आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी ही अशी...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्रियांनी फॅशनेबल राहायला हवं, या आधुनिक मताचा मी आहे. फॅशनेबल राहणे आणि अल्ट्रामॉडर्न असणे यात फरक आहे.अनेक स्त्रियांना अनेक कारणांमुळे, परंपरानिष्ठतेमुळे कदाचित अल्ट्रामॉडर्न राहणे रुचत नसावे किंवा जमतही नसावे. पण फॅशनेबल किंवा ट्रेंडी राहायला काहीच हरकत नाही. फॅशनेबल राहणे म्हणजे सध्याच्या कालप्रवाहात ज्या गोष्टी व्यक्तिमत्त्व छान दिसण्यासाठी व उठून दिसण्यासाठी रूढ होत आहेत किंवा झालेल्या आहेत, त्यांचा स्वीकार करणे. मात्र फॅशन्स अंगीकारताना तुमची शरीरयष्टी, आसपासचे वातावरण आणि घरातील मंडळींच्या आवडीनिवडीचाही विचार तुम्ही काही प्रमाणात करायला हवा. एखादी फॅशन आपल्याला आवडते, पण ती आपल्याला शोभते का हे लक्षात येणे खूप आवश्यक आहे. फॅशन - मग ती कपड्यांच्या एखाद्या नवीन प्रकाराची असो की चपलांच्या एखाद्या विशिष्ट पद्धतीची असो - तुम्हाला सूट व्हायला हवी. तरच तुम्ही ती अंगीकारू शकता. एखादी नवीन फॅशन आंधळेपणाने स्वीकारली आणि जर ती तुम्हाला शोभत नसेल तर तुम्ही इतरांच्या चेष्टेचा विषय बनता. कपड्यांचे, ड्रेसेसचे अनेकविध प्रकार रोज नित्यनवीन रूपात बाजारात येत असतात. कपड्यांच्या फॅशन्सपासून लिपस्टिकच्या शेड्सपर्यंत आणि चपलांच्या बांधणीपासून एखाद्या नवीन पर्सच्या प्रकारापर्यंत अनेक फॅशन्स आणि नवनवीन ट्रेंडस रोज बाजारात येतात. त्यापैकी सगळेच निवडून वापरणे वेडेपणाचे ठरेल. जे आपल्याला छान दिसतंय आणि जे परिधान केल्यावर आपलं व्यक्तिमत्व उठून दिसेल त्या फॅशनचा स्वीकार डोळसपणे करायलाच हवा. प्रसंगानुसार केलेली कपड्यांची निवड, त्याला अनुरूप असलेल्या पर्सेस, इतर अ‍ॅक्सेसरीज व प्रसंगानुरूप केलेला मेकअप हे घटक तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारण्यास नक्कीच मदत करतात. आपला त्वचेचा नैसर्गिक रंग, आपली उंची याला अनुसरून कपडे परिधान करायला हवेत. तसाच योग्य मेकअपही करायला हवा. उगाच आपल्याला आवडतंय म्हणून शरीरयष्टीला न शोभणारे कपडे, भडक मेकअप करणे किंवा पैसे आहेत म्हणून अनावश्यकपणे ब्रँडेड गोष्टींची वारेमाप खरेदी करणे याला अर्थ नाही. अनेक स्त्रिया मी बाबा फक्त ब्रँडेड कपडेच वापरते असे म्हणणे भूषणावह समजतात. पण ट्रेंडी राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमधील एका नामवंत नायिकेला फॅशन स्ट्रीटच्या फुटपाथवर कपडे खरेदी करताना मी बघितलं आहे. कारण नावीन्यनिर्मितीचा ट्रेंड हा फक्त मोठमोठ्या मॉल्स किंवा ब्रँडेड कपड्यांच्या शोरूममध्येच नाही तर फुटपाथवरही होऊ शकतो हे तिला समजलं होतं. फॅशनेबल राहण्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल होतो, तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो. नवनवीन गोष्टींची माहिती होत जाते आणि तुमच्या एकंदर व्यक्तिमत्त्व विकासाला मोठाच हातभार लागतो.

(क्रमश:)