आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काम नसेल तर आजारी वाटतं

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलींच्या शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या व त्यासाठी एकाहत्तराव्या वर्षीही देशभर प्रवास करणाऱ्या डाॅ. ताराबाई हातवळणे यांच्या कामाचा व्याप पाहिला की, वय हे निव्वळ आकडा असल्याची जाणीव होते.
 
घर, नोकरी सांभाळता सांभाळता समाजासाठी काम करायला, स्वत:ची आवड जपायला वेळच मिळत नाही अशी कुरूबुर अनेक महिला करताना पाहायला मिळतात.  शिवाय ‘आता माझं वय आहे का काम करण्याचं,’ असं पन्नाशीतील महिला सांगताना दिसतात. पण “ज्या दिवशी मी काम करत नाही त्या दिवशी मी आजारी पडते,” हे वाक्य आहे अकोल्यातील ७१ वर्षांच्या डॉ. ताराबाई हातवळणे यांचे. सत्तरी पार केली असली तरी आजही ताराबाई एखाद्या २० वर्षाच्या तरुणीसारख्या सर्व कामे करतात. 
 
डॉ. ताराबाई अविनाश हातवळणे हे अकोल्याच्या शिक्षणक्षेत्रातील मोठे नाव. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या ताराबाई म्हणजे महिला व मुलींसाठी ऊर्जेचा स्त्रोत आहेत. सध्या त्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष आहेत. शिवाय विद्या भारती अखिल भारतीय संघटनेचे नागपूर प्रांताचे काम पाहतात. यासोबतच बालिका शिक्षणाच्या त्या पश्चिम क्षेत्राच्या संयोजिका आहेत, यात विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, गुजरात, गोवा यांचा समावेश होतो. गुजरातेतील पुनरुत्थान विद्यापीठाच्या कार्यकारिणीत त्या असून भारतीय संस्कृती, विचार, मूल्यांवर आधारित शिक्षण यावर त्यांचे संशोधन, लेखन सुरू आहे. राष्ट्रीय शिक्षण या विषयावर सध्या त्या ग्रंथ लिहीत आहेत. हा ५ ग्रंथांचा संच हिंदी, मराठी आणि गुजराती भाषेत लिहिणं सुरू असून डॉ. ताराबाई मराठीमध्ये लिहित आहेत. यातील ४ ग्रंथ लिहून पूर्ण झाले असून पाचव्या ग्रंथांचे काम सुरू अाहे. येत्या सप्टेंबरमध्ये दिल्लीत याचे प्रकाशन होणार आहे. याशिवाय पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शंभरहून अधिक संदर्भ पुस्तकांचे काम केले आहे. काही पुस्तकं स्वत: लिहिलीत, काहींचे अनुवाद केले आहेत. यासोबतच ‘बालिका शिक्षण तत्त्व व व्यवहार’ हे त्यांचे पुस्तक शाळेतील मुलींसाठी, शिक्षक, पालकांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. शिक्षण क्षेत्रात ३८ वर्षांपासून सुरू केलेल्या या कार्याला कधीच कुठेच ब्रेक लागलेला नाही. सत्तरी पार केली तरी एक बाई एवढं काम कसं करू शकते, असा विचार सहज डोकावला, तरी त्यांच्याकडे पाहून ते जाणवत नाही. सतत उत्साही, हसरा चेहरा, काम करण्यासाठी धडपड पाहून आपण म्हाताऱ्या झालो की काय, असा विचार मात्र नक्की मनात डोकावतो. दहावी झाल्यानंतर १९६५मध्ये ताराबाई यांचे लग्न अविनाश हातवळणे यांच्याशी झाले. मलकापूर येथे सासरी गडगंज श्रीमंती असल्याने तसे फारसे काम करण्याची गरज नव्हती. पतीही नोकरी करत नव्हते. परंतु असे घरच्यांच्या भरवशावर जगणे ताराबाईंना असह्य झाले. त्यांनी शाळेत शिकवण्याचा निर्णय घेतला आणि १९६९मध्ये अकोला गाठून शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेत पाचवीच्या मुलांना शिकवायला सुरुवात केली. 
 
दुसरीकडे स्वत:ही शिकायला सुरुवात केली. दरम्यान पतीदेखील महावितरणमध्ये नोकरीला लागले. लहान मुलं, नोकरी आणि शिक्षण ही तारेवरची कसरत करताना त्यांना भक्कम आधार दिला तो त्यांचे आईवडील व सासूसासऱ्यांनी. बीए केलं तशी त्यांची नोकरीत बढती झाली आणि त्या हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शिकवू लागल्या. १९७५मध्ये समाजशास्त्रात एमए केलं आणि कनिष्ठ महाविद्यालयातील मुलांना शिकवू लागल्या. नंतर शंकरलाल खंडेलवाल सिनिअर कॉलेज सुरू झालं तसं त्या सिनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र व समाजशास्त्र हे विषय शिकवायला लागल्या. पदव्युत्तर शिक्षणानंतर नागपूर विद्यापीठात पीएचडीसाठी अर्ज केला.  या काळात पतीचेही अकाली निधन झाले, अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागले, सगळे सुरळित नाहीच झाले, परंतु ताराबाईंनी त्यातूनही मार्ग काढलाच आणि पीएचडी पूर्ण केली. १९९६ साली बालिका शिक्षणातून समाजाचा दृष्टीकोन बदलावा या उद्देशाने त्यांनी विद्याभारतीचे काम सुरू केले. महाविद्यालय, घर, आणि शिक्षण क्षेत्रातील हे नवे काम अशा तिहेरी भूमिका त्या सांभाळत होत्या. २००१मध्ये त्यांनी महाविद्यालयातून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्ण वेळ विद्याभारती, बालिका शिक्षण, पुनरुत्थान विद्यापीठाचे काम सुरू केले. तसंच, तळागाळातील महिलांना आर्थिक साह्य मिळावे या उद्देशाने सखी महिला नागरी पतसंस्था सुरू केली. पतसंस्थेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आणि बालिका शिक्षणाच्या माध्यमातून बालिका, पालक, शिक्षकांना मानसिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या सक्षम करण्याचे काम त्या अविरतपणे करत आहेत.  हा प्रवास त्यांच्या एकटीचा नाही. यात त्यांना नेहमीच साथ मिळाली ती मोठा मुलगा प्रतुल व सून अश्विन, मधला मुलगा सुनील व सून मीनाक्षी आणि धाकटा मुलगा प्रवीण व सून प्रणाली यांच्यासह सर्व नातवंडांची. मोठी सून अश्विनी जेव्हा अकोलाची महापौर झाली त्यावेळी नातवाला सांभाळण्यासाठी अडीच वर्षे ताराबाईंनी काम बंद करून पूर्ण वेळ घर सांभाळले.  वाचन, लेखनाचे प्रचंड वेड असलेल्या डॉ. ताराबाई सतत कोणत्या ना कोणत्या कामात व्यग्र असतात. आराम करणे म्हणजे झोप काढणे नाही, तर कामात बदल करणे म्हणजे विश्रांती, असे त्या मानतात. ताराबाईं आजही सगळा प्रवास ऑटो रिक्शा, बस आणि रेल्वेनेच करतात. रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी पहाटे पाचला उठून किमान २० ते २५ मिनिटं चालतात. ज्या दिवशी काही काम नसेल त्या दिवशी आजारी असल्यासारखं वाटतं, असे त्या म्हणतात. आजही त्या देशभर एकट्या प्रवास करतात. सहप्रवाशांसोबत बालिका शिक्षणावर गप्पा करतात. भाषांतर हे त्यांचे आवडते काम. एका दिवसात जवळपास २० ते २५ पाने त्या भाषांतर करून हाताने लिहीतात. एकीकडे  हिंदी वाचायचं आणि दुसरीकडे मराठीत लिहायचं ही त्यांची पद्धत. ताराबाईंकडे पाहून आपल्या वयाचा, थकव्याचा विचार करणं किती चुकीचं आहे, ते जाणवतं.
 
hiral.gawande@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...