आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिचय जे. कृष्‍णमूर्तींचा: ध्यान म्हणजे काय...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळांमध्ये प्रार्थना, परिपाठाच्या वेळी मुलांकडून प्रार्थना म्हणून घेतली जाते. त्यात काही मिनिटे डोळे मिटायला सांगितले जाते. विद्यार्थी त्यात काही ठिकाणी ओंकाराचा किंवा दुसरा कसलातरी जप करतात. काही ठिकाणी प्राणायाम केले जातात. काही ठिकाणी श्वासावर लक्ष ठेवायला शिकवतात. महाराष्‍ट्र सरकारने तर विपश्यनेचा प्रसार शाळांमधून होण्यासाठी आदेश काढून आनापानविधी मुलांनी करावा, असेही म्हटले आहे. विपश्यना ही साधना रूढ अर्थाने संप्रदायाशी नसल्याने व वैज्ञानिक पाया असल्याने त्याविषयीही आक्षेप नाही पण यातून शाळेतले शिक्षक, मुले यांना प्रश्न पडतो की मग ध्यान म्हणजे नेमके काय असते... हिंदी चित्रपट, धार्मिक मालिकांमधून आपण नेहमीच झाडाखाली बसलेले साधू ओंकार म्हणताना दाखवले जातात. तेव्हा जप करणे म्हणजे ध्यान करणे आहे का... ध्यान म्हणजे नेमके असते काय... त्याची गरज आहे का....
नेहमीप्रमाणेच कृष्णमूर्तींचे या विषयावरही वेगळे विचार आहेत. एका विशिष्ट वेळी, विशिष्ट जागी बसून विशिष्ट मंत्र, क्रिया याला कृष्णमूर्ती ध्यान म्हणायला तयार नाहीत. त्यांच्या नजरेत ध्यान आणि अध्यान असा फरक काही नाहीच. ते ध्यानाला रोजच्या सर्वसामान्य जगण्यापासून वेगळे काढायला तयार नाहीत.
ध्यानाविषयी ते म्हणतात, ‘आपण वस्तुत: कसे आहोत हे समजावून घेणे हेच खरे ध्यान होय. अन्यथा ते आत्मसंमोहन असते. आपल्या विचारांचा व कामनांचाच तो प्रक्षेप असतो. आपल्या अहंच्या संपूर्ण पार्श्वभूमीचे, सर्व पूर्वसंस्कारांचे आकलन होणे हीच ध्यानाची सुरुवात होय... मन जेव्हा शोध करण्याचे सोडून देते, आपल्या गरजा व वासना यांच्यामुळे उत्पन्न होणारा संघर्ष जेव्हा थांबून जातो, आकलन झाल्यामुळे मन जेव्हा शांत नि:शब्द होते तेव्हाच ते अरिमेय अमर्याद तेथे अवतरते....’
मला वाटते आपल्याला ध्यानाची ही व्याख्या धक्कादायक वाटू शकेल. पण वस्तुत: हेच खरे आहे. कृष्णमूर्तींना त्यांच्या आयुष्यात अनेक साधू-साधक भेटले. वर्षानुवर्षे ध्यान करूनही आपण बदललो नाही असे ते कृष्णजींना सांगत. त्यांच्या ‘जीवनभाष्ये’ या पुस्तकात असे अनेक संवाद दिले आहेत. त्यातून आपल्या लक्षात येते की मनाची रचना समजून घेऊन मन जेव्हा नि:शब्द होईल तेव्हाच ध्यानाची अनुभूती येईल. आपण केवळ एक तास ध्यान करून उरलेले 23 तास मानसिक संघर्षात असलो तर काहीच घडणार नाही. कृष्णमूर्ती पूर्ण 24 तास सजगतेने आपल्या प्रत्येक हालचालीकडे, मनातील विचार -भावना, अतृप्त इच्छा-वासना यांचे तटस्थ निरीक्षण करण्याला ध्यान म्हणतात हे लक्षात घ्यायला हवे. तसे केले नाहीतर एखादा जप करून किंवा यौगिक क्रिया करून मनाचे वरवरचे स्तर काही काळासाठी शांत होतील व शांतीही वाटेल पण पुन्हा आपण अशांत होऊ. तेव्हा केवळ वरवरचे मनाचे स्तर शांत करण्यापेक्षा मन नि:स्तब्ध होण्याचा कायमस्वरूपी मार्ग शोधायला हवा.
यासाठी कृष्णमूर्ती सांगत असलेला मार्ग हा साक्षीभाव किंवा निवडरहीत अवधान हा आहे. मनात येणा-या कोणत्याही भावनेचे मूल्यमापन न करता त्या भावनेचे तटस्थ अवलोकन करायला ते सांगतात. त्या भावनेच्या आहारीही जायचे नाही व त्या भावनेला दडपायचे नाही केवळ तटस्थ निरीक्षण करायचे. त्यातूनच मन नि:स्तब्ध होऊ शकते. तेच खरे ध्यान असते. प्रत्येक कृतीचे विचाराचे आकलन केले तरच मनाचे स्वरूप उलगडून मन नि:स्तब्ध होऊ शकेल.
मला याबाबत गौतम बुद्धांची एक गोष्ट आठवते. आनंद या त्यांच्या परमशिष्याने बुद्धाला मन शांत असण्याविषयी विचारले. एका तळ्याजवळून जाताना बैलगाड्या तळ्यातून जातात. सारे पाणी गढूळ होते. पुढे काही अंतर गेल्यावर बुद्ध आनंदला त्या तळ्यातून पाणी आणायला सांगतात. आनंद गढूळ पाण्यात उतरतो पाणी अधिकच गढूळ होते. शेवटी पुन्हा मागे फिरतो. बुद्ध पुन्हा काही वेळाने त्याच तळ्याजवळ पाठवतो. पाणी आता स्वच्छ होऊ लागते. कचरा हळूहळू खाली बसायला लागलेला असतो.... आनंद निरीक्षण करत राहतो. पाणी शांत स्वच्छ होते...बुद्धाचे सांगणे हे की, जेव्हा तू पाण्यात उतरला तेव्हा पाणी अधिकच गढूळ झाले पण जेव्हा काठावरून बघत राहिलास तेव्हा आपोआप पाणी शांत झाले. संदेश हाच की तटस्थपणे मनाच्या काठावर बसायचे पण तळापासूनच्या सर्व हालचाली बघत राहायचे... हेच खरे ध्यान... डोळे बंद करण्यापेक्षा ध्यानापेक्षा डोळे उघडे ठेवून जागरूकतेचे हे कृष्णमूर्ती ध्यान नक्कीच अवघड आहे...