आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hiral Gawande Article About Women\'s Self Help Groups, Divya Marathi

संकल्पना बदलण्याचा निर्धार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक महिलेला स्वयंपाक करण्यात रुची असतेच असे नाही, किंवा तसे कौशल्यही सगळ्यांकडे नसते. परंतु म्हणून बचत गटाचे माध्यम त्यांच्या प्रगतीच्या आड येऊ शकत नाही. कारण या माध्यमातून अनेक प्रकारची कामे महिला करू शकतात, देशभरात लाखो महिलांनी हे करून दाखवले आहे.

अकोल्यातील निशा टिपरे बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या पारंपरिक कलागुणांना वाव देण्याचे काम करतातच; परंतु महिलांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचेही काम त्या करत आहेत. 2005मध्ये त्यांनी बचत गटांच्या महिलांना वीज बिल वाटपाचे काम मिळवून दिले. सुरुवातीला काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अधिकार्‍यांनी काम कसे करायचे याबाबत काहीच कल्पना दिली नाही. लोकांनीदेखील मदत करण्याऐवजी दिशाभूल करण्याचेच काम केले. एखाद्या भागातील पत्ता माहीत नसेल तर कोणाला विचारल्यास सरळ उत्तर कधीच मिळाले नाही. घर माहीत नाही तर कशाला करता काम, महिलांनी घरी बसावं, बिलं टाकणं तुमचं काम नाही, असेच उद्गार ऐकायला मिळायचे. तरी जोमाने, चिकाटीने त्यांनी काम चालू ठेवले. अनेक महिलांना रोजगारदेखील मिळवून दिला.
महिन्याला दोन-तीन हजार रुपये कमावण्यासाठी दिवसभर राबावे लागते. पण वीज बिल टाकण्याचे काम फक्त 5 दिवस करून दोन-तीन हजार रुपये कमावता येतात, अशा शब्दांत महिलांना कामाविषयी सांगावे लागले.

घरच्यांच्या विरोधाला तोंड देत महिलांचे बळ वाढवणे म्हणजे निशातार्इंसाठी तारेवरची कसरतच होती. पतीला उत्तम नोकरी असल्याने तशी आर्थिक परिस्थिती चांगली आहे. दुसर्‍यांच्या घरी बिलं टाकणं योग्य दिसतं का, असा प्रश्न त्यांच्या पतीला मित्रांनी विचारल्यानंतर शब्दांची जुळवाजुळव करताना त्यांना कष्ट व्हायचे. त्यांचे मित्र निशातार्इंच्या कामाविषयी अनेकविध प्रश्न उभे करायचे आणि त्यातूनच घरात वाद व्हायचे. निशातार्इंनी त्यांच्या कामामागचा उद्देश स्पष्ट शब्दात सांगितल्यानंतर घरच्यांनीदेखील त्यांच्या कार्यात मदत करण्यास सुरुवात केली.

कामाच्या ठिकाणी नागरिकांकडून बर्‍याच प्रमाणात त्रास सहन करावा लागला. त्यातही महिलांकडूनच अधिक त्रास होतो. वेळेवर बिल मिळाल्यानंतरही बिल मिळाले नाही म्हणून तक्रार करण्यासारख्या मानसिक त्रासासह ग्राहकावर बसलेला दंड भरून देण्याचे आर्थिक त्रासही त्यांना सहन करावे लागले. या महिलांच्या पूर्वी या भागातील काम ज्यांच्याकडे होते, त्यांनीदेखील महिलांना कामापासून परावृत्त करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. त्यांनी महिलांना धमक्या देण्याचेही सोडले नाही. पण फक्त जिद्दीमुळेच या महिला टिकू शकल्या.

सध्या बचत गटातील 4 महिला 4 दिवसांत 11 हजार बिलांचे वाटप करतात. स्वामी समर्थ महिला बचत गट, चिंतामणी महिला बचत गट, माउली महिला बचत गट, स्वप्नपूर्ती महिला बचत गटातील महिला या उपक्रमाशी जुळलेल्या आहेत. महिन्याच्या 24- 25 तारखेला निशाताई आणि मंगला गजफिये महावितरणाच्या कार्यालयातून बिलं घेऊन येतात. निशातार्इंच्या घरी त्या दोघी विभागानुसार त्याची छाननी करतात. 7 हजार बिलांची छाननी करून क्रमवार लावायला जवळपास 10 तास लागतात. नंतर बचत गटातील महिला त्यांच्या विभागानुसार त्याचे वाटप करतात. कामाची सवय झाली असली, बराचसा परिसर माहीत झाला असला तरी आजही काही प्रमाणात लोक त्रास देतात. काम नियमित आहे, पण महावितरणकडून देण्यात येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत. बचत गटांना एका बिलासाठी एक रुपया मिळतो. तसे पाहिले तर सर्व खर्च काढून हातात काहीच उरत नाही. त्यातही महावितरणचे मागील 6 महिन्यांचे बिल थकीत आहे. अशा वेळी बचत गटातून कर्ज काढून महिलांना पैसे द्यावे लागतात. शासकीय अनुदान, सबसिडी काहीही मिळत नसल्याने जवळपास 12 टक्के व्याजदराने हे कर्ज मिळते.

कामाचे स्वरूप आणि त्यातून मिळणारे उत्पन्न पाहता ग्रामीण भागातील बचत गटांनादेखील हे काम मिळावे यासाठी अनेक महिलांनी मागणी केली आहे. तसेच महावितरणचे अधिकारीही त्यांना कार्यक्षेत्र वाढवण्याची विनंती करत आहेत. सध्या निशाताई महिलांसाठी मीटर रीडिंगचे काम घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले असून काही भागातील मीटर रीडिंगचे काम महिलांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गॅसचा सर्व्हे करण्यासाठी हिंदुस्थान गॅस एजन्सीसोबत बोलणे झाले आहे. हे काम मिळाल्यास लवकरच घराघरात गॅसचा सर्व्हे, तपासणी करताना या महिला दिसून येतील.

बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांना आर्थिक फायदा झालेला आहे. स्मिता जिवानी हे एक जिवंत उदाहरण. नवर्‍याने सोडून दिले आणि एका लहान मुलाची जबाबदारी स्मितावर आली. त्यांनी सुरुवातीला बिल वाटपाची कामं केली. नंतर बचत गटाच्या माध्यमातून पार्लर व फॅशन डिझाइनचे प्रशिक्षण घेतले. पार्लर टाकून त्यांनी पहिल्या घराचं कर्ज फेडलं. गाडी घेतली आणि चांगल्या शाळेत मुलाचे शिक्षणही सुरू आहे. आताची आर्थिक परिस्थिती पाहून तिचा पती परतला आहे. नाझिमा अब्दुल कलाम यांना पती घराबाहेर निघू देत नव्हता. मात्र, बचत गटातून देण्यात आलेल्या विविध प्रशिक्षणांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असून आता त्या इतरांना प्रशिक्षण देत आहे. मंदाताई टोळे, सुवर्णाताई आगळे यांच्यासारख्या काही महिला त्यांच्या मुलांना अभियांत्रिकीचे शिक्षण देत आहेत. एक महिला ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दोन मुलींना घेऊन आत्महत्या करण्यासाठी रेल्वेखाली चालली होती. तिच्याबद्दल माहिती मिळाल्यानंतर तिला घरी आणून बचत गटाचा पर्याय सांगितला. आता ती महिला बिलं टाकते, तिने बनवलेल्या कुरडया मुंबईला जातात. तसेच विविध ठिकाणी होणार्‍या प्रदर्शनात ती स्टॉलसुद्धा लावते.

महिलांची झालेली प्रगती, त्यांचे सक्षमीकरण आणि त्यांची सुधारलेली आर्थिक परिस्थिती पाहता बचत गट म्हणजे नुसता एक गट नाही तर महिलांसाठी नवे विश्व आहे. ठरवले तर याच्या साहाय्याने आकाशालासुद्धा गवसणी घालता येते.

hiral.gawande@dainikbhaskargroup.com