आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hira Kulkarni Article About A Senior Citizen’s Lifestyle

बोनस आयुष्‍यातलं नियोजन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्री म्हणून जन्माला आल्यावर ती जन्मापासून शेवटपर्यंत अनेक नात्यांनी जोडली जाते. कन्या, बहीण, पत्नी, सून, काकू, आत्या, मावशी, मामी, सासू, आजी अशा अनेक नात्यांच्या धाग्यांतून तिचा जीवनपट विणला जातो. ही सगळी नाती निभावताना ती ज्येष्ठ वयोगटात येऊन उत्तररंग रंगवू लागते.


मीसुद्धा आता सासू, आजी या भूमिका पार पाडत आहे. आत या बोनस मिळालेल्या आयुष्यात काय काय करायचे ते ठरवू लागले. विवाहानंतर जवळजवळ 32 वर्षे मी मुंबईसारख्या सदैव कार्यरत असलेल्या महानगरीत घालवली. उत्तरायणात नाशिकला आले. आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ श्री दुर्गा महिला संस्था स्थापन केली. ती रजिस्टरही केली. महिलांना एकत्र करून त्यांच्या गुणांना वाव मिळेल, त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी होईल यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आखले. दर मंगळवारी दुपारी 3 ते 5 या वेळेत आम्ही भेटू लागलो. प्रथम ‘सर्वात्मका शिवसुंदरा’ ही कुसुमाग्रजांची प्रार्थना म्हणून कार्यक्रम सुरू करू लागलो. विविध स्पर्धा, खेळ, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम, वैद्यकीय शिबिरे, विविध सामाजिक, औद्योगिक संस्थांना भेटी, सहली, असे भरगच्च कार्यक्रम साठी ओलांडलेल्या, तर काही 75 वर्षांच्यापुढे असलेल्या, नव्वदीकडे झुकलेल्या उत्साही महिलांच्या सहकार्याने पार पडले.


मला स्वत:ला ललित कला, वाचन, साहित्य याची लहानपणापासून आवड असल्यामुळे मी नियमित वाचन करते. सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांना हजर राहते. त्यांचा मनसोक्त आस्वाद घेते. चित्रप्रदर्शनातील रंग न्याहाळते. मधूनमधून लेख लिहिते. नाटक हा तर माझा आवडता छंद आहे. दर सोमवारी संध्याकाळी 2 तास भजनवर्गात जाऊन भजन शिकते. भजनाचे दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी 20 ते 22 कार्यक्रम आम्ही करतो. मी त्याचे निवेदन, सूत्रसंचालन करते. त्यामुळे संतसाहित्याचा अभ्यासही होतो.


आम्ही सगळ्या ज्येष्ठ भगिनी भजनवर्गात व महिला संस्थेत एकमेकींचे वाढदिवस आनंदाने साजरे करतो. प्रत्येकाच्या आयुष्यात सुखदु:खाचा पाठशिवणीचा खेळ चालूच असतो. त्यातूनच आनंदाचे, सुखाचे क्षण वेचून इतरांचेही आयुष्य सुखी करणे हेच आपले ईप्सित असावे.


अवघाचि संसार सुखाचा करीन, हे संत ज्ञानेश्वरांचे वचन लक्षात ठेवून सर्वांचे कल्याण होईल हेच आमच्यासारख्या वयाने ज्येष्ठ असलेल्या महिलांचे ध्येय असावे. मनुष्यजन्म दुर्लभ असतो. या जन्माचे सार्थक सर्वांना सुख देण्यात, आनंद वाटण्यात आहे, असे मला वाटते.