आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविता शिक्षणाची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादी बाब अनेकदा सांगून झाली की त्यातले गांभीर्यही संपते, मात्र तरीही प्रश्न तितकाच गंभीर असतो. तेव्हा त्या प्रश्नाची मांडणी नव्या शैलीत करावी लागते. आज शिक्षण क्षेत्रात भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. अधिकारी, संस्था, शासन यांच्या व्यवहारात शिक्षकाचे शोषण होऊन दुकानदारी वाढली आहे आणि पर्यायाने शिक्षण क्षेत्राचे जे पावित्र्य कमी होते आहे, शिक्षक या भ्रष्ट व्यवस्थेत ज्या रीतीने भरडले जात आहेत त्या वास्तवाचा वेध कवी विश्वास वसेकर यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने घेतला आहे.
विनाअनुदानित धोरण महाराष्टÑात आले. त्यामुळे शिक्षणसम्राटांचे फावले. मेडिकल, इंजिनिअरिंगच्या डोनेशनवर निवडणुका लढवल्या जाऊ लागल्या. ‘मला आमदारकीचे तिकीट देऊ नका, परंतु एक इंजिनिअरिंग कॉलेज द्या’, असा विनोदही महाराष्टÑात प्रसिद्ध होता. याच धोरणाची लागण शालेय, महाविद्यालयीन शिक्षणाला झाली. तुकडी, वाढत्या तुकडीला परवानगी अनुदान या व्यवहारात लाखो रुपयांच्या उलाढाली सुरू झाल्या. पटपडताळणी दोन वर्षांपूर्वी झाली. या पटपडताळणीत 20 लाख विद्यार्थी बोगस निघाले. यात खरी भानगड या आर्थिक गैरव्यवहाराची होती. शिक्षण क्षेत्रातील प्रत्येक व्यवहाराला मोजले जाणारे पैसे यामुळे शिक्षण खात्याची प्रतिमा मलिन झाली आहे. शिक्षकांचे सरकारी कार्यालयाच्या बाहेर दीनवाणे चेहरे, खेटे घालणारे शिक्षक बघितले की यांच्याकडून आपण चांगल्या शिक्षणाची अपेक्षा कशी करणार, हा प्रश्न पडतो. नकळत त्यांच्यातला आदर्शवाद मारला जातो आणि ते व्यावहारिक आणि निराशावादी बनतात. नोकरी देताना त्या जागांचा होणारा लिलाव हाही क्लेशदायक आहे. यामुळे गुणवत्तेपेक्षा धनवत्ता महत्त्वाची ठरू लागली. साने गुरुजींच्या महाराष्ट्रात नाणे गुरुजींचे साम्राज्य निर्माण झाले. शिक्षणातून जे मूल्यसंस्कार पाझरले पाहिजेत ते त्यामुळे पाझरत नाहीत. हा एक महत्त्वाचा प्रश्न ही कविता पुढे आणते. त्याचबरोबर या कवितेने आणखी एक प्रश्न पुढे आणला आहे, तो प्रश्न शासनाच्या अशा अनुदानित-विनाअनुदानित धोरणांच्या बदलत्या भूमिकांचा फटका बसतो शिक्षकांच्या संसारांना. महाराष्टÑात आज कायम विनाअनुदानित शाळांची संख्या हजारांमध्ये मोजावी लागते. त्या शिक्षकांनी अनुदानाच्या आशेने 25 वर्षांपासून नोक-या धरल्या. आज 100 आंदोलने त्यांनी केली, पण नव्या अडचणी त्यांच्यापुढे आणल्या जातात. संस्थाचालक एक रुपया देत नाहीत. रोज स्वत:च्या खर्चाने नोकरीला जातात. वये वाढली आहेत. लग्न झालंय. अनेकांच्या मुली लग्नाला आल्यात, पण बापाचीच नोकरी अजून पक्की नाही. या विनाअनुदानित शाळांमधले अनेक शिक्षक रोजंदारीच्या कामावर जातात. अनेकांच्या घरात थोडीफार शेती आहे. ते शेतीत कष्ट करून फुकट शिकवायचे काम करतात. तेव्हा शासनाच्या लेखी कायम विनाअनुदानित -अनुदानित हे फक्त शब्द आहेत; पण या शब्दांनी अनेक शिक्षकांचे जगणे वेठीला धरले आहे आणि या अस्थिरतेत भ्रष्टाचाराचा जन्म होतो. आशा दाखवली जाते. संस्था अशी कामे करणारे सरकारी दलाल अधिकारी सारेच यांना नाडतात. हे सारे ज्यांच्या आयुष्यात होते ते मात्र होरपळून जातात.
हेच वास्तव कवीने उपहासाने मांडले आहे. उपहासातून कवी हसत हसत आपल्याला शिक्षकांची होणारी तगमग चडफड व्यक्त करतो. जेव्हा रडणे संपते तेव्हा उपहास बाहेर येतो. या प्रश्नावर खूप ओरडून झाले तेव्हा तीच वेदना उपहासातून वसेकरांनी मांडली आहे.
विनाअनुदानित
आठवीची
नवी तुकडी काढू म्हणून
संस्थाचालकांनी
पन्नास हजार घेऊन
मास्तरकी दिली
अन् एक जीवन सुरू झाले
संस्थाचालक तसे निस्पृह
पंचवीस हजार
प्रामाणिकपणे त्यांनी
नव्या तुकडीच्या प्रस्तावाला जोडून
दलालाकडे दिलेदेखील
हे कळताच लग्नाळू मुलीच्या
एका बापानं सोयरीक जमवली
आपल्या घरातली एक तुकडी
त्या घरात वर्ग केल्याबद्दल
एक लाख रुपये अनुदानही दिले
नैतिकदृष्ट्या मोकळा झाला बिचारा
पाहता पाहता वर्ष झालं
प्रस्तावाचा पाठपुरावा सुरूच होता
आता दोन तुकड्या हव्या होत्या
नैसर्गिक वाढीच्या
मास्तरांना दुसरी मुलगी झाली
त्याच दिवशी
नव्या तुकड्यांना मान्यता न देण्याचं
शासनाचं धोरणं सांगत
प्रस्ताव परत आला
एका दणक्यात दोन्ही लेकरं
विनाअनुदानित ठरली....
विश्वास वसेकर
(विश्वास वसेकर हे निवृत्त शिक्षक असून प्रसिद्ध कवी आहेत. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.)