आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहरांची त्रिचित्रधारा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इतिहासात झालेल्या चुका पुन्हा टाळण्यासाठी इतिहासाचा अभ्यास करणे आवश्यक असते, तसेच राष्ट्राभिमान जागविण्यासाठी आपला इतिहास, स्वातंत्र्यलढा ठाऊक असणे गरजेचे असते, असे सर्वसाधारणपणे शाळेतील बुकं शिकवताना सांगितले जाते. इतिहास ठाऊक असण्याची वा शिकण्याची ही निकड आजच्या तरुणाला वाटते की नाही, हा भाग अलाहिदा. पण एखाद्या अन्याय्य घटनेला उत्तर देताना हाच तरुण त्याच्या नकळत इतिहासाची पुनरावृत्ती करू शकतो, ही एक बाब राकेश ओमप्रकाश मेहरांनी आपल्या चित्रपटासाठी हेरली. त्याला एका वास्तव घटनेचा आधार दिला आणि त्यातून 2006 मध्ये ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट आकाराला आला. लाला लजपतराय, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग यांच्या इतिहासाशी ‘रंग दे बसंती’ ची समकालीन कथा जोडली गेली आणि एका वेगळ्याच परिप्रेक्ष्यातून राष्ट्रभक्तीची व्याख्या मांडली. आजच्या तरुणाला न्याय्य पद्धतीने स्वातंत्र्य हवे आहे, न्याय्य जगणे हवे आहे आणि त्यासाठी तो प्रसंगी बंडही पुकारू शकतो, ही सर्वपरिचित बाब चित्रपटातून दाखवताना मेहरांनी वेगळेपण काय जपले, याचा जर विचार केला तर पुस्तकात अडकलेल्या स्वातंत्र्यलढ्याच्या अनेक चौकटी राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी आधुनिक काळाशी जोडल्या. लोकशाही पुरस्कर्त्या देशात हुकूमशाही करणार्‍यांचा आदर वा गय केली जाणार नाही, हे सूतोवाच करताना तरुणांची रिअ‍ॅक्ट होण्याची पद्धत त्यांनी टिपली आणि त्यातून आकारास आली मेहताकृत त्रिचित्रधारा...
वस्तुत: क्रांतीचा एक मार्ग या चित्रपटात मेहरांनी दाखविला असला तरी त्यात येणार्‍या अडथळ्यांना जशास तसे उत्तर देणे हाच त्याचा प्रभावी मार्ग असू शकत नाही वा तेवढ्यापुरतेच तरुणांचे आयुष्य मर्यादित असू शकत नाही, याची त्यांना जाण आहे. त्यामुळे ‘रंग दे बसंती’मध्ये तरुणाची संवेदनशीलता, सामाजिक आयुष्य जगतानाच्या विविध जबाबदार्‍या आणि वयानुसारचा हुल्लडपणाही दाखविण्यास मेहरा विसरत नाहीत. याच चित्रपटात आपल्याकडील शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करताना मेहरा वर्षानुवर्षे पारंपरिक चौकटीत अडकलेल्या ‘मार्कशीट’ पद्धतीवर बोट ठेवतात. याच शैक्षणिक व्यवस्थेच्या फोल ठरलेल्या भविष्यविषयक तरतुदींबद्दल मेहरांनी एके ठिकाणी म्हटले होते, ‘उद्या रवींद्रनाथ टागोर ‘गीतांजली’ घेऊन एखाद्या कंपनीत नोकरीकरिता गेले तर ‘इतके महान लेखन करणे चांगले आहे, जे इतर कुणीही करू शकणार नाही. पण तरी तुमचे मार्कशीट कुठे आहे?’ अशी टागोरांनाही विचारणा होईल.’ मेहरांनी नेमका हाच प्रश्न ‘रंग दे बसंती’मधून उपस्थित केल्याने मेहरांचा दिग्दर्शकीय दृष्टिकोन चित्रपटाला यश देणारा ठरला. इतर चित्रपटांमध्ये भरला जातो तो मसाला याही चित्रपटात होता, पण त्याने संपूर्ण चित्रपटाचा अवकाश व्यापला नाही, हेही विसरून चालणार नाही.
यानंतर मेहरांचा चित्रपट येतो तो ‘दिल्ली-6’. इथे मात्र क्रांती, न्यायाविरुद्ध लढा अशी तरुणाची भाषा अजिबात नाही. रोजच्या जगण्यामध्ये आधुनिकता स्वीकारलेल्या व देशाबाहेरचे जग पाहिलेल्या वा ते अनुभवलेल्या तरुणाला आपल्याच शहरातील परंपरा, त्यांचे अर्थ, त्यातून निर्माण होणारी वा उद्ध्वस्त होणारी नाती, शहराची देशाशी जोडलेली नाळ, श्रद्धा-अंधश्रद्धा समजून घेताना अनेकदा जो भावनिक-मानसिक संघर्ष करावा लागतो त्याचे चित्रण हा चित्रपट करतो. इथे राहण्यासाठी माणसाला परंपरा, जातिव्यवस्था, संस्कृती, समूह भावना आदींचा विचार करत जगावे लागते. तरच इथे रमता येते, नाहीतर वेगळेपणाची भावना ओझ्यासारखी सतत खांद्यावर वागवावी लागते, हे जगण्याचे तत्त्व मांडताना दुसरीकडे याच जगण्याची फोल बाजू ‘काला बंदर’ या अफवेमुळे निर्माण झालेल्या माकडाच्या माध्यमातून मेहरा चित्रपटातून दाखवतात. या चित्रपटालाही त्या वेळी दिल्लीत गाजलेल्या एका अफवेचा संदर्भ आहे. पण अर्थात काला बंदर हे प्रतीक म्हणून मेहरांनी वापरले. प्रत्येकाच्या मनात लपलेली एक वाईट प्रवृत्ती काळ्या सावलीसारखी त्याच्यासोबत वावरत राहते, त्यातून भेदभाव वा अन्य सामाजिक समस्या उभ्या राहतात, ज्या वर्षानुवर्षे परंपरा म्हणूनही वागवल्या जातात. हे दाखवताना चित्रपटाच्या नायकाला दिल्लीतील विविधतेचे झालेले आकलनही मेहरा तितक्याच नाजूकपणे व संवेदनशीलतेने मांडतात. त्यामुळे आपल्या देशाचा अपरिचित सामाजिक-सांस्कृतिक चेहराच तरुणाच्या नजरेतून समोर येतो.
आत्मकेंद्रित म्हणवल्या जाणार्‍या तरुणाच्या समूहशक्ती व संवेदनशीलतेवर तसेच त्याच्या सामाजिक-सांस्कृतिक दृष्टिकोनावर या दोन चित्रपटांमधून प्रकाश टाकताना मेहरा राष्ट्रभक्तीची व देश नावाच्या संकल्पनेची एक आजच्या काळातल्या पिढीला पचेल, रुचेल अशी परिभाषा मांडतात. अर्थात, हे सगळे जसे आहे तसेच मेहरा मांडतात, असे म्हणता येत नाही. पण जे आहे, त्यावर सिनेमाच्या कलात्मक चौकटीतून भाष्य करताना मेहरा फिल्मी फँटसीच्या जगात प्रेक्षकाला नेत नाहीत.
याच तरुणाला स्फुरण देणार्‍या खर्‍याखुर्‍या कथा याच देशात अस्तित्वात आहेत, याचे एक उदाहरण मेहरा यांनी सध्या गाजत असलेल्या ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातून घालून दिले आहे. पण केवळ एका धावपटूचा स्फूर्तिदायी प्रवास उलगडणे, हा या चित्रपटाचा उद्देश नाही. भारत-पाकिस्तान फाळणीचा एक अत्यंत गडद संदर्भ चित्रपटभर मेहरांनी दाखविला आहे. मिल्खासिंग यांच्या जगण्याचा एक वेदनादायी भाग म्हणून जरी हा संदर्भ असला तरी मेहरांनी तो केवळ त्यांचे आयुष्य उलगडविण्यापुरता मर्यादित ठेवलेला नाही. चित्रपटाची सुरुवातच फाळणीच्या वेळी उसळलेल्या दंगलीतील आठवणीमुळे रोम ऑलिम्पिकमधील मिल्खा यांच्या पराभवापासून होते. सुरक्षित जगणे ही माणसाची मूलभूत गरज फाळणीमुळे हिरावली गेल्याचा दंगलींचा काळ देशाचे एक वेगळेच वास्तव अधोरेखित करतो, ही बाब मेहरांनी अत्यंत महत्त्वपूर्ण समजून-उमजून चित्रपटामध्ये वापरली. देशाभिमान केवळ भावना, विचारांतून वा उदात्त प्रेरणांतून जागा होऊ शकत नाही, त्यासाठी त्या देशात सन्मानाचे, सुरक्षेचे जगणे गरजेचे असते, हा विचार मेहरांनी चित्रपटाच्या अशा क्रमपद्धतीतून मांडला आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाचा काळ जुना असला तरी त्यातील सगळ्याच बाबी या आजच्या तरुणाला प्रेरणा देतील, अशाच पद्धतीने मेहरांनी साकारल्या आहेत. या चित्रपटाने ‘रंग दे बसंती’, ‘दिल्ली-6’ या चित्रपटांनंतरचा राष्ट्रविषयक एक राजकीय-सामाजिक दृष्टिकोन मेहरा यांनी मांडला आहे. तिन्ही चित्रपटांमध्ये मेहरांचे फ्रेम्स मांडण्याचे कौशल्य दिसून येते. माणसाची आंतरिक वेदना, प्रेरणा यांचे दृश्य स्वरूप टिपताना मिल्खासिंग यांच्या मनात रुतून बसलेला कत्तल करणारा घोडेस्वार चित्रपटाची संवेदनशीलता अधिक गडद करत जातो आणि एरवी फक्त प्रेमकथा, डिस्को, मॉडर्निटीची उथळ भाषा करणार्‍या सिनेमांपेक्षा मेहरांचे चित्रपट एक राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक भान निर्माण करतात. म्हणूनच मेहरांच्या चित्रपटांना केवळ तांत्रिक व मनोरंजनपर वर्गात टाकता येत नाही; हे चित्रपट स्वतंत्र दृष्टिकोन देतात, हे अमान्य करता येत नाही!