आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेल खेल में

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाळेचे भलेमोठे मैदान, त्या मैदानाच्या मधोमध ठेवलेल्या लगोऱ्या. मैदानात धावणारे २१ ते ५७ वर्षांचे स्पर्धक. दोन संघात रंगलेला लगोरीचा डाव. त्यांना चिअर अप करणारी लहान मुलं... हे एखाद्या चित्रपटातील दृश्य नाही, तर हे प्रत्यक्षात अनुभवलं आहे अकोल्यामधल्या शाळेतील शिक्षकांनी. शहरातील निशू नर्सरी अॅन्ड कोठारी कॉन्व्हेंट येथे शिक्षकांच्या सर्वांगीण विकासासाठी नियमित उपक्रम राबवले जातात. शाळा यंदा क्रीडा वर्ष साजरे करत असल्याने, शिक्षक दिनानिमित्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. कुठलेही बंधन, वयाची आडकाठी न ठेवता, मैदानात खेळ खेळताना धम्मश्री ब्रजलाल बियाणी विद्या निकेतन द्वारा संचालित निशू नर्सरी अॅन्ड कोठारी कॉन्व्हेंटमध्ये शिक्षकांच्या विकासावर बराच भर दिला जातो. शिक्षकांच्या सहली, कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम, रीडर्स क्लब, भजन स्पर्धा असे बरेच उपक्रम अनेक वर्षांपासून सुरू आहेत. क्रीडा वर्षानिमित्त शाळेत सर्वत्र लोगो, ‘सर्वदा वरदा क्रीडा’ ही टॅगलाइन झळकत अाहे. प्रत्येक शिक्षक दिनाला तयार होणारे शिक्षकांचे हस्तलिखित ‘अंतर्नाद’ हेदेखील या विषयावरच तयार करण्यात आले आहे. शाळेने पारंपरिक खेळांना विशेष महत्त्व दिले आहे. शाळेतील ६४ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कॅरम, बुद्धिबळ, लगोरी, संगीत खुर्ची, फास्ट वॉक रिले या स्पर्धा घेण्यात आल्या. लहानपणी खेळताना कोणी फसवलं, किंवा आपण बाद नसलो तर कसे भांडतो, आपला संघ जिंकावा म्हणून कसे एकमेकांना प्रोत्साहन देत असतो, तसेच शाळेच्या मैदानावर घडले. खेळातला आनंद, बालपण जगण्याची प्रत्येकाची धडपड होती. शाळेतील प्रत्येक शिक्षक या खेळानंतर खूप सकारात्मक ऊर्जेने रिचार्ज झाले. आपल्यातील सद‌्गुणांना वृद्धिंगत करणाऱ्या खऱ्याखुऱ्या गोष्टींचा अनुभव घेता आला. पुन्हा नव्याने बालपण जगता आले, अशा शब्दांत शिक्षक त्यांच्या भावना व्यक्त करतात. काहींनी यावर चक्क पुस्तक लिहिता येईल, इतका मोठा अनुभव असल्याचं सांगितलं. स्पर्धा घेऊन, बक्षीस देऊन हा उपक्रम संपणार नाही; तर या स्पर्धांमुळे शिक्षकांमधील कौशल्य, त्यांचे गुण समोर आले. त्यांना विकसित करण्याचे काम शाळा करणार आहे. तसेच शिक्षकांच्या कक्षात कॅरम बोर्ड, चेस बोर्ड नियमित असणार आहे. शिक्षकांनी त्यांच्या मोकळ्या वेळात अावडीचे खेळ खेळावे, हाच त्यामागील उद्देश. शिवाय शाळेत दरवर्षी होणाऱ्या आंतरशालेय सायन्स मीटमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणेच आंतरशालेय शिक्षकांसाठीदेखील स्पर्धा घेण्याचा शाळेचा मानस आहे. येत्या काही दिवसांत पालकांसाठीही विविध खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. मुलांसाठी दोन दिवसीय पारंपरिक खेळांची प्रशिक्षण कार्यशाळा होणार आहे. यात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आबाधुबी, कंच्या, लगोरी, बंधळी साखळी, लपाछपी, डिग्गर, अंडा फोडणी, नदी का पहाड, गारगोट्या, चंपूल असे पारंपरिक खेळ शिकवण्यात येणार आहेत. टीव्ही पाहू नका, मोबाइल, कॉम्प्युटरवर तासन् तास खेळू नका, असे मुलांच्या मागे ओरडण्यापेक्षा हे खेळ आहेत ते खेळा, असे सांगणे कधीही योग्य. फारशी साधनसामग्री न वापरता हे खेळ खेळता येत असल्याने आजच्या पिढीला ज्या खेळांचे नावही माहीत नाही ते त्यांच्यापर्यंत पोहोचावे, हा यामागचा उद्देश आहे. या कार्यशाळेतसुद्धा शिक्षकच मुलांना त्यांच्याएवढे होऊन शिकवणार आहेत. शिवाय शाळेत मुलांना नि:शुल्क रोप मल्लखांबाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
hiral.gawande@dbcorp.in
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फटो...
बातम्या आणखी आहेत...