अकोला तालुक्यातील मलकापूर ग्रामपंचायत भागात २००९ साली जनजागृती महिला विकास शिक्षण संस्थेने उत्कर्ष शिशुगृह सुरू केले. तेव्हापासून शासनाकडून एक रुपयाचीही मदत न घेता फक्त लोकसहभागातून, लोकवर्गणीतून हे शिशुगृह चालू आहे, असे प्रकल्पप्रमुख दादा पंत यांनी सांगितले. या अनाथालयात १० बालके ठेवण्याची मान्यता देण्यात आली आहे. सध्या ५ बालके सहा महिन्यांहून लहान तर ४ बालके ४ वर्षांपर्यंत वयाची आहेत. शासनाने संस्थेला अनुदान द्यावे, यासाठी कधी प्रयत्न केले नाहीत. शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिकांच्या सहकार्याने ही संस्था आज सुरळीत सुरू आहे. काही नागरिक वस्तुरूपाने तर काही रोख रकमेच्या रूपाने मदत करतात. शिवाय येथे नुकत्याच सुरू झालेल्या गायत्री बालिकाश्रमाने काही अंशी खर्च उचलला आहे. दवाखाने, दूध, खाऊ, कपडे, देखभाल करणाऱ्या आया, त्यांच्यासाठी आवश्यक उपकरणे, साहित्य, न्यायालयाचा खर्च यांचा विचार केला तर प्रत्येक बालकाला महिन्याला जवळपास १० हजार खर्च येतो. हा खर्च प्रत्येक महिन्यात भागतोच असे नाही, तर अनेक वेळा कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात नाहीत. बऱ्याचदा अडचणी येतात. मात्र, काहीतरी तडजोड करून बालकांचे संगोपन केले जाते. शासनाकडून आर्थिक मदत होईल याची अपेक्षा करणे म्हणजे क्षितिज मिळवण्यासाठी केलेली धडपड करण्यासारखे आहे, अशी भावना अध्यक्ष मीना देसाई व सचिव अॅड. मनीषा कुळकर्णी यांनी व्यक्त केली.
२००१ ते २०१४ या काळात संस्थेतील जवळपास ५७ बालके दत्तक दिली आहेत. पोलिस, बाल कल्याण समिती यांच्यामार्फत काही बालके येथे येतात, तर काही शिशुगृहाजवळील पाळण्यात ठेवून दिली जातात. अनेक माता स्वत: येथे येऊन बालके देऊन जातात.
(hiral.gawande @dbcorp.in)