आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आनंद'सूर हरपला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकझोका...’ने संगीतप्रेमींना मिळालेला ‘आनंद’ कसा भुर्रकन निघून गेला, कळलंच नाही. आनंद मोडक हे मराठी संगीत क्षेत्रात नवनवीन प्रयोग करणारे, मराठी रसिकांना आपल्या संगीताच्या जादूने मंत्रमुग्ध करणारे जादूगार होते. 21 मे रोजी त्यांचे निधन झाले आणि त्यांच्या चाहत्यांना धक्काच बसला. पुणेकर आनंद यांचे अकोला आणि शेगाव हे वीकपॉइंट. मूळचे अकोल्याचे आनंद ‘बँक ऑफ महाराष्ट्र’तील नोकरीमुळे शिक्षण अर्धवट सोडून पुण्याला गेले. मात्र, अकोल्यावरील त्यांचे प्रेम तिळमात्रही कमी झाले नाही...

आनंद मोडक यांच्या बालपणाची सुरुवातच रंगमंचावर झाली, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. आनंद यांची आई कुंदाताई व गुरू सूरमणी कै. शकूताई पळसोकर या दोघी मैत्रिणी. त्यांनी सौभद्र, एकच प्याला, रुक्मिणी स्वयंवर अशा अनेक संगीत नाटकांमध्ये सोबत काम केलं. कुंदातार्इंची भूमिका असली की शकूताई बाळ आनंदला घेऊन विंगेत थांबायच्या, तर शकू तार्इंची भूमिका असताना कुंदाताई. अशा रीतीने कितीतरी नाटकंआनंद मोडकांनी बालपणीच पाहिली. त्यांच्यासाठी कुंदाताई प्रेरणास्रोत होत्या. शकूताई जशा त्यांच्या गुरूतशाच त्या मावशीसुद्धा. शकूतार्इंच्या विदर्भ संगीत अकादमीमध्येच आनंद यांनी हार्मोनियमचे धडे गिरवले. एकनाथपंत कुळकर्णी, सुधाकर प्रधान यांच्याकडूनही आनंद मोडकांना संगीताचे संस्कार मिळाले.

शाळेत असताना क्रिकेटवरील प्रेमामुळे त्यांना क्रिकेटर व्हायचे होते. परंतु पुढे कॉलेजमध्ये आल्यानंतर त्यांचे क्रिकेटवेड कमी झाले. कॉलेजमध्ये ते प्रचंड खोडकर होते. असे एकही प्राध्यापक नाहीत, ज्यांची आनंद यांनी नक्कल केली नाही. कॉलेजात आलेल्या नवीन प्राध्याप्रकाची खोडी करणे, नक्कल करणे हा त्यांचा छंदच. तसेच एखाद्यावर कविता करणे आणि चिठ्ठीवर नाव न लिहिताच सर्वांना संभ्रमात ठेवणे, असे प्रकार रोजचेच. कोणी आपल्याला चिठ्ठी दिली, याचा शोध कॉलेजभर घेतला जायचा. यातून प्राचार्यदेखील सुटले नाहीत. पण त्यांनी केलेल्या कविता सर्वांच्या पसंतीस उतरायच्या.

कॉलेजमध्ये त्यांच्यापेक्षा तीन-चार वर्षे सीनियर विद्यार्थ्यांचा नाटकाचा ग्रुप होता. त्यांनी बसवलेल्या एका नाटकासाठी त्यांनी प्रॉम्प्टर म्हणून काम केले. दुसरं नाटक ‘सुंदर मी होणार’. हे बसवत असताना, मी परत प्रॉम्प्टर म्हणून काम करतो, असे ते म्हणाले. त्यांचं नाटकावरील प्रेम पाहून त्यांना नाटकातील एक छोटीशी भूमिका देण्यात आली. त्यांनी ती दोन-तीन वाक्ये एवढी जबरदस्त उच्चारली की सर्व भारावून गेले. दोन वाक्य असली तरी तालमीच्या वेळी ते त्यांच्या भूमिकेबद्दल फार गंभीर असायचे. त्यांची शब्दफेक, संवादाची लकब पाहून त्यांनी नाटक क्षेत्राकडे वळावं, असं प्रत्येकाला वाटायचं आणि जेव्हा त्यांनी जब्बार पटेलांचं ‘घाशीराम कोतवाल’ हे पहिलं नाटक केलं, त्या वेळी त्यांच्यापेक्षा जास्त आनंद त्यांच्या मित्रांना झाला. शिवाय त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं, त्या वेळी अनेकांनी त्यांना पत्र, तर काहींनी त्यांच्यावर लेख लिहिले. प्रतिसाद म्हणून मोडक यांनी प्रत्येकाला न विसरता उत्तर पाठवलं. कितीही मोठा झालो तरी, तुमच्यासाठी मी तोच खोडकर आनंद आहे, अशी विनम्र भावना त्यांनी त्या वेळी व्यक्त केली होती.

कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये आनंद मोडकांनी संगीताचे सादरीकरण केले. सुरुवातीला ते गोंधळले. कॉलेजचे संस्थापक सचिव बाबूराव जोशी यांनी हटकले. त्या वेळी आनंद यांनी ‘आली आली गं भागाबाई’ हे लोकगीत म्हटलं. ते ऐकून ‘हा संगीताचा बादशहा होणार’ असे उद्गार जोशी यांनी काढले आणि पुढे ते खरे झाले. बीएस्सीला असताना मोडक यांना पुण्याला बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी लागली आणि घरच्या काही अडचणींमुळे त्यांनी शिक्षण सोडून नोकरी स्वीकारली. त्याच दरम्यान त्यांच्या बहिणीचे अकस्मात निधन झाले. दोन्ही भाच्यांना त्यांनी आईचे प्रेम दिले. आज त्यांचा भाचा, अमेरिकेत नोकरी करत आहे, तर भाचीचे लग्न होऊन ती सासरी सुखी आहे.
आनंद मोडकांनी प्रत्येकासोबत केवळ नाते जोडले नाही, तर ते मनापासून निभावलेसुद्धा. त्यांचा मनमिळाऊ स्वभाव, परोपकारी वृत्तीमुळे ते सर्वांचे आवडते होते. पुण्यात बँकेत काम करत असताना त्यांच्या याच लाघवी स्वभावामुळे जनरल मॅनेजरने त्यांचे टेबल मोडकांच्या टेबलसमोर हलवले. पुण्यात अकोल्याची कोणीही व्यक्ती भेटली, तर ते आवर्जून त्यांच्यासोबत बोलायचे. मित्र आल्यानंतर चक्क जब्बार पटेलांना नाटकाची तालीम रद्द करायला सांगायचे. अकोल्यात त्यांचा ‘एट फेलुअर्स’ नावाचा आठ मित्रांचा ग्रुप होता. त्यांचे गुरू प्रा. पंढरीनाथ मांडवगणे पुण्याला एका सेमिनारनिमित्त गेले होते. तेथे त्यांना शोधण्यासाठी मोडकांनी जब्बार पटेलांना कितीतरी तास फिरवले आणि पहिल्या सत्रानंतर ‘ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला नेहमी सांगायचो, ते हेच माझे सर’ अशी ओळख जब्बार पटेलांना करून दिली. अकोल्यातील लोकांप्रति असलेलं त्यांचं प्रेम, त्यांना भेटण्याची धडपड पाहून जब्बार पटेलांना नेहमी आश्चर्य वाटायचं.

अकोल्यातील संगीत क्षेत्रातील व्यक्ती पुण्यात गेली की तू येथे क्लास सुरू कर, पुण्यात संगीतातील बेसिक शिकवणारं कोणीच नाही, असा त्यांचा आग्रह असायचा. अकोल्यातील अनेक कलावंतांना पुणे फेस्टिव्हलमध्ये सादरीकरण करण्याची संधी त्यांच्यामुळे मिळाली. शेगावच्या गजानन महाराजांवर त्यांची निस्सीम भक्ती. कोठेही जाताना मोडक शेगावला थांबायचेच. गजानन महाराजांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या एक दिवस आधी ते शेगावला आले आणि दर्शनानंतर न विसरता पारायण केले. अकोल्यात ज्या सीताबाई कला महाविद्यालयात ते शिकले, तेथे 2010 मध्ये उभारलेल्या साउंड रेकॉर्डिंग स्टुडिओचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर दि बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीच्या अमृतमहोत्सवी परिसंवादात त्यांचा सहभाग होता. 2020 मध्ये भारत महाशक्ती बनेल का आणि त्या वेळी भारतीय संगीत कुठे व कसे असेल याविषयी त्यांनी नुसतेच भाषण केले नाही तर, संगीताचे सादरीकरणदेखील केले.

आनंद मोडक केवळ नावापुरते नव्हे तर खर्‍या अर्थाने सर्वांना भरभरून आनंद देणारे कलावंत होते. त्यांनी प्रत्येकासोबत केवळ नाते जोडले नाही, तर निभावलेसुद्धा. एक वर्षापूर्वी अकोल्याला येऊन गेले, तेव्हा सर्व मित्रांशी भेट झाली होती. पण अकोल्याचे नाव उंचावणारा हा दिलदार माणूस अकस्मात काळाच्या पडद्याआड गेला आणि मराठी संगीताच्या दुनियेतले जणू चैतन्यच हरपले!