आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसे सांगावे...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार हा शांता-कोजागिरीचा घातवार असायचा. संध्याकाळी टीव्हीवर छायागीत असायचे. शांता त्याला ‘वायागीत’ म्हणत होती. त्याचा थोडाही परिणाम कोजागिरीवर व्हायचा नाही. ही गोष्ट सांगून समजणार नाही हे शांतालाही कळायचे नाही. एखाद्या व्यसनी माणसाप्रमाणे कोजागिरी बरोबर वेळ झाली की टीव्ही सुरू करत होती. तिच्या चेह-यावर आपण करतोय ती गोष्ट आईला आवडत नाही या जाणिवेची एक पुसटशी छटा असायची. पण ते तेवढ्यावरच थांबायचे. कार्यक्रम न बघणे मात्र ती करू शकत नव्हती. दोन-तीन बुधवार सोडून शांताचा आणि कोजागिरीचा जोरदार वाद होत असे. शांता या गोष्टीवर बराच विचार करत होती. चांगल्या-वाईट गोष्टी तिला न दुखावता कशा समजावून द्यायच्या हा प्रश्न आतापर्यंत इतका कठीण कधी झाला नव्हता. त्यामुळे शांताचा कस लागला नव्हता.


कोजागिरी लहान असताना टीव्ही घ्यायचा नाही असा निर्णय घेतला होता. ‘घरात टीव्ही नाही, त्यामुळे माझा सतीश शेजा-यांच्या घरी जायला लागला. शेजारी टीव्ही बघायला पाठवणे मला बरोबर वाटेना. लगेच आम्ही टीव्ही घेऊन टाकला,’ शांताची ऑफिसमधील सहकारी सांगत होती. ‘तुझी मुलगी नाही का हट्ट करत? टीव्ही बघण्यासाठी शेजारी नाही जात का?’ असे तिनेच एकदा शांताला विचारले होते. शांताला खात्री होती, सतीशची ढाल पुढे केली जात होती. आपल्या प्रतिष्ठेचे चिन्ह म्हणजे घरात टीव्ही, सोफा अशा अनेक वस्तू असायला हव्यात असे तिच्या मैत्रिणीला वाटत होते. तसे न म्हणता मुलांचे कारण दाखवले जात होते. असा हट्ट करू नये म्हणून शांता आणि कोजागिरीचा बाबा अनेक युक्त्या करत होते. साधारण टीव्ही बघण्याच्या वेळात ते तिला बागेत घेऊन जाणे; घरी असेल तर गोष्टी सांगणे, कातरकाम करणे, चित्रं काढणे, पुस्तक वाचून दाखवणे अशा गोष्टी करत होते. कोजागिरी दहा-बारा वर्षांची झाल्यावर वाटले आता कोजागिरीला वाईट आणि चांगले कार्यक्रम निवडता येतात. त्यामुळे टीव्ही नामक डबा घरात आणायला हरकत नाही. शांताला अजूनही खात्री नव्हती. कोजागिरी आणि बाबा एका बाजूला झाले आणि डबा घरी आला.


सुरुवातीला फारसा प्रश्न आला नाही. नंतर वायागीताच्या बाबतीत गाडी फार खडखडायला लागली होती. ‘वर्गात सर्व मुली गाण्याबद्दल बोलतात. मी पाहिले नसेल तर मला त्यांच्या बोलण्यात काही भाग घेता येत नाही. मला एकटे पडल्यासारखे वाटते,’ एकदा चांगल्या मूडमध्ये असताना कोजागिरी सांगत होती. म्हणजे कोजागिरीने वायागीतं पाहावी की पाहू नयेत ही गोष्ट सामाजिक होती. आता ती शांताच्या कुटुंबापर्यंत मर्यादित राहिली नव्हती. ‘पण तुझा एवढा विरोध का? मला जोपर्यंत तू काय सांगतेस ते पटणार नाही, तोपर्यंत मी काही तुझे ऐकणार नाही. तू मला पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगून मी ऐकेन असे तर मुळीच नाही होणार. त्यामुळे तू गप्प का बसत नाहीस?’ असे शेवटी निर्वाणीचे कोजागिरीने सांगितले.
तरीही शांताने आपला प्रयत्न सुरू ठेवला, ‘त्या गाण्याला ना सूर ना ताल. त्यातील नृत्यात जे अंगविक्षेप असतात त्यात बायकांना फक्त छाती आणि कुल्ले हे दोनच अवयव जणू काही आहेत असे दृश्य समोर येते. स्त्री-पुरुष प्रेमाबद्दल अत्यंत विपरीत दृश्यं-चित्रं तुमच्यासारख्या अबोध मनावर वाईट परिणाम करणार, याबद्दल मला खूप काळजी वाटते. गाण्यात प्रत्येक भावना आततायीपणे व्यक्त केलेली असते. प्रत्यक्ष स्त्री-पुरुषाचे प्रेम आणि नाते असे अ-मानवी आणि हिडीस नसते.’ असं बरंच काही सोपं करून सांगण्याचा शांता प्रयत्न करत होती.


‘मला तू सांगतेस ते थोडे पटते. माझ्या मनावर असा वाईट परिणाम होणार नाही. मी गाणी एवढ्या सीरियसली बघत नाही. मैत्रिणींबरोबर बोलल्यावर मी विसरून जाते. तू उगाच प्रत्येक गोष्ट फार विचार करून करतेस. असे मी नाही करत. गंमत म्हणून मी ही गाणी बघते,’ असे काहीसे म्हणत कोजागिरीने वेळ मारून नेली. बुधवार आला की मात्र तिला राहवत नसे. आईचा विरोध पत्करून ती टीव्ही लावत राहिली. पाच-सहा महिन्यांनी मात्र कोजागिरीला या गाण्याचा कंटाळा आला असे जाणवत होते. न चुकता लावणे बंद पडले. मधून कधीतरी तिला लहर येत होती. शांताला हा बदल पाहून खूप हायसे वाटले. उशिरा का होईना, आपल्या मुलीत चांगले/वाईट ठरवण्याची क्षमता येत आहे हे पाहून तिला आनंद होत होता.