आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जटांना कात्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अस्वच्छतेमुळे केसांमध्ये तयार होणाऱ्या जटांकडे आजही अंधश्रद्धेच्या चष्म्यातूनच पाहिलं जातं. अगदी उच्चशिक्षित वर्गही याला अपवाद नाही. मात्र पुण्याच्या नंदिनी जाधव गेल्या पाच वर्षांपासून यामागची शास्त्रीय कारणं महिलांना, त्यांच्या कुटुंबियांना समजावून सांगतात. अनेक महिलांच्या जटा कापून नंदिनीताईंनी अनेकींना ‘जट येणं’ या प्रकारापासून मुक्ततेचा आनंद दिला आहे.
 
 
‘तु मच्या अंगात येत असेल नाही का?’
‘हो, पण तुम्हांला कसं कळलं.’
‘तुमच्या डोक्यावरच्या जटा पाहून. या जटांनी मानेवर ताण येत असेल की, डोकं पण जड होत असेल.’
‘काय करणार, पण देवीचा कौल आहे. एक दिवस न्हाणं करून आले आणि आरशात पाहिलं तर केसात जट. त्या दिवसानंतर अंगात पण यायला लागलं.’
‘डोक्यात जट कशी येते माहितीये का?’
‘काहीतरी पाप घडलं असेल म्हणून तर देवानं अशी शिक्षा दिली.’
‘देव कशाला शिक्षा देतोय? तुम्ही स्वच्छ न्हाला नाहीत. केस विंचरताना गुंता नीट काढला नाही. गुंत्यात केस अडकत गेले आणि या जटा झाल्यात. जटाचा आणि देव/देवीचा काही संबंध नसतो. उलट डोक्यावर घाण घेऊनच फिरताय.’
‘ओ बाई, काही पण बोलू नका. पुढच्या महिन्यातच गावाला जाऊन बोकड कापणार आहे. लाख रुपये जमवलेत. सगळं नीट होईल मग. तुम्ही नका शहाणपणा शिकवू. जटांना कात्री लागली तर माणूस मरतंय. तुम्ही सोडा माझा नाद.’
‘अहो, तुम्ही कर्ज काढून लाख रुपये घालवण्यापेक्षा मी फुकट कापून देते की जटा. काहीही होणार नाही. मी अशा २९ जणांच्या कापल्यात. कुणाचं काही वाईट झालं नाही. माझंसुद्धा. तुम्हालाच उलट बरं वाटेल.’
 
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव डोक्यांवर जटांचं ओझं वाहणाऱ्या बाईला समजावत होत्या. पण बाई ऐकेनाच. नंदिनीताईसुद्धा तिच्यापेक्षा हट्टी. त्या तिच्या घरी जाऊ लागल्या. सुखदु:खाच्या गप्पा मारू लागल्या. तिच्यासोबत जेवायला लागल्या. दोघींमध्ये विश्वासाचं नातं तयार झालं आणि सहा महिन्यांच्या अथक चिकाटीने शेवटी त्या बाईची आणि तिच्या नवऱ्याची जटा काढून टाकण्याची तयारी झाली. एकदाची तिच्या जटांना नंदिनीताईंची कात्री लागली आणि त्या बाईची मान, डोकं मोकळं झालं. तिचं, कुटुंबाचं काहीही वाईट झालं नाही. ‘जटमुक्त व्हा,’ असं बायांना सांगायला गेल्यावर नंदिनीताईंसाठी हा अनुभव आणि संवाद नेहमीचाच. पण त्याही चिकाटी सोडत नाहीत.  नंदिनी जाधव यांनी आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यातील अडतीस जणींना जटमुक्त केलं आहे. इतक्या जणींची जट काढून टाकणाऱ्या जाधव या महाराष्ट्रातील एकमेव कार्यकर्त्या आहेत. वेगवेगळ्या स्तरातील आणि वेगवेगळ्या गटातील मुली/बायकांना त्यांनी जटाच्या ओझ्यातून मुक्ती दिली आहे. ही मुक्ती नुसती डोक्यावरच्या जटांचीच नसते तर त्या सोबतीने येणाऱ्या अनेकविध अंधश्रद्धांतूनही बायका, त्यांचे कुटुंब आपसूकच बाहेर पडतात. ही किमया एका दिवसात घडत नाही. त्यासाठी सतत पाठपुरावा करावा लागतो, अपमान गिळावा लागतो आणि प्रसंगी आवाजही चढवावा लागतो. नंदिनीताई हे सगळं मन लावून करतात.
 
मध्यमवर्गीय सुखवस्तू घरातल्या नंदिनीताई मूळच्या मेकअप आर्टिस्ट. ब्युटिशियनचंही प्रशिक्षण त्यांनी घेतलंय. कॉलेजवयात त्या व्हॉलीबॉल, भालाफेक खेळायच्या. उंच, शिडशिडीत बांध्याच्या, ‘रॉयल एनफील्ड’ चालवणाऱ्या नंदिनी जाधव यांच्यावर खेळाडूपणाची छाप दिसतेच. त्यांना पहिल्यापासूनच समाजकार्याची आवड होती. स्त्री अभ्यास केंद्राच्या एका कार्यक्रमात डाॅ. नरेंद्र दाभोलकर आले होते. त्यांच्याशी बोलल्यानंतर त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत जोडल्या गेल्या. त्या सांगतात, अंनिसच्या माध्यमातून महिलांमध्ये जनजागृती करण्यासाठी तुमच्यासारखे कार्यकर्ते आवश्यक असतात असं त्यांनी बोलून दाखवलं होतं. त्यामुळे २०१२मध्ये मी अंनिसच्यासोबत काम करू लागले.
 
समितीसोबत काम करताना त्यांना महिलांचे प्रश्न अधिक जवळून कळू लागले. त्यांच्यात उपजत असणाऱ्या कार्यकर्तेपणाला दिशा मिळाली. आणि काहीच दिवसात त्यांच्याकडे जट निर्मूलनाचं पहिलं प्रकरण आलं. जाधव सांगतात, ‘आठ मार्च २०१३ रोजी पुण्यातल्या जनवाडी भागात हा प्रसंग घडला. तिथल्या १६ वर्षांच्या मुलीच्या डोक्यात जट दिसली होती. त्यामुळे कुटुंबीयांनी घाबरून तिला शाळेतून सोडवून घरी बसवलं होतं आणि ते तिला कर्नाटकातील सौंदत्ती देवीच्या मंदिरात नेऊन देवदासी होण्यासाठी सोडणार होते. त्या मुलीच्या मैत्रिणींनी ही माहिती अंनिसपर्यंत पोहोचवली. आम्ही लगेच तिच्या घरी पोहोचलो. सुरुवातीला तिच्या कुटुंबीयांनी आमच्या घराचा मामला आहे म्हणत हाकललं. पण आम्ही धीर सोडला नाही. दिवसभर बसून राहिलो, त्यांना जट कशी येते सांगू लागलो. देवीचा कोप होत नाही हे समजावलं, बराच काथ्याकूट केला. मी जटा कापणार आहे; त्यामुळे जो काही कोप व्हायचा तो माझ्यावर होईल, असं निर्वाणीचं सांगितलं. माध्यमांतही ही बातमी पसरली. दबाव निर्माण झाल्याने शेवटी ते तयार झाले. १६ वर्षांची मुलगी पुढच्या भयंकर प्रतापातून वाचली.’
 
 
मुली/बायांच्या डोक्यात जट आली की अनेकदा देवीला सोडून देण्याचे प्रकार घडतात. पुढे त्यांना देवदासी करून उपभोगलं जातं. काहींची परवड वेश्यावस्तीत होते. काही जणींना देवत्व देऊन सांसारिक जगण्यातून मुक्त केलं जातं. या जटा निर्माण कशा होतात, हा प्रश्न सतावत होता. त्यावर नंदिनीताई म्हणाल्या, ‘जटा बहुतेककरून मानेपासून यायला लागतात. तिथून नीट कंगव्याने विंचरलं जात नाही. अनेकदा केसांना तेल लावलं जात नाही. मग त्यात धूळ, माती किंवा कचरा जाऊन अडकतो. केस नीट विंचरले जात नाहीत तसे स्वच्छ धुतले जात नाहीत. साबण वा शॅम्पूने नीट न धुतल्याने केसातली घाण तशीच राहते आणि त्याचा गुंता तयार होत जातो. तो मानेवरच्या केसांमध्ये अडकल्याने वर चटकन दिसतही नाही. पुढे त्यात केस अडकत जातात आणि जट निर्माण झाली असं लोकांना वाटतं.’
 
 
‘एकदा तरुणीच्या केसात जटा झाल्या होत्या. खोदून विचारल्यावर कळालं की ती उडदाचे पापड करते. पापड लाटताना तिने कधीतरी मानेवरचे केस मागे सारले तेव्हा त्यात उडदाचं चिकट पीठ लागलं. असं सतत होत गेलं आणि जट झाली. थोडक्यात केसांची अस्वच्छता हा जटांना आमंत्रण देणारा प्रकार.’
 
 
काही बायकांचे पूर्ण केस जटयुक्त दिसतात. त्याचं उत्तरही अस्वच्छतेशी निगडित आहे. एकदा जट निर्माण झाली की बायकांना लाज वाटते आणि त्या ते लपवून ठेवण्यासाठी डोक्यावरून पदर घेतात. मग उर्वरित केसांमध्येही घाण साचायला लागते. आंघोळ केल्यानंतरही नीट न सुकवल्याने त्यातली घाण निघत नाही. केस नीट वाळत नाहीत. यातून एका जटेची लागण सगळ्या केसांना व्हायला लागते. ‘पाच किलोपासून  ११ किलोपर्यंतच्या जटा सोडवल्या आहेत. अनेकदा या जटांमध्ये अळ्या, उवा असतात. प्रचंड वास येत असतो. बायका अंधश्रद्धेपोटी त्या आपल्या डोक्यावर घेऊन वावरत असतात. जटा कापताना तर इतर कोणी थांबूही शकणार नाही इतकी घाण  येत असते. जटा कापल्यानंतर बायकांना खूप हलकं वाटतं, असं बायकाच आनंदाने सांगतात.’
 
 
जट झाली म्हणजे बाईने काहीतरी पाप केलंय असा विचार कुटुंबातूनच व्हायला लागतो. त्यामुळे तिला वाळीत टाकलं जातं. मग देवीचा कोप घालवण्यासाठी बोकड कापायची युक्ती बुवाबाबा त्यांना देतात. यासाठी अनेक जण कर्ज काढतात. जटेला घाबरून लोक अशा प्रकारच्या अंधश्रद्धांना बळी पडतात. हा प्रकार अशिक्षितांमध्येच नव्हे तर उच्चशिक्षितांमध्येही आढळत असल्याचे नंदिनीताई सांगतात. त्यांच्याकडे एक बँक मॅनेजर बायकोला घेऊन आला होता. तिच्या डोक्यात जट झाल्याने सात वर्षांपासून त्याने तिला स्पर्शही केला नव्हता. तो उच्चशिक्षित उच्चपदस्थ असूनही त्याला जट सोडवण्याविषयी शंका वाटत होती. नंदिनीताईंच्या समुपदेशनानंतर त्या बाईची जट सोडवण्यात आली!
 
 
जटनिर्मूलनाबाबत लोकांच्या मनात अंधश्रद्धांचं घर असल्याने अंनिसच्या वतीने एक अर्ज भरून घेतला जातो. ‘जट कशी येते, का येते असं सगळं नीट समजावून सांगितलेलं असतं. लोकांच्या मनातील शंका दूर होईपर्यंत आम्ही विवेकानं उत्तर देतो. ज्या बाईच्या डोक्यात जटा आहेत तिची आणि तिच्या कुटुंबियांची तयारी करून घेतो. त्यांची इच्छा आणि परवानगी असेल तरच आम्ही जटा सोडवतो. कोणावर कसलीही जबरदस्ती करत नाही. फक्त त्यांना विवेकाचा मार्ग सांगत राहतो. तयारी झाली की त्यांच्याकडून एक परवानगीचा अर्ज भरून घेतला जातो. नंतर कोणतीही अनिष्ट गोष्ट घडणार नसते परंतु कावळा बसायला आणि फांदी तुटायला एक वेळ झाली तर त्यांची रीतसर परवानगी आपल्याकडे हवी म्हणून आम्ही हा उपद्व्याप करतो. जट सोडवल्यानंतरही आम्ही त्यांच्याशी संपर्क ठेवतो. त्यांची विचारपूस करत राहतो.’
 
 
नंदिनीताईंनी पुणे शहर व जिल्ह्यातील तीस जणींना जटमुक्त केलं आहे. त्यांच्या कोणाच्याही घरात काही अनिष्ट घडलं नाही. उलट त्या बायका मोकळं जगू लागल्या आहेत. या सगळ्यात नंदिनीताईंना माध्यमांची मदतही तितकीच महत्त्वाची वाटते, कारण काही जणींनी वर्तमानपत्रातील बातम्या वाचून जट सोडवण्याचा निर्णय घेतला होता. एका रिक्षावाल्याच्या बायकोच्या जटा सोडवल्यानंतर त्याला यातील अंधश्रद्धेचा फोलपणा इतका पटला की, आता तो अशी कोणी बाई दिसली तर तिची नंदिनीताईंशी गाठ घालून देतो. हा सकारात्मक बदल दिसत आहे.
 
 
वडाचा चीक आणि जट
एका अंध मुलीच्या सावत्र आईने वडाचा चीक डोक्यात घालून मुलीला जट आलीये म्हणून कुटुंबात बोंब ठोकली होती. त्या मुलीने धाडस करून अंनिसकडे फोन केला होता. ती मुलगी लोणावळा परिसरातील होती. नंदिनीताईंनी तडक आपली बाइक काढून तिचं घर गाठलं पण सावत्र आई बधेना. तिच्या डोक्यात वरच्या बाजूला जट आल्याने त्यांना शंका आली आणि त्यांनी तिला चीक टाकून हा प्रकार केल्याचं सांगितलं. पण त्या वेळेस त्यांना त्या आईच्या कांगव्याने निघावं लागलं. त्या सतत फोन करून तिची विचारणा करू लागल्या. शेवटी वैतागून त्या आईनेच तिचे केस कापून प्रश्न सोडवला. काही वेळा असं चीक वापरून ही काहीजणं अंधश्रद्धेला खतपाणी घालतात.
 
-हिनाकौसर खान-पिंजार, पुणे
greenheena@gmail.com
बातम्या आणखी आहेत...