आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णमूर्ती स्कूल कुठे आहेत...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जे. कृष्णमूर्तींची एकूणच शैक्षणिक मांडणी आजपर्यंतच्या अनेक लेखांतून बघितल्यावर कृष्णमूर्ती शाळांविषयी माहिती करून घेऊ. मुळातच या शाळा का सुरू केल्या इथपासून सुरूवात करू. कृष्णमूर्ती कोणतीही संस्था स्थापण्याविरुद्ध होते. त्यामुळे कृष्णमूर्ती फाउंडेशन जरी स्थापन झाले तरी ते त्यापासून अलिप्तच होते. मात्र आपल्या मांडणीच्या विपरीत काही होणार नाही किंवा कृष्णजींची व्यक्तिपूजा तिथे होणार नाही याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असे...
कृष्णमूर्ती फाउंडेशनने जेव्हा या शाळा स्थापन करायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी त्यात जरूर मार्गदर्शन केले, पण अलिप्तता कायम होती. मात्र त्या शाळा निसर्गरम्य परिसरात असाव्यात हा त्यांचा आग्रह होता. अशा जागा फाउंडेशनने जरूर शोधल्या. या शाळा स्थापनेचा इतिहास उपलब्ध आहे.
जवळपास 75 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या शाळांमध्ये सर्वात लोकप्रिय व बहुचर्चित शाळा ही ऋषी व्हॅली आहे.आंध्र प्रदेशातील या शाळेला सर्वात जास्त जगभरच्या लोकांनी भेट दिली असावी. अतिशय रम्य अशा डोंगरात ही शाळा वसली आहे. कृष्णमूर्तींचे जन्मगाव मदनपल्ली हे इथून जवळच आहे. त्यामुळेच ही शाळा या ठिकाणी वसविण्यात आली. विशेष म्हणजे या शाळेला जोडून असलेला ग्रामीण विकास प्रकल्प हा जगभर गाजतो आहे. या शाळेने जेव्हा आपला विकासाचा टप्पा पूर्ण केला तेव्हा या शाळेने परिसरातल्या गावांच्या विकासाचा कार्यक्रम हातात घेतला. शिक्षणात परिसरातील 10 वी शिकलेल्या मुलांनाच शिक्षक करण्यात आले. साधनसामग्रीअभावी बाहुलीनाट्य व विविध कार्ड्सद्वारे मुलांना शिकविण्याची पद्धती विकसित करण्यात आली. या शाळेत इयत्ता नाही. तितकी विशिष्ट कार्ड्स मुलांनी सोडवली की मुलांना त्या क्षमता प्राप्त झाल्या असे मानले जाते. मुले स्वयंअध्ययनातून शिकतात. बाहुलीनाट्य हे खास वैशिष्ट्य. हा प्रयोग युनिसेफने अभ्यासून भारतभर अनेक ठिकाणी गेली 30 वर्षे राबविला जात आहे. महाराष्ट्रात मुंबई महापालिकेसह अनेक ठिकाणी तो सध्या राबविला जात आहे. आरोग्यविषयक उपक्रमही या शाळेत आहेत.
या शाळेपाठोपाठ गाजलेली शाळा आहे ती वाराणसीची राजघाट बेझंट स्कूल. कृष्णजींच्या थिआॅसॉफिकलच्या दिवसातील आई अ‍ॅनी बेझंट यांचे नाव शाळेला दिले आहे. ही शाळा सारनाथच्या रस्त्यावर आहे. बुद्ध या रस्त्याने गेले होते. या पावलांवरच ही शाळा आहे. विशेष म्हणजे वर्गाच्या खिडक्यांमधून गंगा नदीचा प्रवाह दिसतो. हे किती रम्य दृश्य असते! या शाळेच्या व नंतरच्या ग्रामीण विकासाच्या उभारणीत महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसेनानी म्हणून परिचित असलेले अच्युतराव पटवर्धन यांचा सर्वात मोठा वाटा होता. अच्युतरावांचा शेवटही याच ठिकाणी झाला... बौद्ध भिक्खूंशी संवाद कृष्णजींनी इथेच केला.
चेन्नईची ‘द स्कूल’ ही शाळा प्रसिद्ध आहे. इयत्ताविरहित शिक्षण देण्याचा इथला प्रयोग महत्त्वाचा आहे. सर्व शाळांमध्ये एकूणच शिक्षणविषयक महत्त्वाचे प्रयत्न या शाळेत झाले. ही शाळा चेन्नईच्या मध्यभागात असूनही दाट झाडी आहे. ही शाळा निवासी नाही. वसंत विहार हे कृष्णमूर्ती फाउंडेशनचे मुख्य कार्यालयही चेन्नईतच आहे.
कृष्णमूर्तींची बंगळुरूमधील व्हॅली स्कूल शेकडो एकरांच्या जंगलात वसली आहे. बंगळुरू शहरात इतकी प्रचंड झाडी बघून आपण थक्क होतो. कलाविषयक खूप चांगले काम इथे झाले आहे. एकूणच या शाळेत विषय शिकविण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत. शाळेजवळच असलेले कृष्णमूर्ती अभ्यास केंद्र हे अत्यंत वेगळे आहे.
महाराष्ट्रात राजगुरुनगरजवळ भीमाशंकर रोडला वाडा या गावाजवळ सह्याद्री स्कूल आहे. उंचच उंच टेकडीजवळ ही सुंदर शाळा व खाली चासकमान धरणाचे अथांग पाणी, कडेला सह्याद्रीच्या रांगा अशा अत्यंत मनोहारी वातावरणात ही शाळा आहे. इथेही रम्य असे कृष्णमूर्ती अभ्यास केंद्र आहे. कृष्णजींच्या जन्मशताब्दी वर्षात 1995 साली या शाळेची स्थापना झाली.
भारताबाहेर ओहायो व बाकवुड पार्क इथेही दोन शाळा आहेत, तर मुंबईत एक बालशाळा आहे. कृष्णमूर्ती शाळांपासून प्रेरणा घेऊन देशात अनेक ठिकाणी अशा शाळा सुरू झाल्या आहेत... प्रत्येक शाळेत मला जाता आले. काही दिवस थांबून अभ्यास करता आला... माझ्यासाठी आयुष्याला वळण देणारे व रोमांचित करणारे दिवस आहेत ते....