आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजून हक्क मागत उठती 'मुखस्तंभ' सारे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका जंगलातील प्रसन्न सकाळ... प्राण्यांचं जंगलातील जीवन एका शिस्तीत पुढे सरकत असतं. मनुष्यप्राण्याने आपल्या राज्यात कायदा, न्याय, लोकशाही वगैरे व्यवस्था निर्माण केल्या असल्या तरीही प्राण्यांच्या राज्यात असल्या व्यवस्था अस्तित्वात असल्याचा प्रश्न नसतो. इथे जंगलावर राज्य करणारा वाघच कायदे ठरवतो. तो म्हणेल तेच धोरण, तो बांधेल तेच तोरण आणि तो करेल तो कायदा, तो देईल तो वायदा, अशी इथली स्थिती असते. वाघ राजा असला तरी तो आपली व आपल्या परिवाराची शिकार करण्याची हद्द ठरवून घेत असतो. त्या हद्दीबाहेर तो चुकूनही जात नाही...
...तर जंगलाच्या मधून वाहणार्‍या नदीच्या कडेला जंगलातले प्राणी जमा झालेले असतात. वाघापुढे ते आज आपल्या हक्कांची सनद मांडणार असतात. अलीकडेच जंगलालगतच्या गावातील काही भटकी कुत्री मध्येच जंगलात वाट चुकून येऊ लागली असतात. मात्र जंगलात आल्यावर ही भटकी कुत्री मनुष्यप्राण्याने आपल्या राज्यात प्राण्यांच्या हक्कांसाठी किती चांगले कायदे केले आहेत, याची माहिती जंगलातल्या हरिण, काळवीट, लांडगे, कोल्हे यांच्या कानांवर घालू लागतात. मोकाट कुत्री माणसांना चावली तरी त्यांना गोळ्या घालता येत नाहीत, सर्कशीत वन्य प्राण्यांकडून खेळ करून घेता येत नाहीत, यासारखे कायदे मनुष्याने तयार केले आहेत, अशी माहिती जंगलातल्या प्राण्यांना भटक्या कुत्र्यांकडून मिळालेली असते. ही माहिती ऐकून जंगलातल्या प्राण्यांनाही आपल्यालाही असे हक्क मिळाले पाहिजेत, असे वाटू लागते. आपण नुसते बोलून चालणार नाही, तर आपली मागणी वाघापुढे मांडलीच पाहिजे, असा निर्धार समस्त प्राणी करतात. ‘तुम्ही जर आमचे म्हणणे ऐकून घेणार नसाल, तर आम्ही हे जंगल सोडून जाऊ,’ अशी धमकी देणारा खलिता वाघाकडे रवाना करतात. या तातडीच्या खलित्यामुळे वाघ सर्व प्राण्यांना भेटायचे मान्य करतो.
नदीच्या एका कडेला व्याघ्र परिवार आणि दुसर्‍या कडेला इतर प्राणी, अशी व्यवस्था केलेली असते. वाघ परिवार पलीकडच्या काठाला आल्यावर वाघाचे नेहमीचे गिर्‍हाईक असलेले हरिण बोलू लागते, ‘आपल्यापुढे ही हक्कांची सनद मांडण्यासाठी आम्ही एकत्र आलोय. याचे मुख्य कारण म्हणजे, आमच्यावर या जंगलात प्रचंड अन्याय होतो आहे. तुम्ही किती ‘वेगमर्यादे’ने पळावे, याला काहीही बंधन नाहीये. मनुष्याच्या राज्यात बघा, तेथे राज्य चालवणार्‍या लोकांना, त्यांच्या वाहनांना वेगमर्यादा आहे. ही वेगमर्यादा ओलांडली तर त्यांना दंड होतो. जंगलात तसे काहीच नाही. आम्हाला पकडताना तुम्ही अजिबात वेगमर्यादा पाळत नाही. तुम्ही वेगमर्यादा पाळत नसल्याने आमचा जगण्याचा हक्क नावालाच राहतो. तुमच्या अशा वर्तनामुळे आमचा हक्कभंग होतो आहे. मुख्य म्हणजे, तुम्हाला एवढ्या प्रचंड वेगाने पळण्याचा ‘विशेषाधिकार’ कोणी दिला? हा विशेषाधिकार रद्द करावा, अशी आमची आग्रही मागणी आहे...’ हरिण मोजक्या शब्दांत समस्त प्राण्यांच्या भावना मांडते. मग व्याघ्र कुटुंबातील कर्ता पुरुष उठतो आणि नेत्याला शोभेलशा शैलीत बोलू लागतो, ‘सर्वात प्रथम एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की वेगमर्यादा, विशेषाधिकार हे कायदे मी तयार केलेले नाहीत. ही जी काही व्यवस्था तयार झालेली आहे, ती सर्वश्रेष्ठ परमेश्वराने तयार केलेली आहे. तुम्हाला मारून टाकल्यामुळे तुमच्या हक्कांचा भंग होतो, असं तुमचं म्हणणं आहे. पण तुम्ही मंडळी जगण्यासाठी जंगलातले गवत तर खाताच; शिवाय जंगलाशेजारच्या शेतात जाऊन तिथली पिकेही फस्त करून टाकता. त्या गवताच्या, पिकांच्या जगण्याच्या हक्काचे काय? तुम्ही त्यांचा हक्कभंगच करता आहात ना? तुम्ही जंगल सोडून जायचे म्हणता; कोठे जाणार, त्या माणसाच्या राज्यात? अरे, तो माणूस तुमच्यातल्या प्रत्येक प्राण्याच्या दररोज शिकारी करील. आम्ही वाघ लोक एक शिकार केल्यावर चार-पाच दिवस दुसरी शिकार करतसुद्धा नाही. माणूस तसा नाही. तुम्ही जंगल सोडून गेलात, तर माणूस तुमचा ‘वंश’ संपवून टाकेल. त्यापेक्षा तुम्ही इथे कितीतरी सुखी आहात,’असं म्हणून वाघ एक दीर्घ पॉझ घेतो. आपल्या बोलण्याचा प्राण्यांवर परिणाम झालाय, हे लक्षात येताच आणखी जरबेच्या भाषेत बोलू लागतो, ‘तेव्हा हक्कभंग वगैरे गोष्टी डोक्यातून काढून टाका. इथला राजा मीच आहे. मी म्हणेन तोच कायदा. आता निघा इथून...’
बोलणे संपवून वाघ त्रिखंडात ऐकू येईल, अशी कडक डरकाळी फोडतो. ती चिरपरिचित डरकाळी ऐकताच प्राणी जिवाच्या आकांताने सैरावैरा धावत सुटतात... ‘आज जगण्याचा हक्क मागितला, उद्या संमती वय कायदा करा म्हणतील’, असे काहीसे पुटपुटत वाघ आपल्या नेहमीच्या चालीत चालू पडतो...
cm.dedhakka@gmail.com