आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्यांचा सल्ला घेईन पण निर्णय माझा असेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी राधिका सुनील पाटील (धाबेकर). अहमदाबाद येथून टेक्स्टाइल डिझाइनमध्ये पदवी घेतली आहे. नुकतीच मी अकोला जिल्हा परिषदेत सभापती झाले आहे.घरात दोन व्यक्ती आधीच राजकारणात असल्याने तसे वातावरण घरी होते. राजकारणाच्या गप्पागोष्टी लहानपणापासून कानावर पडत होत्या, पण स्वत: कधी राजकारणात उतरेन असे कधीच वाटले नव्हते.
मी लहानपणी बँडच्या आवाजालाही घाबरत होते यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. पण दहावी माझ्यासाठी टर्निंग पॉइंट ठरली. हस्तकला, विविध कलांवर आधारित बोर्डिंग शाळेतून माझी दहावी झाली. दहावीनंतर आर्ट्समध्येच करिअर करायचंं असं वाटत असलं तरी फाइन आर्ट की डिझाइन, हा संभ्रम असल्याने बारावी वाणिज्य शाखेतून केली. सोबत ड्रॉइंग आणि क्राफ्टचे क्लासेस चालूच होते. लहानपणापासूनच कापड आणि संबंधित विषयात आवड होती. अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाइनमधून टेक्स्टाइल डिझाइनचा कोर्स केला. यादरम्यान अनेक घटकांचा बारकाईने अभ्यास करण्याची संधी मिळाली आणि महिलांच्या परिस्थितीचा फार जवळून अनुभव घेता आला.
अभ्यासाचाच एक भाग म्हणून मी काही महिने बंजारा लोकांमध्ये राहिले. त्यांची कला शिकली, त्यांची जीवनशैली, कला, राहणीमान याचा अभ्यास केला. माझ्या त्या अनुभवावर The Lamani Craft : An Experience of Simplicity हे पुस्तक लिहिले.
तसेच कोल्हापूरला जाऊन पारंपरिक कोल्हापुरी चप्पल बनवण्याचे प्रशिक्षण घेतले. या वेळी मला जाणवले की, आदिवासींकडे असलेल्या कलेला आपण कधी समजूनच घेतले नाही. आपल्याला त्याची किंमत नसली तरी परदेशात त्याला फार किंमत आहे. अशा लपलेल्या हस्तकलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्या कलेची ओळख जगाला व्हावी यासाठी काहीतरी करायचे आहे.
राजकारण व माझा कधी मेळ जमेल असा स्वप्नातदेखील विचार केला नव्हता. पण आता येथील लोकांची परिस्थिती पाहिली आणि खरंच यांच्यासाठी काम करण्याची, विकास करण्याची किती गरज आहे याची जाणीव झाली.
राजकारणात अनेक महिला असल्या तरी त्यांचा कारभार त्यांचे नवरे, वडील किंवा भाऊ पाहतात असे चित्र सर्वत्र दिसते. त्यांचा सल्ला घेणे वेगळे आणि पूर्ण कारभारच त्यांच्या हाती असणे यात फरक आहे. राजकारण माझ्यासाठी अगदीच नवीन असल्याने मीसुद्धा वडील आणि आजोबांचा सल्ला घेत असते. पण पूर्ण कारभार त्यांच्याकडे देणार नाही. मी माझे मतसुद्धा तेवढेच प्रखरपणे मांडते आणि त्यांचे विचार पटत नसतील तर विरोधही करते.
राजकारणात कमीत कमी पदवीपर्यंत शिक्षण अनिवार्य केले पाहिजे. यामुळे राजकारण्यांमध्ये असलेला असुशिक्षितपणा कमी होईल आणि त्याची समाजाच्या विकासासाठी मदत होईल. जी व्यक्ती निरक्षर असेल किंवा चौथी, सातवी, दहावीपर्यंतच शिकली असेल ती शिक्षणाचे महत्त्व काय आणि किती सांगू शकेल, याचा विचार झालाच पाहिजे. सध्या राजकारणात बोटांवर मोजण्याइतक्याच महिला आहेत.
हे चित्र बदलण्याची जबाबदारी युवा वर्गाकडे आहे. आपणच हे भीषण रूप बदलू शकतो. युवाशक्ती काय असते हे जगाला दाखवून देण्याची वेळ आली आहे. मी माझ्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्न करेन की, समाजाचा चेहरा आणि मुख्यत्वे राजकारणातील महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा बदलेल.

hiral.gawande@dainikbhaskar
group.com