आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेहरू, गुलाब आणि माझा मुलगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकतीच आपण पंडित नेहरूंची १२५ वी जयंती साजरी केली . त्यामुळे या कवितेची आठवण झाली. ही कविता अगदी शेवटच्या ओळीपर्यंत असंबद्ध वाटते तर कधी विनोदी वाटते पण शेवट वाचला की लख्ख उजाडल्यासारखे वाटते. मुलांच्या पाठीवरचे ओझे हा शिक्षण क्षेत्रात अनेक वर्षे चर्चेतला विषय आहे . आर. के. नारायण राज्यसभा सदस्य असताना त्यांनी हा विषय एकदा राज्यसभेत मांडला होता . त्यानंतर सरकारने यशपाल समिती नेमली. तिचा अहवाल आला आणि त्यानंतर काहीच झाले नाही . सरकारी कार्यालयाला फक्त त्या अहवालाचे ओझे फक्त झाले ....!
या कवितेत कवी हे ओझे कमी झाले पाहिजे हे तर ज्याला आम्ही ज्ञान म्हणतो ते खरंच इतक सारं मुलाच्या डोक्यात आम्ही का कोंबतो आहोत हा महत्त्वाचा प्रश्न ही कविता उपस्थित करते. एका जुन्या हिंदी चित्रपटात एक गाणे होते .. शिक्षक म्हणतात :‘‘ सिकंदर और पुरू की हुई थी लढाई ’’ त्यावर आळोखे पिळोखे देत तो मुलगा म्हणतो तो मै क्या करू ?” सारेजण हसतात . मला त्या मुलाचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आणि दिशादर्शक वाटतो की खरंच या लढायांचा आणि बारीकसारीक तपशिलांचा आज या मुलांच्या जगण्याशी तसा काय संबंध आहे? इतिहासाचे महत्त्व नक्कीच आहे, पण इतक्या लहानपणी इतके सारे कोंबण्याची खरंच गरज आहे? कोणताही नवा विषय आला की तो अभ्यासक्रमात आणण्याची घोषणा होते…खरंच जगण्यासाठी इतकी माहिती गरजेची आहे का? निसर्गात याच सृष्टीत पक्षी प्राणी किती अल्प ज्ञानावर आनंदाने जगतात मग आपल्याला खरंच इतके सारे माहीत व्हायला का हवे आहे ? लहान मुलाच्या निरागस भावविश्वात या जड माहितीला काहीच स्थान नसते. त्याला आवडते फक्त जिवंत आनंददायी असे काही. ते आपण त्याला देणार आहोत का?''त्याला फूल आवडेल मोरपीस आवडेल त्याला त्यामागचे रुक्ष पाने शिकवले जाणारे धडे आवडणार नाही. असे काही आम्ही त्याला देणार आहोत का ? मुलाला या शारीरिक ओझ्यापेक्षाही या लादलेल्या तथाकथित ज्ञानाचा जास्त तिरस्कार वाटतो कवीला नेहरूंच्या मुलांविषयीच्या प्रेमाची आठवण येते आणि तो त्यांच्या प्रेमालाच साकड घालतो आणि ओझं हटविण्याची याचना करतो .
राष्ट्राचा कणा असलेला माझा मुलगा
शाळेसाठी सज्ज आहे,
त्याच्या कोवळ्या पाठीवर
विश्वाचं ओझं घेऊन !
त्याच्या उसवलेल्या दप्तरात
कधीचा गुदमरतोय
जगज्जेता नेपोलियन
अन्
छिद्रातून थेंब थेंब झिरपतोय
न्यूटनचा पहिला नियम
वर्गमूळ काढताना झालेल्या
आकड्यांच्या लढाईत
जखमी होतोय
झाशीचा लंगडा घोडा
अन्
शेक्सपियर्सचा ऑथेल्लो
पानापानावर गातोय
कबीराचा एक एक दोहा
कोपरा फाटलेल्या पानावर
खिन्नपणे हसताहेत
गांधी, नेहरूंचे मुखडे
अन्
खाउच्या डब्यात
कडक होताहेत
शिळ्या पोळीचे तुकडे
पण एक सांगू ?
नेहरूंच्या छातीवरचा गुलाब सुकण्याआधी
माझ्या मुलाच्या पाठीवरचं ते ओझं
कुणीतरी उतरवून ठेवायला हवं !
- प्रशांत असनारे


(herambrk@rediffmail.com)