आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचर्‍याचे केले सोने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ना कुठला पुरस्कार ना जनजागृती फेऱ्या; पण स्वच्छ, शांत अन् सेंद्रिय शेतीने समृद्ध बनलेलं अकोल्यातलं हिवरखेड गाव. गावाला हे रूप प्राप्त करून देण्यात मोठा हात आहे गावच्या सूनबाई वर्षा बाजारे अन् त्यांच्या मैत्रिणींचा. त्यांच्या कामाचा हा प्रत्यक्ष आढावा.

दोन्ही बाजूंनी हिरवीगार शेतं, केळीच्या बागा आणि त्याच्या मधून जाणारा अरुंद रस्ता घेऊन जातो, कार्ला बुद्रुक या छोट्याशा गावात. जेमतेम अडीच हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावात प्रवेश केल्याबरोबर एका वेगळ्या दुनियेत आल्याचा भास होताे. विटांच्या पक्क्या घरांच्या मध्येच शेणाने सारवलेले टुमदार कौलारू घर डोकावते. गाव तसं फार विकसित झालेलं नसलं तरी गावात एक वेगळीच प्रसन्नता पसरलेली आहे. आदर्श ग्राम, स्वच्छ ग्राम असा कोणताही पुरस्कार गावाला मिळालेला नसला तरी गावातील महिलांच्या प्रयत्नांनी गाव खऱ्या अर्थाने स्वच्छ आहे. यासाठी कोणत्याही महिलेने हातात झाडू घेऊन गाव झाडून काढले नाही किंवा त्यासाठी जनजागृती रॅली काढली नाही, तर त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून गावातील कचऱ्यातून सोने निर्माण करून त्याचा फायदा शेतीला मिळवून दिला. मागील चार वर्षांपासून गावातील कचरा गावाच्या बाहेर गेला नाही, तर त्यातून बायोडायनॅमिक कम्पोस्ट तयार करून शेतात वापरले जात आहे. ही किमया एक दिवसात झालेली नाही. यासाठी गावातील महत्त्वाकांक्षी महिला वर्षा दिनकर बाजारे यांनी परिश्रम घेतलेले आहेत.

अकोला शहरापासून जवळपास ७५ किलोमीटर अंतरावरील कार्ला गाव. तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड गावावरून जवळपास ३ किलोमीटर आत वसलेलं. गावात सून म्हणून आलेल्या वर्षाताईंची गावासाठी काही तरी चांगले करण्याची धडपड. गावातील सर्व बाया एकत्र आल्या आणि त्यांनी काम केले तर गावाचे रूप पालटू शकते, ही शाश्वती असल्याने वर्षाताईंनी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आणले. वर्षाताईंचे बारावीपर्यंतच शिक्षण असले तरी त्यांनी गावातील महिलांना, शेतकऱ्यांना कमी खर्चाची शेती कशी करायची हे शिकवले आहे. स्वच्छ भारत अभियान देशात यंदा सुरू झाले; पण वर्षाताईंनी गावात ते चार वर्षांपूर्वी राबवायला सुरुवात केली. गावात चहुबाजूने कचऱ्याचे ढीग साचले असतील तर गावात येण्याची इच्छा होत नाही. शिवाय दुर्गंधी, अस्वच्छता असते व त्यातून रोगराई पसरते. पण याच कचऱ्याचे योग्य नियोजन केले, त्यात शेण टाकून थोडी कष्ट घेतले तर ते उत्तम खत तयार होते, हे वर्षाताईंनी सिद्ध करून दाखवले आहे. चारेक वर्षांपूर्वी गावात स्वर्ग विकास संस्थेचे काही पदाधिकारी आले आणि त्यांनी बायोडायनॅमिक निविष्ठा उत्पादन युनिट म्हणजे काय, त्याचे फायदे, ते कसे उभारायचे याबाबत माहिती दिली. वर्षाताईंनी त्याचे प्रशिक्षण घेऊन गावातील महिलाचे प्रबोधन केले. प्रारंभी झालेल्या विरोधाला न जुमानता वर्षाताईंनी हिमतीने, जिद्दीने काम सुरू ठेवले. त्याचे फलित म्हणजे आज गावात बायोडायनॅमिकचे जवळपास १०० बेड आणि एसनाइलचे (सीपीपी) जवळपास ७५ कुंड महिलांनी तयार केले आहेत. त्यांच्या या प्रयोगामुळे आज गावातील कचऱ्याचे उत्तम प्रतीच्या खतात रूपांतर झाले आहे.

गावात बहुतांशी बागायती शेती आहे. मात्र, त्यावर रासायनिक फवारणी, रासायनिक खतांचा वापर केल्याने उत्पादन कमी होत होते. २०११-१२मध्ये गावात संस्थेचे काही पदाधिकारी आले आणि त्यांनी सेंद्रिय शेती प्रत्येक शेतकरी घरीच करू शकतो हे समजावले. त्यासाठी फक्त एकदा प्रशिक्षण घेऊन शिकण्याची गरज होती. कोणताही शेतकरी यासाठी तयार झाला नाही. वर्षाताईंच्या घरी तीन एकर कोरडवाहू शेती. पती शेतीच करायचे; पण फार प्रयोग करायला तयार नव्हते. ताईंनी हिमतीने हे आव्हान स्वीकारले. त्याच वर्षी त्यांच्या पतीचे हृदयविकाराने निधन झाले. ४-५ महिने घरी बसून काढल;े पण तीन मुलींचा सांभाळ कसा करायचा हा प्रश्न समोर होताच. त्या परत एकदा जोमाने कामासाठी घराबाहेर पडल्या तर गावकऱ्यांनी टोमणे मारायला सुरुवात केली. नवरा मेला तरी बाईला अजून काम करायचा उरक आहेच, पुरुषांच्या डोक्यावरची बाई आहे असे एक ना अनेक टोमणे ताईंनी पचवले. गावकऱ्यांनी फक्त त्यांनाच नाही, तर त्यांच्या मुलींना उलटसुलट प्रश्न विचारून, त्यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन त्रासून सोडले. पण ताईंच्या पोरी ताईंसारख्याच हिमतीच्या. वडिलांचे निधन झाले त्या वेळी मोठी दीपाली सोळा, तर दुसरी कोमल १५ वर्षांची. या कोवळ्या वयातही त्यांनी आपल्या आईला प्रत्येक पावलावर साथ दिली. कोणी काहीही बोलले तरी आपली आई समाजासाठी, गावासाठी हिताचे काम करत आहे, याची खात्री पोरींना होती. उलट त्याच गावकऱ्यांना समजून सांगायच्या.

कृषी समृद्धी प्रकल्प अंतर्गत आज वर्षाताई अनेक जिल्ह्यातील गावांमध्ये प्रशिक्षण देत आहेत. त्यांनी त्यांच्या गावात ४० महिलांचा गट स्थापन करून महिलांची शेतीशाळा निर्माण केली आहे. ताईंची लहान मुलगी साक्षी त्यांच्या या कामात त्यांच्यासोबत असते. या शाळेच्या माध्यमातून आज या महिला गावात बायोडायनॅमिक कम्पोस्ट, बायोडायनॅमिक कल्चर तयार करतात, इतर महिलांना त्याचे प्रशिक्षण देतात, उताराच्या आडव्या पेरणीविषयी प्रशिक्षण देतात. शेतीविषयक जनजागृतीसोबतच त्या कमी खर्चाची शेती करतात. यातून गाव स्वच्छ झालेच, तर दुसरीकडे त्याच कचऱ्यातून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार होऊन त्याचा फायदा शेतीला झाला आहे. आज शेतीसाठी बाहेरून कोणत्याही प्रकारचे खत आणले जात नाही. यातून शेतीवर होणारा खर्चदेखील कमी झाला आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, वर्षाताई शेतकऱ्यांना असे देतात प्रशिक्षण?