आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरीक्षा आणि निकाल. आयुष्य या दोन गोष्टींभोवती बारा वर्षे फिरले. दर वेळेस दडपण आणि मनस्ताप. नापास होण्याची भीती नव्हती, पण ‘अप टु द मार्क’ असे टक्के मिळायला हवेत. खरे तर हे ठरवतो कोण? स्वत: रेघ आखून ठेवायची. पुढची रेघ लहान की मोठी, हे ठरवण्याचा आपला अधिकार कायम गमावलेला. आर्ट्सला जाऊन काय, न जाऊन काय? किंवा सायन्सलाच जाण्यात मतलब काय, हे कळण्यासाठी आई-बाबांनी प्रत्यक्ष बोलायला हवे ना? त्यांचे काम तेव्हा अॅप्टिट्यूडवाल्यांनीच केले.
प्रथम दहावीला अशाच एका टेस्टसाठी मला नेले होते, तेव्हा सर्व टेस्टचा रिझल्ट काय, तर हा मुलगा नक्की इंजिनिअर होणार! ऐकायला मस्त वाटले होते. पण आतून वाटायचे नाटके करावीत, ग्रुप्समध्ये चिक्कार वेगळ्या गोष्टी कराव्यात; पण आपण एवढे हुशार आहोत, हे समोरचे तज्ज्ञ सांगतात, यात नक्कीच तथ्य असावे. दुर्दैवाने बारावीत पहिला धक्का बसला, जेमतेम पास होण्यापुरते मार्क्स. त्या मार्कांचे करायचे काय? अर्थात या धक्क्यामुळे घर हादरले आणि सारे काही संपले, असे झाले नाही. कारण अॅप्टिट्यूडवाल्यांकडून आल्या क्षणी आपला पराभव मान्य करून टाकला. सांगून टाकले घरात, हे काही जमायचे नाही, मी हुशार या गटात शाळेपर्यंत मोडत होतो. पण बोर्डाने दाणादाण उडवली. सर्वसामान्य गटात माझी गणना झाली, तर त्रास कशासाठी करून घेऊ?
त्या वेळेस आपल्याच मतावर ठाम राहिलो. पण नंतर घरातून अनेक प्रश्न भिरकावले गेले, नाटक गांभीर्याने घेणार म्हणजे काय? अनेक जण या क्षेत्रात आहेत, तू जाऊन काय करणार? काही डॉक्टरांनी, इंजिनिअर्सनी छंद म्हणून नाटके केली, तशी कर की. पण बोर्डाने मार्कांचे दान दिल्यावर तशी सगळ्यांचीच बोलती बंद झाली. बरं, या वाईट मार्कांमुळे आपले आयुष्य कसे जाणार, आपण किती ‘ढ’, निरर्थक जगणे जगतोय, असे विचार मनाला कधी शिवले नाहीत. जगायचे आहेच. आपली प्रगती, अधोगती हा काही भारताचा मुख्य अजेंडा नाही. ओळखणार्या काही जणांचा अपवाद वगळता, आपला परिचय कोणाला नाही. आता फेसबुकवर स्वत:चे अकाउंट उघडून अधिक संख्येने आपण मित्र मिळवले, त्यांना समजा कळले, तरी काय होईल? कोण ओळखतोय आपल्याला? काहींना आपण इंटरेस्टिंग वाटलो, त्याचे कारण आपले नाटकवेड. सीईटी झालो नापास, नाही जमले शिक्षण, तर कोणाचेही मत वाईट होणार नाही. कितीही मतभेद असले तरी घर आपल्याला टाकून देणार नाही. प्रश्न विचारून भंडावतील. तेवढे सहन करायचे!
कल्पनेच्या जगात जगले नाही, तर कितीतरी प्रश्न सहज सुटतात. आपले काय होईल, कोण कोण आपल्याला नावे ठेवतील, हसतील, चेष्टा करतील, या सार्या काल्पनिक जगातील प्रश्नांना सामोरे जाताना दमछाक होते. आपण मठ्ठ आहोत, असे कळले तरी त्रास दुसर्यांना होईल. मला माहीत आहेच माझा आयक्यू. जसा मी आहे, तसा दुसर्याला कळणे अधिक महत्त्वाचे! जो मी नाहीच, तसे भासवणे म्हणजे जास्त घोळ घालणे. यात खोटेपणा आला, पोज घेणे आले, पण 45 ते 50 टक्के ही आपली रेंज, हे एकदा का इतरांना कळले, की फार अपेक्षांचे ओझे बाळगावे लागत नाही. खूप सारे शिकायला मिळते. इतरांसाठी आपण चांगले विद्यार्थी ठरू शकतो. आवडी-निवडी-छंद यावरच समोरचा अधिक बोलत राहतो. निर्णय मात्र स्वत:चा हवा.
आज तीन वर्षांत माझ्या एका संहितेला कित्येक तरुणांनी डोक्यावर घेतले, अनेकांनी प्रयोग केले. लेखनाचे कौतुक केले. ही ओळख मारून मुटकून घेतलेल्या निर्णयाने थोडी मिळाली असती? आपण जे करतो आहोत, त्याची कारणे सांगता आली म्हणजे बस...
रिझल्ट लागला. मार्क्स जास्त म्हणजे पुढे काय करायचे हे ठरून जाते. सायन्स हा जास्त मार्कांचा फंडा नाहीच. हे आपण ठरवतो. आवडीचे स्वातंत्र्य देणारी घरे वाढली की कोणत्याच निकालाचे टेन्शन राहणार
नाही. त्यासाठी आपली आवड मात्र नक्की कशात, हे ठरवायलाच हवे.
(bhargavevrinda9@gmail.com)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.