सेंद्रिय शेतीचा यशस्वी प्रयोग करून धरणीमातेसह गावकऱ्यांच्या
आरोग्यासाठी झटणारी २७ वर्षांची नासरीताई महाराष्ट्रासोबत देशाचे भूषण ठरत आहे. निव्वळ शेतमजूर म्हणून न जगता, इतरांना वाट दाखवणाऱ्या या आदिवासी मुलीच्या कर्तबगारीवर आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त हा प्रकाशझोत...
‘इतरांचा वेळ किती तरी,
जाई व्यर्थचि गावी घरी,
कामी लावता तो निर्धारी,
काया पालटेल गावाची!
कच्ची सामग्री गावच्या भागी,
ते पुरेपूर आणावी उपयोगी!
शोध करुनी नाना प्रयोगी,
माती करावी सोन्यासम!’
ग्रामगीतेत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली ही ओवी सार्थ ठरवणारी नासरीताई.
अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील बोरव्हा या आदिवासी भागातील नासरी शेट्या चव्हाण, शेणखतापासून बायोडायनामिक कम्पोस्ट तयार करून कमी खर्चाची शेती करण्याचा यशस्वी प्रयोग करणारी पहिली मुलगी. हा यशस्वी प्रयोग स्वत:पुरता मर्यादित न ठेवता,
आपल्या गावासह शेजारच्या ५ ते ६ गावांचादेखील तिने विकास केला आहे. सेंद्रिय शेतीचा पुरस्कार करून गावाचा कायापालट करणारी नासरीताई मुलांच्या शिक्षणासाठीदेखील धडपडते. आज त्यांच्या प्रयत्नामुळे गावातील शाळा नियमित सुरू झाली असून प्रत्येक मूल शाळेत जात आहे. तिने गावातील गर्भवती महिला, लहान मुलं यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊन गाव कुपोषणमुक्त केले आहे. आज या गावात एकही बालमृत्यू नाही.
जेमतेम २७ वर्षांची ही तरुणी आज सेंद्रिय शेती, आरोग्य, जल संधारण, शिक्षण असे बहुआयामी काम करत आहे. नासरीचे गाव तसे आदिवासीबहुल सातपुड्याच्या कुशीत वसलेले. ९ भावंडांमध्ये नासरीचा क्रमांक पाचवा. गावातील काही लोकांनी मुलांना शाळेत टाकले म्हणून नासरीच्या वडिलांनी तिला आणि तिच्या मोठ्या एका बहिणीला शाळेत प्रवेश घेतला. पण गावात फक्त प्राथमिक शिक्षणाचीच सोय. त्यामुळे चौथी ते सातवीचे शिक्षण गावापासून ४ किलोमीटर लांब खंडाळा गावात केले. दोन नद्या पार करून जाण्याचा रोजचा पायी प्रवास इथेच थांबला नाही तर पुढील शिक्षणासाठी पायपीट आणखी वाढली. आठवी ते बारावीचे शिक्षण हिवरखेडला घेतले. रोज जवळपास २४ किलोमीटरचा पायी प्रवास. मात्र, बारावीनंतरचे शिक्षण घरच्या परिस्थितीमुळे सोडावे लागले; पण घरी शांत बसून राहणारी नासरी नव्हती. तिने गावातील मुलांना एकत्र करून त्यांना प्राथमिक धडे द्यायला सुरुवात केली. याशिवाय वडिलांना शेतात मदत होतीच. नासरी स्वत: शेतात पुरुषांप्रमाणे वखर हाकणे, नांगरणे, तिफण चालवणे, पेरणी, पाठीवर पंप घेऊन फवारणी करणे अशी सर्वच कामे पारंपरिक पद्धतीने करते. पेरणीपासून पिकांच्या तोडणीपर्यंतची सर्व कामं नासरीला करताना पाहून गावातील लोकांनी खूप नावे ठेवली.
आठवीत असतानापासून शेतात काम करणारी, सतत काही तरी धडपड करणाऱ्या नासरीला मार्ग मिळाला, शेती शाळेतून. गावात बायोडानामिक कम्पोस्टचे प्रशिक्षण देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. या शाळेत नियमित जाणारी नासरी ही एकटी मुलगी. गावात निमाडी भाषा बोलत असल्याने गावकऱ्यांशी संवाद साधणे अवघड. ही भाषेची अडसर दूर केली नासरीने. तिने सर्व प्रशिक्षण घेऊन, गावकऱ्यांना शिकवण्याची पक्की गाठ मनाशी बांधली.
तिला प्रत्येक बाबतीत मार्गदर्शन केले ते सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी कुंवरसिंह मोहने यांनी. प्रारंभी नासरीने बायोडानामिक कम्पोस्ट घरी तयार करायला सुरुवात केली. तिचा तो प्रयोग पाहून गावातील लोकांनी उलटसुलट चर्चा सुरू केली. ‘लय शिकली म्हणून आता ही पोरगी खताले बी सारवते... पागल झाली पोरगी....’ टोमण्यांनी नासरी कधी कधी डगमगलीही, पण तिने धीर, जिद्द सोडली नाही. जो होगा देखा जायेगा, असे म्हणून ती आणखी जोमाने कामाला लागली. शेतीसाठी आवश्यक सर्व साहित्य, बायोडायनामिक कम्पोस्ट, बायोडायनामिक एस९ कल्चर तिने घरी तयार केले. आणि एका महिन्यात परिणाम पाहायला मिळाला. यावर्षी रासायनिक खतांचा वापर करणाऱ्यांना ८ क्विंटल ज्वारीचे उत्पादन झाले. तर नासरीने ५ एकर शेतात १७ क्विंटल ज्वारी घेतली.
शेतात सतत नवनवीन प्रयोग करणारी नासरी सध्या कापूस सोबत मका, तूर, मूग, चवळी असे मिश्र पिक घेते. यावर्षी तिने ज्वारी आणि गहूदेखील पिकवले. गावात उताराची शेती असल्याने पाण्याचे मोठे संकट. गावातील पाणी वाहून गेल्याने शेतीसाठी पाणी अडवणे अवघड. यासाठी नासरीने उताराला आडवी पेरणी या पद्धतीने शेतीचा करण्याचा यशस्वी प्रयोग करून दाखवला. आणि आज गावातील जवळपास १८०० एकर शेतात उताराची आडवी पेरणी केली जाते. देशात जलयुक्त शिवार संकल्पना जोर धरत असताना नासरीने अत्यंत सोप्या पद्धतीने शेताला पाणी मिळवून दिले. आज बोरव्हा गावासह भिली, चिप्पी, धोंडाकर, गायरान, पिंपरखेड या आदिवासी गावातील बहुतांश शेतकरी बायोडायनामिक शेती करतात. तिचे हे बायोडायनामिक प्रयोग गावातच नव्हे, तर इतर देशांतही प्रसिद्ध झाले. श्रीलंका, इटली अशा विविध देशांतील लोकांनी गावी येऊन तिच्याकडून प्रशिक्षण घेतले. तिला केनिया आणि इंडोनेशिया यांनी निमंत्रण दिले आहे. अाता तेथील लोकांना प्रशिक्षण देण्यासाठी ती इंग्रजी शिकण्याच्या निमित्ताने तिचा शिक्षणाचा प्रवास पुन्हा सुरू झाला.
सगळ्यांसाठी आदर्श
नासरी ही तिच्या गावासाठीच नाही तर सगळ्यांसाठी आदर्श आहे. तिच्या कार्याने प्रेरित होऊन आज गावातील प्रत्येक महिला, मुलगी शेतात काम करत आहे. पुरुष जर नसतील तर या बाया बैलगाड्या चालवण्यापासून स्वत: शेतात सर्व कामे करतात. तिच्या कार्याची आणखी एक पावती म्हणजे गावातील मुलगी लग्न होऊन सासरी मध्य प्रदेशातील एका गावात गेली. तेथे जाऊन तिने बायोडायनामिकचा प्रयोग करून गावातील इतर शेतकऱ्यांना प्रेरित केले. आणि आज ती तेथे हे कार्य जोमाने करत आहे. नासरीचा हा आदर्श मुलींनी घेऊन आपल्यासह गावाचा विकास करत आहेत, हे सर्वात मोठे पारितोषिक आहे.
शिक्षण, आरोग्यावर विशेष काम
आज नासरीमुळे गावातील प्रत्येक मूल शाळेत जात आहे. नेहमी बंद असणारी शाळा आज रविवारीसुद्धा सुरू असते. याशिवाय गावातील कुपोषणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नासरीने विशेष प्रयत्न केले. नदीवर कपडे धुवायला, पाणी भरायला गेल्यावर गावात कोण गरोदर आहे हे समजले की नासरीचे पुढील काम सुरू झाले. त्या महिलेला समजवून, रागवून काहीही करून लस देऊन आणायची. नुसते समुपदेशन करून थांबायचे नाही तर त्याचा सतत पाठपुरावा करून सुदृढ आरोग्यासाठी कार्य केले. आणि याचेच फलित म्हणजे आज त्यांच्या गावात एकही बालमृत्यू नाही. कुपोषणाचा तर लवलेशही नाही.
hiral.gawande@dbcorp.in