातच विषाणूंचे संक्रमण जलद होते. तेव्हा अशा वेळी डाएट मॅनेजमेंटने बर्‍यापैकी कावीळ किंवा लिव्हरचा कोणताही प्राथमिक आजार नियंत्रित होऊ शकतो. किंबहुना काही वेळा आहार योजनेनेच असे रोग बरे होऊ शकतात.

हिपॅटिक सेल्सवर विपरीत परिणाम
कावीळच्या विषाणूंच्या संक्रमणामुळे मुख्यत: लिव्हरमध्ये असणार्‍या हिपॅटिक सेल्सवर विपरीत परिणाम होतो आणि अन्नातील प्रथिने व स्निग्ध पदार्थांचे (फॅट्स) पचन व्यवस्थित न होता विलीरुबीन आणि बिलीवर्डीन या लिव्हरच्या संप्रेरकांच्या स्रवणावर परिणाम होतो अन् तेच लघवीत पिवळेपण आणते. अशा वेळी काही रक्त लघवी तपासण्याबरोबरच शरीरावरील चरबीचा स्कीनफोल्ड टेस्ट आणि मसल स्ट्रेंग्ध टेस्टनेही निदान होते. मुख्यत: शारीरिक विश्रांतीबरोबरच हाय कॅलरी डाएट ज्यामध्ये हाय ग्लायसेमीक इंडेक्स असणारी तृणधान्य, सालीसहित दाळी, काही प्रमाणात दही-ताक यातून मिल्क प्रोटिन्स आणि विटॅमिन्सच्या कमतरतेसाठी पूरक म्हणून भरपूर भाज्या, फळांचे रस, उसाचा रस, मध अशा प्रकारे आहार योजना आवश्यक.

ताजे, गरम अन् फिके अन्न
यात प्राणीज प्रथिने (अ‍ॅनिमल प्रोटीन) प्राणीज फॅटस यावर नियंत्रण आणून दिवसभरात 5-6 वेळा छोट्या जेवणातून कॅलरी रिक्वायरमेंट पूर्ण केली जाते. ज्वारी, नाचणी, राजगिरा, ओट्स या तृणधान्याबरोबर मुगदाळ, ताक, अशी पचायला हलकी असणारी प्रथिने देणे हितकारक ठरते. मसाले, मिरची, तेलबिया, तूप, तेल मांसाहार यावर पूर्णत: नियंत्रण ठेवून ताजे, गरम अन् फिके अन्न याबरोबरच उसाचा रस, मध किंवा काकवी यातून मिळणार्‍या विटॅमिन बी-कॉम्प्लेक्स, विटॅमिन ए, सी आणि के यांच्या उपचारातून लिव्हरची संप्रेरके पूर्ववत कार्य करू लागतात. नियंत्रित आहाराने हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो. उकळलेले पाणी, कवच असलेली फळे अन् शक्यतो उकडलेल्या- शिजवलेल्या भाज्या हा या रोगातील प्रतिबंधात्मक आहार होय. लिव्हरचे कार्य सुरळीत राहिले तर पुढे कोलेस्टेरॉल, डायबेटीस, स्थूलता अन् अशा घातक मेटाबोलिक आजारांवर प्रतिबंध करता येऊ शकतो, पण याही पुढे जाऊन कावीळ होण्याची वाट न पाहता जी मधुमेही, स्थूल किंवा पचनाच्या गंभीर समस्या असणारी व्यक्ती असेल तर त्यांनी वेळीच लिव्हरची काळजी घेणे आवश्यक आहे, अन्यथा नेक्रोसिस किंवा लिव्हर सिरॉसिससारख्या घातक, जीव घेणे आजार चोर पावलांनी कधी आक्रमण करतील अन् आपले आरोग्य उधळून लावतील याचा नेम नाही.