आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविता शिक्षणाची:एका शिक्षकाची कैफियत...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिक्षकांकडून समाज ज्या आदर्श समाज निर्मितीच्या अपेक्षा करतो त्याला उत्तर देणारी कैफियत मांडणारी ही कविता आहे. समाजाला असे वाटते की, समाज कितीही बिघडला तरीही शाळा या आदर्शच असल्या पाहिजेत. तिथून बाहेर येणारी मुले ही आदर्शच. थोडक्यात, शाळांना आम्ही बेटासारखे समजतो. समुद्र जरी कितीही उधाणला तरी पाणी मात्र बेटावर जायला नको...हे कसे शक्य आहे. समाजात जर इतका अनाचार, असंवेदनशीलता फैलावताना मुलांचे कुटुंबीय हे समाजाचेच घटक असताना मुले समाजाच्या या अनिष्ट प्रभावातून वेगळी कशी राहू शकतील... समाजात जर मूल 18 तास असेल तर मग 6 तास शाळा काय करेल, असा प्रश्न शिक्षक म्हणून कवीला पडतो आहे.
कवीचा संपूर्ण स्वर हा त्रागा वाटू शकेल, पण ती त्याची घुसमट आहे. समाज लादत असलेल्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबलेला तो त्याचा हुंकार आहे. एक प्रकारची अगतिकता वाटेल, पण तो कवीचा प्रांजळपणा आहे. या व्यवस्थेच्या भीषण दर्शनाने परिस्थिती हाताबाहेर जात असताना आपण फार काही करू शकणार नाही ही कवीची चडफड आहे आणि तरीही समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा देखावाही त्याला करायचा आहे. यातून त्याच्यातील दुभंगलेपण त्याला स्वत:लाच स्वत:विषयी अपराधी वाटायला लावते...
मुलांना तो शाळा सुरू होताना हात जोडायला लावतो आणि त्याच वेळी शाळा सुटताना त्यांना गृहपाठ करायला लावतो. पण दोन्ही गोष्टींतून काहीच घडत नाही. ही केवळ कर्मकांडं आहेत अशीच त्याची खात्री पटली आहे.... समाजातल्या बदलत्या स्थित्यंतरात मात्र आपण त्याच साचेबद्ध अपेक्षा मुलांबाबत शाळांवर लादल्या जाताहेत. मुलं बंड करतील. मुलं विद्रोह करतील आणि त्यासाठी जबाबदार मात्र शाळांनाच धरलं जाईल ही भीतीही कवीच्या मनात आहे. तेव्हा मुलांच्या वर्तनाचे विश्लेषण कवी देश जगाच्या पार्श्वभूमीवर करतो आहे. मुलांच्या भावविश्वाशी जुळेल असे शिक्षणात काहीच उरले नाही याकडेही कवी लक्ष वेधतो.
एकूणच कवितेला निराशावादी म्हणणे सोपे असले तरी जी परिस्थिती आपण निर्माण करून ठेवली आहे त्याबाबत कवीचे युक्तिवाद नाकारणे कठीण आहे. शाळांकडून समाज जर अपेक्षा करणार असेल तर समाजाने किमान मुले शांत मनाने शिकू शकतील असे सामाजिक वातावरण तयार करायला हवे तर आणि तरच शाळा प्रभावी काम करू शकतील. हे जर होणार नसेल तर कवी प्रांजळपणे जे म्हणतो आहे ते समाजाला ऐकून घ्यावेच लागेल...
खरं सांगतो
मुलं गृहपाठ करत नाहीत
यात माझा काहीच दोष नाही
या शतकाचा कोरा करकरीत कागद
त्यांच्या लेखणीला झिरपू देत नाही
मुलं प्रार्थनेच्या वेळी हात जोडत नाहीत
यात माझा दोष नाही
त्यांच्या श्रद्धेचे दिवे तेवत ठेवतील असे या देशाचे वर्तमान नाही...
मुलं भटकतात शहरभर
पाहतात...ऐकतात...हाताळतात...
वाचतात....टीव्ही कॉम्प्युटर...
यात माझा दोष नाही
या चार भिंतीत त्यांचा जीव रमत नाही
मुलं असंबद्ध....अवांतर बडबडतात...
काहीबाही शाळेच्या परिसरात
यात माझा दोष नाही
हे शहर...ही शाळा
त्यांच्या स्वीकार-नकारांशी जुळवून घेत नाही
अगदी खरं सांगतो
या मुलांनी ही शाळा...हे शहर...हा देश पेटवला
तरी माझा अजिबात दोष नाही
मी शिकवीन
ते त्यांनी आत्मसात करावं
अशी आज तरी त्यांच्याभोवती परिस्थिती नाही....
- अशोक कोतवाल
(हे जळगाव येथील प्रसिद्ध संवेदनशील कवी आहेत. स्वत: शिक्षक आहेत.)