आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रिंगा रिंगा’ची ठाम मानसी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोठ्या पडद्यावर सक्षम स्त्री पात्र साकारण्यासाठी प्रत्येक वेळी बाईनं दुर्गेचा अवतार धारण केलाय असं दाखवणं गरजेचं नसतं. तर स्त्री ही कौशल्य आणि विचारपूर्वक कृतीनेदेखील ध्येय गाठू शकते. असाच काहीसा संदेश ‘रिंगा-रिंगा’मधून दिला आहे.

चित्रपट म्हटला की देखणा तडाखेबाज नायक, लाजरीबुजरी नायिका, एक खलनायक, नायिकेचा छळ, नायक त्यातून तिला सोडवतो... अशी कथा लगेच आवडून जाते. एखादा सामाजिक प्रश्न घेऊन धीरगंभीर मांडणी, किंवा निखळ मनोरंजन, विनोदी चित्रपट अशा धाटणीच्या चित्रपटांचा विचार निर्माते जास्त करतात. सध्या नायिकाकेंद्रित चित्रपटांची निर्मिती अधिक होत असून हे प्रयोग गेल्या तीनचार वर्षांत जास्त झालेले जाणवतात. २०१० मध्ये प्रदर्शित झालेला ‘रिंगा रिंगा’ हा चित्रपट यातलाच एक. वर वर पाहता यातदेखील नायिकेला दुय्यम वागणूक दिली असे वाटत असले तरी संपूर्ण कथानकात तीच केंद्रस्थानी असून तिच्यामुळे संपूर्ण राज्याचे राजकारण बदलते आणि एका चांगल्या दिवसाची पहाट होते.

परिवर्तनात महिलांचा सहभाग महत्त्वाचा असतो, असे म्हटले जात असले तरी संपूर्ण बदल किंवा चांगले कार्य तिच्यामुळेच शक्य झाले, हे काही वर्षांपूर्वी फारसे चर्चेत नव्हते. ज्या वेळी विनोदी वा पठडीतल्या चित्रपटांचा काळ होता अशा वेळी दिग्दर्शक संजय जाधव यांनी हा वेगळा प्रयोग केला. मानसशास्त्रीय थरारपट असलेल्या या चित्रपटात वर वर पाहता नायिका ही टिपिकल बायको, मुलगी वाटते पण मुळात तिच्यामुळेच संपूर्ण राज्याचे राजकारण व सत्ता चुकीच्या हातात जाण्यापासून थांबून नवी पहाट होते. रिंगा रिंगा या चित्रपटातील नायिका मानसी, म्हणजेच सोनाली कुलकर्णी हिने ही भूमिका एवढी सुंदर साकारली आहे की, अनेक प्रसंगांमध्ये हे आपणच आहोत का, असे आपल्यासोबतच किंवा आपल्या आजूबाजूलादेखील घडले आहे, असे सहज वाटून जाते.

सर्वसामान्य लोकांना अपेक्षित असलेले हे दांपत्य (सोनाली कुलकर्णी व भरत जाधव) कधी प्रेमळ, कधी भांडणारे. भरत जाधव रंगराव म्हणजे अजिंक्य देव यांच्याकडे काम करत असतो. पण अजिंक्य देव हा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असून तो वाईट कामात अडकला असल्याने त्याने मुख्यमंत्री होऊ नये, असे भरत जाधवला वाटते आणि तो पक्षाचे अध्यक्ष अण्णासाहेब यांना भेटून सत्य परिस्थिती सांगतो. नेहमीच्या कथानकाप्रमाणे यातदेखील मार्गात येणारा अडथळा म्हणजे भरत जाधवला मारले जाते. आणि खरे कथानक येथून सुरू होते. येथून सुरू होते मानसीची कसोटी. यात सर्वसामान्य बिचारी बाई वाटणारी मानसी भाव खाऊन जाते. तिच्या भूमिकेने तिला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. कधी केविलवाणी रडणारी, कधी मनोरुग्णाप्रमाणे वागणारी, कधी अापल्या प्रिय व्यक्तीच्या काळजीत असलेली अशी तिची विविध रूपं पाहायला मिळतात. भूमिकेचे आव्हान तिने उत्तम पेलले आहे.

चित्रपटात चारपाच दिग्गज अभिनेते असतानादेखील सोनाली भाव खाऊन गेली. भरत जाधव, अजिंक्य देव, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जुवेकर अशा चार नायकांच्या मध्ये अगदी साधीभोळी दिसणारी सोनाली हृदयात घर करते. खरे पाहता रील लाइफप्रमाणेच रियल लाइफमध्ये पण स्त्रियांच्या बाबतीत असेच होते. नेहमी दुय्यम स्थान मिळत असले तरी एका झटक्यात बाजी पलटवण्याचे सामर्थ्य महिलांमध्ये आहे. या चित्रपटात सोनालीने एक प्रेमळ मुलगी आणि पत्नीची भूमिका निभावली आहे. पतीची इच्छा पूर्ण करतानाच तिने संपूर्ण राज्याचा विचार केलेला आहे. आणि तिच्या या कार्यामुळे राज्याचे भवितव्य सुधारले आहे. कोणत्याही पद्धतीने राजकारणात प्रवेश न करता ती राजकारण खेळून जाते. महिलांमध्ये असलेली ही ताकद तिने दाखवून दिली आहे. आपल्या वडिलांना असलेल्या आजाराचा योग्य वापर करून ती राज्याला वाचवण्यासोबतच आपल्या पतीच्या हत्येचा बदला घेते. आपल्याकडे असलेल्या कौशल्यांचा वापर करून, आपले दु:ख बाजूला सारून सर्व सहन करण्याची अद्भुत ताकद महिलांकडे असून याचे खूुप सुंदर चित्रण या चित्रपटात केले आहे.

चित्रपटातील नायिका अनेक वेळा आपणच असल्याचे जाणवते. कारण मुळात अशा अनेक घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात. महिलांना राजकारण करता येत नाही, किंवा त्यांना राजकारणातलं काय कळतं, अशा पुरुषी टीकेला दिलेली ही जबरदस्त चपराक आहे. महिलांनी मनावर घेतलं तर जग बदलू शकतात, हे या चित्रपटातून दिसून येते. थरारनाट्य असलेला हा चित्रपट शेवटी बाईची मानसिक बाजू, तिचे मन सांगून जातो. वरून कठोर दिसणारी बाई आतून किती सहन करत असते, हे सांगूनदेखील कळत नाही. सोनाली कुलकर्णीने साकारलेल्या या भूमिकेतून बाई ही एक चांगली मुलगी, पत्नी असण्यासोबतच अाक्रमक न होताही कशी बाजी मारू शकते हे दाखवून दिले आहे. तिच्या निरागस अभिनयाने अनेक वेळा डोळ्यात चटकन पाणी येते तर कधी ही वेडी आहे का, असा विचार मनात येतो. प्रत्येक वेळी बाईचा दुर्गा अवतार दाखवणे गरजेचे नाही, तर ती अतिशय कौशल्याने विचारपूर्वक कृतीनेदेखील ध्येय गाठू शकते, हे या चित्रपटातून उत्तम प्रकारे दाखवण्यात आले आहे.

हिरल गावंडे, अकोला
gawandehiral28@gmail.com
बातम्या आणखी आहेत...