आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Historical Documents In Solapur, Lord Ganesh Literature

सोलापुरात ऐतिहासिक कागदपत्रे, धार्मिक, पोथ्या, हस्तलिखिते यांचा साठा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूरचे साहित्यिक व सांस्कृतिक भूषण कवीराय रामजोशी यांचे वंशज जोशी घराण्याकडे आज मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक कागदपत्रे धार्मिक, पोथ्या, हस्तलिखिते यांचा साठा आहे. त्या वेळी त्या पुस्तकाची किंमत एक आणा होती. मुहूर्तचिंतामणी या 200 वर्षांपूर्वीच्या जीर्ण हस्तलिखितात सकाळी कोणत्या प्राण्याचे दर्शन घेतल्यावर काय लाभ होतो,याची माहिती दिलेली यात श्रीगणेश माहात्म्याबाबतही काही दुर्मिळ पुस्तके आहेत. येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या प्राचीन गणेश साहित्याचा घेतलेला आढावा.....


दीडशे वर्षांपूर्वीचे गणेश अथर्वशीर्ष उत्तम अवस्थेत :
श्रीगणेश हे आद्य दैवत. त्यांच्या महात्म्य व भक्तीमहिमेबाबतचे साहित्य हे देशात अनेक संग्राहकांकडे असेल. सोलापुरातही किरण जोशी यांच्याकडे हजारो ऐतिहासिक कागदपत्रांचा जो साठा आहे, त्यात श्रीगणेशाबाबतची काही दुर्मिळ पुस्तके पाहण्याचा योग आला. सध्या अध्यात्मातही अनेकविध प्रकारचे साहित्य येत आहे. पण सध्याच्या पिढीतील अभ्यासकांनाही मार्गदर्शक ठरतील, इतिहासतज्ञांना आवश्यक ठरतील अशी पुस्तके जोशी यांच्याकडे आहेत.


अन्य प्राण्या नाही तुम्ही दिली वाचा, केवढा देवांचा उपकार, विचारांची शक्ती तुम्हा दिली युक्ती, त्याची करा भक्ती सर्वकाळ...अशा आशयाची पन्नासवर गोड भजनांचे 1898 मधील पुस्तक यात पाहायला मिळाले. गणपती भजन असे या 115 वर्षांपूर्वीच्या पुस्तकाचे नाव असून, त्याची छपाई अजूनही खराब झालेली नाही.


सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढयाचे बाळकृष्ण हरी कानिटकर मामलेदार यांनी पंढरपुरातील विठ्ठलप्रसाद छापखान्यात हे पुस्तक छापविल्याचा उल्लेख आहे. त्या वेळी त्या पुस्तकाची किंमत एक आणा होती. मुहूर्तचिंतामणी या 200 वर्षांपूर्वीच्या जीर्ण हस्तलिखितात सकाळी कोणत्या प्राण्याचे दर्शन घेतल्यावर काय लाभ होतो,याची माहिती दिलेली असली तरी या हस्तलिखिताच्या नावातच चिंतामण नाव हे गणेशाचे माहात्म्य दर्शविते. 150 वर्षापूर्वीचे गणेश अथर्वशीर्ष अजूनही चांगल्या अवस्थेत आहे.


1904 मधील गणपती
मेळ्यांची पदे :

महोत्कट विनायक हे 1950 च्या सुरतमध्ये छापलेल्या पुस्तकात गणेश अवतारांसबंधी माहिती आहे. श्रीगणेशाने कोणत्या राक्षसाचा वध कधी व कसा केला व त्याच्या महोत्कट अवतार कार्याची माहिती तीन खंडात आहे.
1904 चे गणपती मेळ्यांची पदे हे चौथ्या आवृत्तीतील एक आण्याचे पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण ठरावे. या पुस्तकात गुजराती नाटकातील गणेशवंदना असून, त्यात 24 पदे आहेत. अनंतव्रताला आपल्याकडे मोठे महत्त्व आहे. गणेशविसर्जनाच्या दिवशी अनंतपूजा अनेक ठिकाणी करतात. अनंतपूजा हे 1905 साली छापलेले पुस्तक त्यांच्या संग्रहात आहे. लक्ष्मण बाळकृष्ण नेटिव्ह ओपिनियन मुद्रणालय येथे हे पुस्तक छापल्याचा उल्लेख आहे. गणेशात्सवातच गौरीपूजन असते. याची महती सांगणारे ज्येष्ठा लक्ष्मी कथा हे 150 वर्षांपूर्वीचे हस्तलिखीतही त्यांच्या संग्रहात असल्याचे त्यांनी सांगितले.


हजार वर्षांपासूनची दुर्मिळ हस्तलिखिते व
मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रे :

या सर्व कागदपत्रांची देखरेख महत्त्वाची असल्याचे सांगताना किरण जोशी म्हणाले की, श्रीगणेश माहात्म्याव्यतिरिक्त हजार वर्षांपासूनची दुर्मिळ हस्तलिखिते व मोडी लिपीतील ऐतिहासिक कागदपत्रे आपल्या संग्रहात आहेत. ही सर्व कागदपत्रे बदलत्या हवामानात टिकून राहणे महत्वाचे आहे. त्याला वाळवी लागता कामा नये,याची पूर्ण दक्षता घ्यावी लागते. संदर्भासाठी अनेक अभ्यासक व पीएचडी करणारे आपल्याशी संपर्क साधतात. एक प्राचीन साहित्य म्हणून याचे महत्त्व कोणीही मान्य करेल. ही हजारो कागदपत्रे व्यवस्थित राहावीत, अभ्यासकांना संदर्भ पाहता यावेत, यासाठी एक पाच मजली वस्तुसंग्रहालय बांधण्याचे काम सध्या सोलापुरात चालू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर अभ्यासकांना ती जणू मेजवानी ठरेल.