आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिचय जे. कृष्‍णमूर्तींचा: कृष्णमूर्ती ओशोंनी माझ्यातील शिक्षकाला काय दिले...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज 11 डिसेंबर आचार्य रजनीश यांचा जन्मदिवस... रजनीशांचे नाव काढले तरी अनेक जण अंगावर पाल पडल्यासारखे दचकतात. त्यांची 650 पुस्तके व 10 हजार तासांची रेकॉर्डेड प्रवचने आहेत. पण यापैकी एकच पुस्तक माहीत असते आणि तेही वाचलेले नसते. माझ्यातील विकसित होणारा शिक्षक विकसित होण्यात ओशो आणि कृष्णमूर्तींनी मला खूप मदत केली आहे. ओशो आणि कृष्णमूर्ती आमच्या शिक्षकांपर्यंत नीट पोहोचले नाहीत. रजनीशांना शिक्षण हा सर्वात महत्त्वाचा विषय वाटतो. ते म्हणतात, आर्थिक-राजकीय-सामाजिक क्रांतीचे प्रयत्न फसले, आता फक्त शिक्षणातील क्रांतीच शिक्षणाला वाचवू शकेल. रजनीश आणि कृष्णमूर्ती यांचा मी एकत्र विचार करतो. याचे कारण असे की, रजनीश हे कृष्णमूर्तींचे भाष्यकार आहेत. रजनीशांना एकदा भारताच्या 5000 वर्षांच्या परंपरेतील 10 बुद्धपुरुष कोण, असे विचारले असता त्यांनी त्या 10 जणांच्या यादीत कृष्णमूर्तींचे सन्मानाने नाव घेतले. कृष्णमूर्ती अनेकांना समजायला कठीण वाटतात, पण रजनीशांनी कृष्णजींचीच सर्व सूत्रे घेऊन त्याचे विश्लेषण केले. एका अर्थाने कृष्णमूर्तींचे रजनीश हे भाष्यकार आहेत. साक्षीभावाच्या साधना हे कृष्णजींच्या निवडरहित अवधान डोळ्यासमोर ठेवूनच रचल्या आहेत.
मी जेव्हा माझ्या शिक्षकी जीवनाचा विचार करतो तेव्हा मला थोडेफार बदलायला कोणी भाग पाडले याचे उत्तर मला कृष्णमूर्ती आणि ओशो हेच द्यावे लागेल. वाचकांना कदाचित आश्चर्य वाटेल, पण कॉलेजला असताना मी पारंपरिक, धार्मिक होतो. आमच्या घरात कृष्णमूर्तींचे एक पुस्तक सापडले. त्यात ध्यानाच्या पारंपरिक पद्धतीतील दोष त्यांनी इतक्या थेटपणे मांडले होते की, जगण्याचा पायाच कुणीतरी काढून घेत आहे असे वाटले. मी भीतीने ते पुस्तक रद्दीत टाकून दिले.... पण काही वर्षांनी मला पुन्हा विचारांनी तिथेच यावे लागले. त्यांची 80 पुस्तके विकत घ्यावी लागली....हे कृष्णजींचे सामर्थ्य आहे.
माझ्यातील शिक्षकाला या दोघांनी काय दिले....नोकरीला लागलो तेव्हा मी खूप मारकुटा शिक्षक होतो. मुलांना मारताना कुठेतरी पिडनाचा आनंदही मिळायचा. मुले आपल्याला घाबरतात यातून अहंकार सुखावायचा. पण जसजसे कृष्णजी वाचत गेलो तेव्हा स्वत:च्या निरीक्षणातून माझ्यातील हुकूमशहा, अहंकार मला टोचू लागला. कृष्णजी म्हणायचे, बघा, तुमच्या वरिष्ठांपुढे तुम्ही किती लाचार असता आणि कनिष्ठांपुढे तुम्ही किती उद्धट असता. मी मुलांसमोर स्वत:ला तपासायचो तेव्हा लक्षात यायचे की, आपण आपल्या अहंकाराची पूर्ती मुलांकडून करतो आहे. आपल्यातला हिंसक पशू जागा होतो आहे. मी रोज डायरी लिहायला लागलो. स्वत:चे निरीक्षण त्यात लिहायचो. थोडा बदल होत गेला. रजनीशांमुळे मुलांना समपातळीवर वागवायची समज आली. महत्त्वाकांक्षा हे विष आहे हे रजनीशांनी त्यांच्या ‘शिक्षा मे क्रांती’ या पुस्तकात छान पटवून दिले. किशोरवयातल्या मुलामुलींच्या आकर्षणाकडे मी मोकळेपणाने रजनीशांमुळे बघायला शिकलो.
कृष्णमूर्तींचा एक महत्त्वाचा मुद्दा मला स्पर्श करून गेला की, शब्दांनी मुले बदलत नाहीत, तर तुमच्यातील तळमळ शांती मुलांमध्ये संक्रमित होत असते. यामुळे आपण तळमळीने काम केले तरच मुले बदलणार आहेत हे लक्षात घेऊन स्वत:साठी काम करण्याची प्रेरणा मिळाली. आपल्या व्यक्तिमत्त्वातून प्रेम पाझरले तरच मुले प्रेमळ बनणार आहेत हे ते सातत्याने सांगतात. निसर्गाची गोडी त्यांनी लावली. माझ्या विद्यार्थ्यांना रोज गृहपाठ केला का, यासारखेच आज सूर्यास्त कोणी कोणी पाहिला, हा प्रश्न मी विचारायला लागलो...
प्रत्यक्षात जेव्हा कृष्णजींच्या भारतातील सर्व शाळा बघायला गेलो तेव्हा अनेकदा डोळ्यात अश्रू आले. शिक्षक त्याचे काम इतक्या उत्कटतेने करू शकतो....आयआयटी सोडून शिक्षक झालेले बघितले. जीव ओतून काम करणारी ती माणसं...सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटात संगीताच्या तालावर असेंब्लीत डोलणारी मुले बघितल्यावर प्रेम आणि प्रेमाचे संक्रमण हेच शिक्षण वाटायला लागले. माझे व्यक्तिमत्त्व अतिशय मृदू, कोमल असणे किती गरजेचे आहे हे लक्षात आले. कोणतेही आदर्श लादण्यापेक्षा स्वत:कडे बघणे या त्यांच्या सूचनेमुळे मी आणि माझी मुले आदर्श सुविचार वगैरेंच्या कचाट्यातून सुटली...
मला मान्य आहे की, जे बौद्धिक पातळीवर समजले ते पूर्णत: आचरणात आले नाही, पण किमान रस्ता तर नक्कीच सापडला आहे....या दोघांप्रती ही कृतज्ञता कायमच वाटत राहील...