आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Heramb Kulkarni About Education Poem, Divya Education

कविता शिक्षणाची: पोरांचा खेळ...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान विचारतात
तुला कोणता खेळ येतो
पोरगं सांगतं मला फक्त धावता येतं
यावरची पंतप्रधानांची प्रतिक्रिया
पेपरात छापून नाही आली
फक्त जीपमध्ये पाळी केली आदिवासी पोराची
एवढ्यानेच त्यांची प्रतिमा म्हणे खूप उजळ झाली...
धावणं पोराच्या रक्तात आहे आणि लादलेल्या नशिबात
पोराचा आजही धावायचा संध्याकाळच्या उदरभरणासाठी
सशाच्या मागे तिरकमठा घेऊन दिवसभर यज्ञकर्म समजून
लंगोटी जाईपर्यंत घामाने भिजून
पोराचा बापही धावधाव धावायचा जंगलात
जमीनदाराच्या वावरातील गहू
कापून आणल्याचा आरोप त्याच्यावर असल्याने
पोलिस मागे लागते म्हणून
पोराची आईही धावत धावायची
तिच्या बेवारस छातीवर गोर्‍यांपासून काळ्यांपर्यंत
सार्‍यांची नजर असायची म्हणून आता
पोरगं फक्त धावतयं... ज्याला ते खेळ समजतंय
त्याच्या भाबड्या बोलानं ते एक दिवसापुरतं
तमाम वर्तमानपत्रात अमर झालयं
काय हो पण त्याचं नाव कुठं छापून आलयं
अहो नावात काय आहे त्याला ना नाव ना गाव
ना काम ना धाम त्याच्या आयुष्यात
आरामच आराम मनसोक्त धावावे थकावे
थकल्यावर झोपावे जागल्यावर पुन्हा धावावे
त्याचे नागरिक म्हणून कर्तव्य एवढेच की
चाळीस वर्षांनंतर पुन्हा पंतप्रधानांची जीप येईल
तेव्हा पोराच्या पोराने पुन्हा
याच खेळाचे नावं सांगावे....
- नारायण कुलकर्णी कवठेकर ( हे प्रसिद्ध कवी आहेत)

शाळांमध्ये खेळाला प्रोत्साहन दिले जाते. समाजात शासनात खेळाला प्रोत्साहन देण्याची चर्चा होते. ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक का मिळत नाही याचेही परिसंवाद होतात, पण कवी याच धावण्याचे रूपक असे काही उलगडून दाखवितो की प्रस्थापित व्यवस्थेलाही धावण्याची कविता वाचता-वाचता थेट पळताभुई थोडी होते... कवीने अगदी बातमी वजा घटनेचे रूपक घेऊनआदिवासी मुलाची संपूर्ण कर्मकहाणी उलगडली आहे. ज्या धावण्याला आम्ही व्यायाम जॉगिंग असे शब्द देऊन प्रतिष्ठा दिली... ज्या धावण्याला आम्ही खेळात राष्ट्रीय अस्मितेचा विषय बनविला. ज्या धावण्याच्या मॅरेथॉन स्पर्धेला आम्ही सामाजिक कार्याचे मोठेपण दिले... पी. टी. उषाच्या पदकानंतर गेली 2 दशके तरी धावणे म्हणजे ऑलिम्पिक राष्ट्रीय अस्मिता असे समीकरण आम्ही केले त्या देशात हा आदिवासी मुलगा आणि त्याच्यामागच्या पिढ्या शतकानुशतके धावतच आहेत, पण ते धावताहेत ऑलिम्पिकसाठी नाहीतर प्रत्यक्षात जगण्यासाठी. ते धावताहेत स्वत:च्या अब्रूसाठी जगण्याचा बचाव करण्यासाठी...
तेव्हा धावण्यातला भारत आणि इंडिया स्पष्ट करणारी ही कविता आहे... आम्ही कॅलरी जळण्यासाठी धावतो आणि आदिवासी पोटाची आग विझवायला धावतो आहे.
ही कविता शैक्षणिक या अर्थाने आहे की खेळ हा शब्द आपण किती सहजपणे उच्चारतो... जेव्हा आदिवासींचा विषय निघतो तेव्हा आम्ही लगेच म्हणतो की आदिवासी धावण्यात नेमबाजीत तरबेज असतात त्यांच्यासाठी क्रीडाप्रबोधिनी उभारा आणि तशी मागणी करून आदिवासी मुलांना करिअर उपलब्ध केल्याचे समाधान आम्ही मिळवतो. आमच्यासारखे लोकशिक्षणावर लिहिताना आदिवासी मुलांमधील या क्षमतांना पुढे न्यायला हवे असे म्हणत राहतो, परंतु या क्षमता त्यांच्यात कशा विकसित झाल्या याची काळी कहाणी ही कविता सांगते... त्यांच्यातल्या आज देशाला ऑलिम्पिक मेडल मिळवून देण्याच्या क्षमता हे व्यवस्थेने केलेल्या शोषणातून आले आहे, याचा अर्थ या मुलांना खेळाडू करू नये, असे नाही पण आम्ही केवळ या मुलांना प्रोत्साहन दिले की काम संपले असे सोपे उत्तर शोधतो. आदिवासींना शिकारीसाठी पोटात काहीतरी टाकण्यासाठी शेतात घुसण्याची वेळच येणार नाही, असे चांगले जीवनमान आपण देऊ शकू का...महिलांना अब्रू वाचविण्यासाठी पळावे लागणार नाही, अशी सुरक्षा देऊ शकू का... हे करणार असू तरच त्यांच्या मुलांच्या खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उदात्तीकरणात अर्थ आहे.
(herambrk@rediffmail.com)