आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिलीपासून काय काय...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पहिलीपासून काय काय....
फार उड्या मारू नकोस
डोक्यावर कुणाच्या चढू नकोस...
चार पाय या चढण्याची
स्वप्नं उगीच पाहू नकोस
शाळा सगळ्या खासगी होतील
आणि सगळे क्लासेस सुद्धा
‘कॅपिटेशन’ भरण्याची
कुवत तुझ्यात येईल काय
इंग्रजी येतं म्हणून आपली जागा
कुणी तुला देईल काय
तुझी जागा तिथेच रस्त्यावरती
शेवटी भीकच तुला मागायची हाय
हं... नीट हात वळव बोटं
अरे अशी मूठ नाही
फक्त ओंजळ
म्हण... ‘वन रूपी प्लीज मॅडम’
आता कसं ब्येस
नक्कीच तुला वाटतं की नाय
पहिलीपासून काय काय
कशात काय अन् फाटक्यातच पाय
पुढे जावून तुला
जनात बाबा जगायचं हाय
त्या दायमाला तुला कुणी
‘कंची शाळा’ विचारणार नाय
आत्तापासून तुला म्हणून
एकदम ‘सबळ’करणार हाय
तेव्हा शिकून घे आताच
पहिलीपासून काय काय
शेवटी बघ अर्थव्यवस्था
‘मुक्त’ एकदम होणार हाय
‘शेती’जाऊन उद्योग एकदम
भरभराटीला येणार हाय
पहिलीपासून शेअर बाजार
अभ्यासक्रमात टाकायचा काय
शेवटी जग हे असचं असणार
गुंड मवाली त्यांचंच फावणार
आपल्यासारख्या सामान्य माणसांनी
अशावेळी करायचं काय
रस्त्यावरती अतिरेकी वगैरे
समोर उभा ठाकेल काय
पहिलीपासून एके 47
अभ्यासक्रमात टाकायची काय
आणि मुली तुझं काय...
शेवटी पोळीच लाटायचं हाय
गडबड बिलकुल चालणार नाही
काय.. पेन्सिलचा हात धडवळत नाय
नाही तरी नाय
पहिलीपासून पोळ्या लाटणे
अभ्यासक्रमात टाकायचं काय
आता जगात यापुढे
संगणकाशिवाय चालायचं नाय
खोक्यासारखं दिसत पण
ते यंत्र लई भारी हाय
कुणाला माहीत
आहार निद्रा भय मैथुन
ते स्वत:च करणार काय
आत्तापासून आपण आपलं
इंग्रजी शिकून तयार काय
पहिलीपासून इंग्रजी
त्यासाठीच अभ्यासक्रमात टाकलं हाय..
(ही कविता कवी विनय कुलकर्णी, पुणे यांची आहे.)

पहिलीपासून इंग्रजी सुरू झाली. त्यावेळी खूप चर्चा वाद होऊन गेले. पण कवी याकडे एक वेगळ्याच नजरेने बघतो आहे. ‘शिक्षण म्हणजे भावी जीवनाची तयारी’ असे म्हटल्यामुळे भावी जीवनात जे जे आवश्यक आहे ते ते पहिलीपासून मुलांना शिकवा अशी आपली पालकांची शासनाची शिक्षणतज्ज्ञांची मागणी असते. या मानसिकतेची खिल्ली उडविणारी ही कविता आहे पण केवळ खिल्ली उडवूनच ही कविता थांबत नाहीतर आजच्या वेगाने बदलत जाणार्‍या अर्थव्यवस्थेत आज आपण मुलांना जे बालपणी शिकवायचा अट्टहास धरतो आहोत त्याचा खरचं पुढच्या काळात उपयोग होणार आहे का आणि उच्चशिक्षणही केवळ धनवंतांची मक्तेदारी असताना आजच्या खेड्यातल्या गरीब मुलांना इंग्रजीच्या आधारे आपण जी ग्लोबल स्वप्ने दाखवत आहोत ती खरंच प्रत्यक्षात येणार आहेत का असा अस्वस्थ करणारा प्रश्नही कविता विचारते. म्हणूनच वरवर विनोदी वाटणारी वरवर मिश्कील, नकारार्थी वाटणारी ही कविता शिक्षणाचा हेतू, शिक्षणाचे अर्थकारण, जागतिकीकरण, शिक्षणाचा जीवनाशी तुटलेला सांधा, आपला भाबडेपणा अशा कितीतरी विषयांना स्पर्श करते.
हसवता हसवता अंतर्मुख करते हेच या कवितेचे सामर्थ्य आहे. जीवनातील क्लिष्टता आणि शिक्षणाचा बाळबोधपणा हे समांतर रूळ यावरून ही कविता धावते.
(herambrk@rediffmail.com)