आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताणतणावांचा सामना कसा कराल?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याच्या वेगवान जीवनपद्धतीत आपल्याला सतत विविध प्रकारच्या ताणतणांवाना सामोरे जावे लागते. व्यवसायातील समस्या, कुटुंबीयांचे आजारपण, मुलांचे शाळा-कॉलेजमध्ये प्रवेश, परीक्षा, हाताखालील कर्मचा-यांचा हलगर्जीपणा, बैठकीसाठी वेळेवर पोहोचणे अशा एक ना अनेक गोष्टी तणावपूर्ण (eustress) ठरू शकतात.


साधक ताण :
एका विशिष्ट मर्यादेपर्यंत असणारा ताण (distress) ठरू शकतो. उदा. जर आपल्याला परीक्षेचा काहीच ताण आला नाही तर आपण अभ्यास करणार नाही आणि यशही मिळवू शकणार नाही, म्हणून मर्यादेत असणारा ताण आवश्यक असतो.


बाधक ताण :
जेव्हा कुठलाही ताण आपल्या क्षमतेच्या बाहेर जातो आणि त्याचे शारीरिक व मानसिक दुष्परिणाम होऊ लागतात, तेव्हा तो ताण घातक (distress) ठरतो. अशा ताणाचे विविध दुष्परिणाम जाणवतात.


ताणांचे शारीरिक दुष्परिणाम :
* डोकेदुखी/ अंगदुखी/ पाठदुखी/ चक्कर येणे/ गरगरणे.
* झोप कमी होणे (क्वचित वेळा जास्त झोप येणे).
* भूक व जेवण कमी होणे (क्वचित वेळा वाढणे).
* रक्तदाब (b.p.)वाढणे.
* लैंगिक समस्या (वंध्यत्व), स्त्रियांमध्ये पाळीच्या समस्या.
* थकवा (अशक्तपणा जाणवणे).
ताणांचे मानसिक दुष्परिणाम :
* सतत चिंता वाटणे, बेचैन वाटणे, घबराट होणे, धडधड होणे.
* उदास वाटणे, रडू येणे, अपराधीपणा वाटणे.
* सतत विचार येणे, भीती वाटणे.
* चिडचिड होणे, नातेसंबंधात दुरावा येणे, लक्ष न लागणे.
* तसेच ताणामुळे मद्यपान, धूम्रपान, झोपेच्या गोळ्यांचे व्यसन लागणे इत्यादी धोकेही उद्भवू शकतात.
* ताणांपासून दूर जाणे, त्याकडे कानाडोळा करणे, चिडचिड करणे, आजचे काम उद्यावर ढकलणे, स्वत:मध्ये गुरफटणे हे ताणाचा सामना करण्याचे चुकीचे मार्ग आहेत.


 ताणाचा सामना कसा करावा :
यातील पहिली पायरी म्हणजे आपल्याला नेमका कुठल्या गोष्टीचा ताण येत आहे, ते समजून घेणे व यापैकी ज्या गोष्टी आपण बदलू शकतो, त्या बदलण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करणे. ज्या आपण बदलू शकत नाही, त्या सर्व गुणदोषांसह स्थिर मनाने स्वीकारणे हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे.

कुठल्याही तणावाचा सामना
करण्यासाठी आहेत तीन पर्याय.

1. मुकाबला करणे (fight)
2. पळून जाणे (flight)
3.स्तब्ध होणे (freeze)


1. मुकाबला करणे : जेव्हा तुम्ही तणावाचा मुकाबला करायचा ठरवता, तेव्हा आपल्याला त्या समस्येला सामोरे जाऊन त्यावर सर्व दृष्टींनी योग्य असा मार्ग काढायचा असतो. अशा वेळी समस्या सोडवण्यासाठी आपल्यासमोर काय पर्याय उपलब्ध आहेत याची चाचपणी करावी. प्रत्येक पर्यायाचे काय कायदे आणि काय तोटे आहेत, त्याचा अभ्यास करावा. त्यामध्ये जो सर्वात योग्य पर्याय असेल त्यावर ठामपणे मार्गक्रमण करावे.
जेव्हा आपली निर्णयक्षमता कमी पडेल, तेव्हा आपल्या जवळच्यांची जसे कुटुंबीय, मित्र, शेजारी, सहकारी, प्रसंगी डॉक्टर, समुपदेशक यांची मदत घ्यायला कचरू नये. या सर्वांकडून आपल्याला मानसिक आधार, प्रेमाचा/ अनुभवाचा सल्ला मिळतो. जेणेकरून आपल्याला दिशा मिळते.
आपल्या वागण्यात ठामपणा असणे आवश्यक आहे. जर कुणी आपल्या चांगुलपणाचा, भिडस्तपणाचा गैरफायदा घेत असेल तर त्यांना ठामपणे नाही म्हणणे, हानिकारक, निरर्थक प्रसंग टाळणे हे फार महत्त्वाचे आहे. यामुळे आपला अनाठायी ताण कमी होतो.


2. पळणे चांगले? :
ताणापासून पळण्यापेक्षा ताण आल्यास व्यायाम म्हणून पळणे (जॉगिंग), पोहणे, सायकल चालवणे, खेळणे, अ‍ॅरोबिक्स या गोष्टीही ताण कमी करण्यास फायदेशीर ठरतात.


3. स्तब्ध होणे (फ्रीझ) :
ताणाच्या प्रसंगी गोंधळून जाण्यापेक्षा काही मिनिटांसाठी स्वत:ला शांत करणे (ध्यान), शिवाय तडकाफडकी कुठलाही निर्णय न घेता सर्व परिस्थिती पूर्णपणे समजून घेऊन सल्लामसलत करून मार्ग काढणे योग्य आहे. सोबत नियमित प्राणायाम-योगासने करणे, मनाला प्रसन्नता मिळेल अशा ठिकाणी जाणे मदतीचे ठरते. एखाद्या समस्येचे उत्तर सापडत नसेल तर त्यावर सतत विचार न करता गाणे ऐकणे, पुस्तक वाचणे, फिरून येणे, चविष्ट पदार्थ खाणे इत्यादी गोष्टी केल्यास मेंदूला स्फूर्ती मिळून समस्येचे उत्तर मिळते.


तणावमुक्तीच्या इतर काही टिप्स :
* स्वत:बद्दल अनाठायी अपेक्षा बाळगू नका. आपल्या क्षमतेनुसार उद्दिष्ट ठरवा, अन्यथा ताण येतो.
* स्वत:च्या भावना मोकळेपणाने व्यक्त करा. भावना दाबून ठेवल्यास तुमचाच त्रास वाढेल.
* आपल्या वेळेचे व्यवस्थित नियोजन केल्यास आपोआप अनेक प्रश्न सुटतील.
* पुरेशी नियमित झोप घ्या.
* रोजच्या धकाधकीमध्ये काही वेळ फक्त स्वत:साठी राखून ठेवा.
* आठवड्यात एक दिवस रूटीनपेक्षा वेगळे करा / निसर्गरम्य ठिकाणाला भेट द्या.
* जुन्या मित्रांना भेटा / फोन करा.
* संगीत ऐका / विनोदी चित्रपट पाहा.
* देवधर्म / अध्यात्माची गोडी लावून घ्या.
* ह्या सुंदर आयुष्याचा पुरेपूर उपभोग घेवून आरोग्यपूर्ण जीवन जगा