आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hiral Gawande Story About Women Studying Forensic Science

आव्हानात्मक फिल्डची वाढती क्रेझ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टिव्हीवरच्या सीआयडीमधील डॉ. साळुंखे, डॉ. तारिका यांना फॉरेन्सिक लॅबमध्ये काम करताना पाहून सहज मनात येतं की, कसलं भारी काम आहे, रियलमध्ये असंच होत असेल का? याच विचार आणि उत्सुकतेनं सध्याची यंग जनरेशन फॉरेन्सिक सायन्सला प्रवेश घेऊन करिअरची वेगळी वाट निर्माण करताना दिसत आहे. अर्थात साधारण दशभरापूर्वी जिथं मेट्रो सिटीतल्या मुला-मुलींसाठी हा विषय नवीन होता, तिथं लहान शहरांबद्दल तर बोलायलाच नको. मात्र हल्ली गावात अशा वेगळ्या विषयांची निवड करण्याकडे विद्यर्थ्यांचा वाढता कल दिसून येतो आहे. अकोला शहराच्या आजूबाजूच्या अनेक गावांतील मुलींनीही अशी वेगळी वाट निवडण्यास प्राधान्य दिले आहे. या वर्षी नव्यानेच अकोल्यात सुरू झालेल्या फॉरेन्सिक सायन्स शाखेला प्रवेश घेणाऱ्या मुलींची संख्या पाहून मुलींमध्ये आव्हानात्मक फिल्डची वाढती क्रेझ सहज लक्षात येते.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांर्तगत येणाऱ्या अनेक महाविद्यालयांपैकी फक्त अकोल्यातील एकमेव शिवाजी महाविद्यालयात बी. एस्सी.ला हा विषय देण्यात आला आहे. विदर्भाचा विचार केला तर फक्त नागपूरला याचे स्पेशल इन्स्टिट्यूट आहे. रेग्युलर घेतल्या जाणाऱ्या विषयांची निवड न करता आता काहीतरी हटके करण्याचा विचार सध्याची तरुणाई करत असल्यामुळेच शहरात सुरू झालेल्या फॉरेन्सिक विषयाच्या संपूर्ण ४० जागा लगेच भरल्या गेल्या. विशेष म्हणजे, यात २० मुलींचा समावेश आहे. अमरावती, वाशिम जिल्ह्यातील सोंडा, अंजनगाव तालुक्यातील सातेगाव, अकोट, अंजनगाव, नांदूरा, अकोट तालुक्यातील मरोडा, बाळापूर, वाशिम अशा लहान गावांतील मुलींनीसुद्धा याला प्रवेश घेतला आहे, हे विशेष. आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावूनच नव्हे तर त्यांच्या एक पाऊल पुढे जाऊन काम करत आहेत. फॉरेन्सिक म्हटले की, त्याचा थेट संबंध हा गुन्ह्याशी येतो. मग मुली येथे कसे काम करणार, हे मुलींचे क्षेत्र नाही, असा पवित्रा लहान शहरातील, गावातील लोकांचा आजही आहे. मात्र त्याला थोडी बगल देत मुली नवीन विचार करायला आणि ते पालकांना पटवून द्यायला लागल्या आहेत.

शिवाजी महाविद्यालयात हा विषय सुरू झाला तेव्हा अॅडमिशन होतील का, हाच प्रश्न होता. पण फार कमी वेळात सर्व जागा भरल्या. त्यासाठी पालकांचं समुपदेशन करावं लागलं, पण पालकांनी या विषयाला सकारात्मक पद्धतीने घेतल्याने मुलींचा आत्मविश्वास वाढला. शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष भडांगे, विषयाचे समन्वयक डॉ. संतोष बदणे, साहायक प्राध्यापक संदीप सल्लावाड यांनी पालकांना विषय समजून सांगणे, यातील करिअर यावर समुपदेशन केले.
गुन्ह्याचा छडा लवकर लागावा यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक फॉरेन्सिक लॅब असावी, असा शासनाचे धोरण आहे. धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्यानंतर स्थानिक विद्यार्थ्यांनादेखील रोजगाराची संधी, त्यांच्या टॅलेन्टला योग्य न्याय दिला जाऊ शकतो. फॉरेन्सिक विषय ऐकून वेगळा वाटत असला तरी याचा अभ्यास करताना भन्नाट अनुभव येतात. काहीतरी हटके केल्याचा फिल येतो, असे मत विद्यार्थिनींनी व्यक्त केले. फक्त अपघात, खून अशा प्रकरणातच फॉरेन्सिकचे काम असते असे नाही; तर सायबर क्राइम, पकडलेला अवैध दारू साठा अशा प्रत्येक गुन्ह्यात तपासणीसाठी फॉरेन्सिकची मदत घ्यावीच लागते. गुन्हा झाल्यानंतर पुरावा गोळा कसा करायचा, त्याचे पॅकींग कसे करायचे, त्यात प्रिझर्व्हेटिव्ह‌्ज कोणते आणि किती प्रमाणात टाकायचे, हे सर्व अभ्यासक्रमांतर्गत शिकवले जाते. एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना आपण साहाय्य केलं, याचे समाधान, तो विचारच भारी वाटतो, असे विद्यार्थिनी म्हणाल्या. हा विषय नुसता पुस्तकात शिकून होत नाही, तर प्रत्यक्ष प्रयोगही करावे लागतात. हे विद्यार्थी सरावासाठी म्हणून ठिकठिकाणचे फिंगर प्रिंट, टायरचे प्रिंट जमा करताना दिसतात, त्या वेळी महाविद्यालयातील इतर विद्यार्थी त्यांच्याकडे कुतूहलाने पाहतात.
हिरल गावंडे, अकोला
hiral.gawande@dbcorp.in