आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईच्या बहुपेडी इतिहासाचे दर्शन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईबद्दल प्रेम, आकर्षण, औत्सुक्य, अभिमान अशा वेगवेगळ्या भावना असणारे असंख्य लोक मुंबईबाहेर व भारताबाहेरही पसरलेले आहेत. महाराष्‍ट्राची राजधानी असली तरी तिच्यावर प्रेम करणारे व तिचा इतिहास गर्वाने सांगणारे (व लिहिणारे) खूप आहेत. मुंबईवर जितकं वैविध्यपूर्ण लिखाण इंग्रजीत झालं असेल, तेवढं दिल्ली, मद्रास, कोलकाता या इतर भारतीय महानगरांवर झालं असावं असं वाटत नाही. परदेशात मात्र शहरांवर संशोधन करून लिहिण्याची चांगली व समृद्ध परंपरा आहे. भारतातही ती गेल्या काही वर्षांत सुरू झाल्याचं दिसतं. इंग्रजीत हे प्रमाण किंवा संशोधन जास्त होत असल्याचं जाणवतं.


मुंबईवर अनेक वर्षांपूर्वी जे. एफ. बलसारा यांनी ‘बॉम्बे - ए सिटी इन द मेकिंग (1948); ‘बॉम्बे आफ्टर डार्क’ हे एका अमेरिकन लेखकानं अ‍ॅलन व्ही. रॉस या टोपणनावाने लिहिलेलं प्रवासवर्णन असो, किंवा सलमान रश्दी यांचं ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’, किंवा ‘झीरो पॉइंट बॉम्बे’ (संकलन) असो, वा सुकेतू मेहता यांचं ‘द मॅक्झिमम सिटी’ असो किंवा आजकालचे पत्रकार-लेखक जसे कल्पना शर्मा (धारावी) वा हुसेन झैदी (ब्लॅक फ्रायडे) यांची ताजी पुस्तके असोत; सगळ्यांनी मुंबईवर वेगवेगळ्या नजरेतून, अनुभवातून खूप काही लिखाण केलं आहे. मी स्वत: मुंबईवर तसेच अन्य अनेक शहरांवर लिहिलेली पुस्तके वाचत असतो. अनेकदा प्रश्न पडतो, की नवीन पुस्तकात पुन्हा नवीन असे काय मिळेल वाचायला? परंतु मुंबईबद्दल असे म्हणता येणार नाही. लेखक ज्ञान प्रकाश हे प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीत इतिहासाचे प्राध्यापक आहेत. बिहारच्या हजारीबागमध्ये त्यांचा जन्म झाला व पाटणा-दिल्ली येथे शिक्षण झाले. मुंबईपासून हजारो मैल लांब उत्तर भारतात राहून मग अमेरिकेला गेलेल्या व्यक्तीला या ‘मराठी’ शहराचं आकर्षण बालपणापासूनच. ते लिहितात की हिंदी सिनेमा हे त्यामागचं मुख्य कारण असावं. नऊ मोठ्या प्रकरणांमध्ये विभागलेलं हे पुस्तक इतिहासात तर अधूनमधून डोकावतंच; परंतु वाचकाला सारखं वर्तमानकाळाशी जोडतं, पुढे घेऊन जातं.

मुंबई शहराचं हे चरित्रलिखाण जरी असलं तरी लिहिण्याची लकब किंवा झोक असा, की पुस्तक खाली ठेववत नाही. वर्ष 1925मध्ये ‘टॉवर आॅफ सायलेन्स’ या अप्रकाशित पुस्तकावरून सुरुवात करून लेखक वाचकाला मुंबईची विविध अंगांनी अशी काही ओळख करून देत जातो की, मुंबई ज्या वाचकांनी बघितली नसेल त्यांना एकदा तरी ‘जिवाची मुंबई’ करून घेण्याची इच्छा जरूर होईल. परंतु या पुस्तकाबद्दलची एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, हे काही टुरिस्ट गाइड नाही; तसेच कोरडा इतिहासही नाही. तरीही आनंददायी वाचनाची हमी पुस्तक देते. पुस्तकात प्रचंड प्रमाणात नगरनियोजन व त्याचं महत्त्व अधोरेखित करणारं लिखाण आहे, तर सिनेमाबद्दल वेगळा दृष्टिकोन वाचायला मिळतो. तसेच साहित्य व कला यांचा मुंबईवर कसा प्रभाव पडत राहिला, याचं पण सुरेख वर्णन आहे. लेखक ‘ब्लिट्झ’ या रुसी करंजिया यांच्या खळबळजनक बातम्यांनी भरलेल्या साप्ताहिकाची पण नोंद घेतो, तसेच मुल्कराज आनंद (1905-2004) या गतकाळच्या प्रसिद्ध लेखकाचं मुंबईच्या नियोजनात चार्ल्स कोरिया व ले कॉर्बुझिरबरोबर केलेल्या कामाचं कौतुकही आढळतं. कार्बुझिर यांनी नवं चंदिगड वसवलं आणि त्यांचं नाव देशभरात प्रसिद्धीच्या झोतात आलं.

लेखकाला मुंबईची आधुनिकता, खुलेपणा, सगळ्यांना सामावून घेण्याची ताकद या गोष्टींनी प्रभावित केलं. पण तो लिहितो की, बहुविध राजकीय दृष्टिकोन असलेल्या विचारवंतांचं व नेत्यांचं मुंबई हे माहेरघर होतं. इथे लेखक, राजकीय चळवळीतील कार्यकर्ते, कलाकार, नगरनियोजक, तसेच मराठी, गुजराती, पारशी, मुस्लिम, जैन समाज कसे वेगवेगळ्या भागांत राहून मुंबईच्या प्रगतीचे साक्षीदार होत गेले, याचं रसभरित वर्णन आहे.
मुंबईतील दंगलीचा संदर्भ (दिलीप पाडगावकर संपादित पुस्तक ‘व्हेन बॉम्बे बर्न्ड’), शिवसेनेची जडणघडण, जुलै 2005 मध्ये मुंबई बुडाल्यानंतर अनेकांचे कसे हाल झाले, लोक मृत्युमुखी पडले; मारिओ मिरांडाचे कार्टून्स, ‘इलस्ट्रेटेड वीकली’ हे टाइम्स समूहाचं आता बंद पडलेलं पण एकेकाळचं लोकप्रिय इंग्रजी साप्ताहिक, मुंबईचं बॉलीवूड, अंडरवर्ल्ड या सगळ्या फे-या करून, अर्थ समजून घेऊन, दहा वर्षे संशोधन केल्यानंतरच प्रकाश यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. उद्योगनगरी, सूतगिरण्यांची लाल झेंडे असणारी मुंबई कशी व केव्हा ‘भगवी’ झाली याचं सुंदर, विश्लेषणात्मक वर्णन लेखक करत गेलाय. शिवसेना व त्याचा प्रभाव भारतीय लेखकाने, अमेरिकन दृष्टिकोनातून बघितला. लेखक म्हणतो, मुंबईत गुन्हे कधी संपत नाहीत, गुन्हेगारीचे प्रकार बदलत जातात. गुंडांच्या विरोधात उभी राहणारी एक व्यक्तीही लेखकाने शोधून काढली आहे व त्यावर बरंच काव्य केलं आहे. प्रकाश मूळचे इतिहासतज्ज्ञ आहेत व प्रभाव अमेरिकन राहणीमानाचा. त्यामुळे मुंबईच्या या इतिहासदर्शनात अनेक वेळा नगरनियोजन, कला व साहित्य यांचा सुंदर मिलाफ पुस्तकात वाचायला मिळतो. शहरांवर लिहिलेल्या दुस-या पुस्तकांमध्ये मला असे विविध विषय एकत्रित करून सहजगत्या वाचकासमोर आणलेले स्मरत नाहीत.
पुस्तक : मुंबई फेबल्स
लेखक : ज्ञान प्रकाश,
प्रकाशक : हार्पर कॉलिन्स, पाने : 396,
किंमत : 425 रुपये
abhilash@dainikbhaskargroup.com