आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hiral Gawande About Fatherless Childs Father In Madhurima, Divyamarathi

सव्वाशे अनाथांचा बाप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक मुलीचा पहिला सुपर हीरो म्हणजे तिचा बाबा. खांद्यावर बसवून दुनिया दाखवणारा बाबा. आयुष्यातील प्रत्येक पाऊल पुढे पडताना पिल्लाचं बोट पकडून बळ देणारा, त्याला स्वत:च्या पायावर उभं करणारा बाबा. पण बरीच अशी चिमुकली आहेत, ज्यांनी जन्मानंतर त्यांचा बाबा बघितलेलाच नसतो. अशा फुलपाखरांना समाजाने ‘अनाथ’ असे कानाला टचकन रुतणारे नाव दिले आहे. जन्मापासून कायद्याच्या भाषेत सुजाण होईपर्यंत म्हणजे अठराव्या वर्षापर्यंत अनाथालयाच्या भिंतीच आई आणि बाबा होतात. पण सर्वच अनाथालयांत आईबाबा सापडतील असे नाही. कायदा म्हणतो, परंतु खरंच अठराव्या वर्षी कुणी सुजाण होतं का? अठराव्या वर्षी पंखात नुकतंच बळ आलेलं असतं, पण झेप घेण्यासाठी फार दिशा माहीत नसतात. या चिमुकल्यांना आपल्या डोक्यावरील छत हरवावे लागते. व्यवस्थेच्या कचाट्यात अठराव्या वर्षी पुन्हा एकदा त्यांना अनाथ व्हावे लागते. समाजातील हे धगधगते वास्तव आहे. त्यात मुली, अपंग मुलांचे प्रश्न आणखी गंभीर आहेत.

अनाथ, अपंगांना अठराव्या वर्षानंतरही अनाथालयात राहू देण्यात यावे, त्यांना सातवीनंतरचे शिक्षण घेता यावे, सुदृढ आणि शिक्षित मुलांच्या विवाहासाठी दानशूर कुटुंबांनी पुढाकार घ्यावा, असा केवळ उपदेश न करता तो प्रत्यक्षात उतरवणाऱ्या, अशा सव्वाशे मुलामुलींसाठी जिवाचे रान करणाऱ्या एका बाबाने समाजासमोर मोठा आदर्श निर्माण केला आहे. साध्याशा कुडता-पायजम्यातला हा अवलिया बाबा म्हणजे शंकरबाबा पापळकर.

अमरावती जिल्ह्याच्या एका कोपऱ्यात वझ्झर गावातील एका टेकडीवर शंकरबाबांनी अनाथ, अपंग मुलांसह नंदनवन फुलवलं आहे. शासनाची मदत न घेता ज्या दात्यांनी वझ्झरला येऊन येथील व्यवस्था पाहिली, त्यांनीच दिलेली मदत घेऊन हा बाप सव्वाशे मुलामुलींचे कुटुंब आनंदाने चालवत आहे. या चिमुकल्यांचा शेंबूड काढण्यापासून त्यांची पूर्ण शुश्रूषा बाबा स्वत:च्या हाताने करतो. लग्नाला आलेल्या मुलींसाठी स्थळ शोधताना चप्पल झिजवतो. त्या मुलींच्या कन्यादानासाठी दानशूरांना शोधतो. अधिकारी, प्रतिष्ठित, सामाजिक कार्यकर्ते यांना त्या मुलींचे नातेवाईक बनवून त्या मुलींचा संसार उभारतो. या अवलियाने प्रसिद्धीसाठी कुठलाही खटाटोप केला नाही. तो कधीही कुठल्याही व्यासपीठावर बसला नाही. कोणताही पुरस्कार स्वीकारला नाही. एखाद्याने परस्पर जाहीर केलेली देणगी स्वीकारली नाही. हा बाप आपल्या सव्वाशे मुलांचे संगोपन, शिक्षण करतानाच त्यांचे आयुष्य घडवत आहे. या मुलामुलींचे जीवन घडवणे एवढेच त्याचे ध्येय नाही, तर देशभरातील अशा मुलांच्या संगोपनासाठी कायदा व्हावा म्हणून बाबा दिल्लीपर्यंत लढा देत आहे. अशा मुलांना अठराव्या वर्षांनंतर हाकलून देण्यात येऊ नये, तसेच त्यांच्या अारोग्य व शिक्षणाची सोय व्हावी यासाठी तो झगडतो आहे.

१९९०मध्ये स्थापन केलेल्या स्व. अंबादासपंत वैद्य मतिमंद बेवारस बालगृहात सध्या ९८ मुली व २५ मुलं असे एकूण १२३ मतिमंद, मूकबधिर, अंध आहेत. मुलांना दोन वेळचे जेवण मिळावे, त्यांना छत मिळावे एवढा बाबांचा उद्देश नसून त्यांचे पुनर्वसन व्हावे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. येथील सर्व मुलांच्या वडिलांचे नाव शंकरबाबा पापळकर आहे. समाजाचा एक घटक म्हणून या बालकांनाही जगण्याचा अधिकार आहे. सर्व सामान्य नागरिकांप्रमाणे त्यांनाही शिक्षण घेता यावे, मतदान करता यावे यासाठी बाबांनी बराच संघर्ष केला. त्यांच्या दीर्घ लढ्याचे फलित म्हणजे आज या सर्व मुलांचे वझ्झर ग्रामपंचायतीचे रहिवासी दाखले आहेत. सर्वांकडे आधार कार्ड आहे. २१ मुलांचे मतदार ओळखपत्र असून त्यांनी मतदानाचा अधिकारही बजावला आहे.

आपल्या येथे अशा विशेष मुलांना सातवीपर्यंत शिक्षण घेता येण्यासाठी शाळा आहेत; पण त्यांच्या पुढील शिक्षणाचे काय हा प्रश्न अधांतरीच आहे. बाबांनी या मुलांच्या शिक्षणावर भर देत पाच अंध मुलांना आधुनिक पद्धतीने शिक्षण दिले आहे. कमरेतून पूर्ण पाय गेलेली मुलगी रूपाला व्हीलचेअरवर बसवून शिकवलेे. एवढेच नाही, तर शिक्षण पूर्ण होऊन आज १२ मुलं सरकारी नोकरीत आहेत.

जिव्हाळ्याचे नाते
अनाथालयातील चिमुकल्यांचा सांभाळ व त्यांचे पुनर्वसन एवढेच बाबांचे कार्य नाही, तर त्यांचे प्रत्येक मुलामुलीसोबत जिव्हाळ्याचे नाते आहे. बाबा दिवसभर कामासाठी कुठेही गेले तरी सायंकाळी मात्र ते आपल्या पाखरांजवळ परततात. या लेखासाठी अधिक माहिती हवी म्हणून बाबांना फोन केला तर ते म्हणाले, ‘कालच म्हणजे १० जूनला माझ्या एका मुलीचे निधन झाले, मी बोलू शकत नाही. मी कोणत्या दु:खात आहे हे सांगता येणार नाही. माझ्या मुलीचे निधन झाले आणि मी माझ्या कार्याची माहिती देत असेन तर माझ्यासारखा हैवान नाही. मला क्षमा करावी.’ शंकरबाबा एखादी संस्था चालवणारे व्यवस्थापक नाहीत, तर खऱ्या अर्थाने या चिमुकल्यांचे बाबा आहेत.

(hiral.gawande@dbcorp.in)