आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरितक्रांती...शिक्षणक्रांती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळा विद्यालयांच्या वावरात
मास्तर पेरत असतात
अक्षराचं बियाणं...
उगवून येणार्‍या पिकाची
फार काळजीपूर्वक
राखली जाते निगा...
खूप दिले जातात...
खतं....औषधं...
योजनांचं ठिबक...
पीक चांगलं वाढतं॥
कणसं धरतं
कापणीवर येतं...
मळणीयंत्रात घातल्यावर
दाणे नाही पोत्यात
भुसकट उडत राहतं शिवारभर...
तरी टीव्हीवर बातमी
नवी हरितक्रांती झाल्याची
शिक्षण गावागावात गेल्याची...
कवी- संदीप जगताप, नाशिक.
शिक्षणाची उपलब्धी नेमकी गेल्या 60 वर्षांत काय झाली याचे अचूक वर्णन करणारी ही कविता...ग्रामीण माणसांना समजेल असे शेतीचे प्रतीक घेऊन शिक्षणाची नेमकी उपलब्धी मांडली आहे. शिक्षण आज घराघरांत पोहोचल्याचा बकवास सर्वच स्तरावर होतो, पण शिक्षण तर सोडाच पण साधी साक्षरता तरी नीट साध्य झाली का... मुलं शाळेत आली म्हणजे खरचं ती शिकली का.. शिक्षणाने जी उद्दिष्टे समोर ठेवली होती ती तरी नीट साध्य झाली का.. हे सारेच वास्तव ही कविता अतिशय कलात्मकरीतीने शेतीच्या प्रतीकातून उपस्थित करते.

शिक्षणाचा विस्तार आणि शिक्षणाचा दर्जा या स्वतंत्र गोष्टी आहेत. शिक्षणाचा प्रसार करत अगदी आज 98 टक्के पोरांची नावे पटावर आली. पोरं हजर असतात की नाही हे 20 लाख गैरहजर पोरांच्या पटपडताळणीने दाखविले. पुन्हा जी पोरं शाळेत तरीही येतात त्यांना जे काही मिळते त्याला शिक्षण म्हणायचं का असाच प्रश्न कवी उपस्थित करतो. ‘प्रथम’ सारखी संस्था दरवर्षी जो अहवाल प्रसिद्ध करते त्यात किमान 50 टक्के मुलं पुस्तक वाचू शकत नाहीत आणि 70 टक्के मुलं गणित सोडवू शकत नाहीत. याचा अर्थ स्पष्ट आहे की, किमान साक्षरताही शाळांमधून आम्ही मुलांना देऊ शकलो नाही. महाविद्यालयातून पदवीधर झालेली मुलं आज नीट अर्जही लिहू शकत नाहीत. जागतिकीकरणात रोजगाराच्या संधी आहेत, पण त्या कुशल मनुष्यबळाला. शिक्षणाने आम्ही कुशल मनुष्यबळ निर्माण करू शकलो नाही. पदव्या हातात आहेत पण कौशल्य मात्र कोणतेच नाहीत, अशी अवस्था आहे. इतका प्रचंड खर्च शिक्षणावर झाला पण या अपयशाची जबाबदारी मात्र कोणावरच नाही.

पुन्हा शिक्षणाने जी अमूर्त उद्दिष्ट ठेवली होती त्याचे काय झाले. ज्या प्रमाणात शाळा-कॉलेज वाढत गेली त्या प्रमाणात समाजात हिंसाचार, अप्रामाणिकपणा, भ्र्रष्टाचार वाढतच गेला. याचा सहसंबंध कसा शोधायचा..समाजाची संवेदनशीलता वाढत्या शिक्षणाने कमीच होत गेली. जे जे शिकले ते ते आत्मकेंद्रित होत गेले. ज्या मागास समाजात शिक्षण वाढले त्या समाजातील शिकलेल्यांनी मागास बांधवांसाठी काम करण्याऐवजी पाठ फिरवली. शिक्षणानं माणसं अधिक कोत्या मनाची आत्मकेंद्रित का बनत गेली...

एकदा एका भटक्यांच्या पालावर टोपल्या विणणार्‍या कैकाडी कुटुंबाला मी मुलं शाळेत घाला म्हणून आग्रह धरत होतो. तेव्हा ती बाई म्हणाली की, भाऊ तुझ्यासारख्या शहाण्याचं ऐकून आमचं एक पोरगं शिकवलं. ते 12वी ला नापास झालं. आता घरीच बसलंय. आता त्याला टोपल्याही विणता येत नाहीत आणि कॉलेजातही जाता येत नाही. ते तुमच्याकडूनही हुकलं आणि आमच्याकडूनही हुकलं...संदीपच्या कवितेचीच भावना त्या अडाणी महिलेनं बोलून दाखवली... अशी कौशल्य नसलेली आणि मातीपासून तुटलेली मध्यमवर्गीय आत्मकेंद्रिततेने पछाडलेली एक अर्धवट पिढी आम्ही शिक्षणातून निर्माण करतो आहोत...

मात्र या वास्तवाचे कुणालाच घेणे नाही. राज्यकर्त्यांना, अधिकारीवर्गाला शिक्षण गावापर्यंत पोहोचलं..उद्दिष्ट पूर्ण झालं असंच वाटतंय... हरितक्रांती झाली तरी शेतकरी आत्महत्या करताहेत. तरीही हरितक्रांती झाल्याची आवई देत धान्याने कोठारं भरल्यामुळे राज्यकर्ते खुश आहेत. भूकबळी पडले तरी ते हरितक्रांतीच्या घोषणा देतात आणि शिक्षणाने जरी कोणतीच गुणवत्ता आली नाही तरी ते शिक्षणक्रांतीची घोषणा देतात...