आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठीच्या मौखिक परंपरेचाही विचार व्हावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठीच्या अभिजाततेसाठी शासकीय पातळीवर जसे प्रयत्न चालू आहेत, तसे प्रयत्न विद्यापीठे, साहित्य संस्था, ग्रंथालये, वाचक चळवळी, सामान्य मराठी माणूस यांनीही करणे आवश्यक आहे. मराठी भाषेला मोठी परंपरा आहे. चौथ्या शतकात एरणगाव येथे सापडलेल्या शिलालेखात महाराष्ट्र असा उल्लेख आहे. आठव्या शतकातील ताम्रपटातही मराठीचे उल्लेख आहेत. श्रवणबेळगोळ आणि कुडल संगम येथे सापडलेल्या शिलालेखातही मराठी भाषा आहे. हे सर्व मराठी भाषेच्या अस्तित्वाचे पुरावे आहेत. भाषेतील विद्वानांनी मराठीचा धागा अगदी मागेपर्यंत नेऊन दाखवला. या संदर्भात राजारामशास्त्री भागवत, इतिहासाचार्य वि.का.राजवाडे यांच्या कार्याचा जरूर उल्लेख करता येईल. इ.स.पूर्व 600 ते 800 या काळातील व्याकरणकार वररूचि यांचे कार्य, उद्योतनसुरी याचा वलयमाला हे ग्रंथ मराठीच्या अभिजाततेबाबत अभ्यासावे असे आहेत.

आठव्या शतकात मराठी ही लोकव्यवहाराची भाषा होती. गाथा सप्तशती, महानुभावांचे गद्य व पद्य वाङ्मय, लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, नरेंद्रकृत रुक्मिणी स्वयंवर हे मराठीतील अभिजात ग्रंथ हे या भाषेचे भूषण आहे. या ग्रंथांना जागतिक पातळीवरही अभ्यासकांनी गौरविले आहे. महानुभव आणि वारकरी पंथांची भाषा मराठी आहे. या दोन्ही पंथांच्या संस्थापकांनी 700 ते 725 वर्षांपूर्वी मराठीचा आग्रह धरला होता. लाखो वारकर्‍यांच्या तोंडी संतांचे अभंग शेकडो वर्षांपासून आहेत. शिवाय महानुभव पंथाचा आद्य लीळाचरित्र ग्रंथ हा परकीयांच्या आक्रमणात हरविला होता. तेव्हा हिराइसा या अनुयायीने हा ग्रंथ मुखोद्गत करून ठेवलेला असल्यामुळे लीळाचरित्र माहीत झाले. मौखिक परंपरेचा एवढा इतिहास महानुभाव आणि वारकरी संप्रदायाला असल्याने मराठी भाषेची अभिजातता ठरविताना या मौखिक परंपरेचा विचार होणे आवश्यक आहे. भाषेतील साहित्याला किती पुरस्कार मिळाले यावरून तिची अभिजातपणा ठरवू नये हे सांगताना डॉ.प्रा.सुहास पुजारी म्हणाले की, शेवटी अभिजात साहित्य चिरंतन असते. ते लोकांच्या मनात कायम असते. पुरस्कार मिळो अथवा ना मिळो,लोकजीवनाला दिग्दर्शन करण्याचे कार्य श्रेष्ठ ग्रंथच करत असतात. एकूण 42 बोलीभाषा आहेत.त्या बोलीभाषांचाही विकास होणे आवश्यक आहे. भाषांतर्गत अनुवादित साहित्याचे आदानप्रदान व्हायला हवे. अंदाजे साडेसहा कोटी मराठी भाषक आहेत,जगात मराठी ही दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. या सर्व वैशिष्ट्यांचा विचार करून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गतिमान प्रयत्न करावेत.