आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उच्चरक्तदाबावर म्युझिक थेरपीसह आयुर्वेदिक उपचार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉक्टर, माझ्या ब्लडप्रेशरच्या गोळ्या बंद होतील का, हा प्रत्येक चिकित्सकाला हमखास विचारला जाणारा प्रश्न आहे. उच्चरक्तदाबाचे असंख्य रुग्ण आपणास आसपास दिसून येतात. पुरुषांमध्ये उच्चरक्तदाबाचे प्रमण स्त्रियांपेक्षा अधिक असते. तसेच वाढत्या वयानुसार उच्चरक्तदाब होण्याची शक्यतादेखील वाढत असते. आजकाल तरुणांमध्येसुद्धा रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे. उच्चरक्तदाबामुळे हृदय, रक्तवाहिन्या, किडनी, मेंदू या अवयवांशी संबंधित अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता असते. हृदयविकार आणि पक्षाघात यासारख्या गंभीर आजारांच्या मुळाशी अनेकदा उच्चरक्तदाब (वाढलेले ब्लडप्रेशर) हेच कारण आढळून येते. त्यामुळे उच्चरक्तदाबाच्या औषधी नियमित घेणे गरजेचे असते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ब्लडप्रेशरच्या गोळ्या बंद करू नयेत.

उच्चरक्तदाब म्हणजे काय?
> हृदयातून रक्तवाहिन्यांमार्फत रक्त सर्व शरीरात पोहोचवले जाते. रक्तवाहिन्यांच्या आतील भिंतीवर रक्ताचा पडणारा दाब म्हणजेच रक्तदाब (ब्लडप्रेशर) होय.
> स्वस्थ व्यक्तीचा रक्तदाब 120/80mmhg एवढा अपेक्षित आहे. रक्तदाब सातत्याने 140/90mmhg पेक्षा अधिक असल्यास उच्च्रक्तदाब वा हायपरटेन्शन संबोधतात.

लक्षणे
> उच्च् रक्तदाबाच्या बहुतांश रुग्णांना कुठलीही लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे या आजाराला Silent Killer असेही म्हटले जाते. त्यामुळे चाळिशीनंतर नियमित कालावधिनंतर रक्तदाब तपासणे गरजेचे असते.
> काही रुग्णांना मात्र रक्तदाब वाढल्यानंतर डोकेदुखी, चक्कर येणे, चालताना दम लागणे यासारखी लक्षणे जाणवतात. रक्तदाब अधिक वाढल्यास नाकातून रक्त येणे, दृष्टीमाद्यं ही लक्षण जाणवू शकतात.

पाळावयाची पथ्ये
> रक्तदाब असणार्‍यांनी मीठ कमीत कमी खावे.
> लोणचे, पापड, वेफर्स यासारखे मीठ अधिक असलेले पदार्थ टाळावेत.
> वजन अधिक असल्यास कमी करणे गरजेचे ठरते. विशेषत: पोटाचा घेर कमी करणे आवश्यक असते.
> सकाळी मोकळ्या हवेत 30 मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा.
> तळलेले, मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.
> रात्री जागरण करू नये. फळे व हिरव्या पालेभाज्या यांचा आहारात समावेश असावा.
> धूम्रपान, मद्यपान यासारख्या व्यसनांपासून दूर राहवे.
> अतिरिक्त तणावामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यत असते. त्यामुळे मेडिटेशन, ध्यान यांच्या साहाय्याने तणावावर नियंत्रण ठेवावे

आयुर्वेदिक उपचार
आयुर्वेदानुसार पित्त व वात दोषाच्या असंतुलनामुळे रक्तदाब वाढतो. आहार आणि जीवनशैलीमध्ये योग्य ते बदल करून रक्तदाब नियंत्रणाखाली आणता येतो. परंतु असे बदल करूनही रक्तदाब कमी होत नसेल तर मात्र औषधोपचार घ्यावे लागतात.
> ब्राह्मी, सर्पगंधा, जटामांसी, मगर, अश्वगंधा यासारख्या औषधी खूप उपयुक्त आहेत.
> तणावामुळे उच्च्रक्तदाब असल्यास ‘शिरोधारा’ केल्याने उत्तम परिणाम दिसून येतो.
> सर्वांग तैलधारा, विरेचन बस्ती ही पंचकर्मे रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
> अनुलोम-विलोम, भ्रामरी, ओंकार जप उपयुक्त.
म्युझिक थेरपी
> रक्तदाब कमी करण्यासाठी संगीताचाही उत्तम उपयोग होतो. विशेषत: भूपाळी, तोडी व अहिरभैरव हे राग ऐकल्याने रक्तदाब कमी होतो.
> योग्य आहार, व्यायाम व औषधोपचाराने उच्च्रक्तदाब नियंत्रित करता येतो. परंतु तज्ज्ञ वैद्यांच्या देखरेखीखाली वरील उपचार करावेत.

(drpareshd@gmail.com)