आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला येते हे सारे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोणाच्याही वाढदिवसासाठी भेटकार्ड विकत आणायच्या ऐवजी ते स्वत: तयार करण्याची पद्धत कोजागिरी खूप लहान असल्यापासून शांताने रुजवली होती. प्रत्येक गोष्ट किंवा कोणतीही गोष्ट पैसे दिले की बाजारातून विकत आणता येते, स्वत:ला त्यासाठी काही करावे लागत नाही असे संस्कार कोजागिरीवर होऊ नयेत याबद्दल ती खूप दक्षता घेत असे. त्या निमित्ताने हाताने काही गोष्टी तयार करण्यासाठी आपोआपच कारण सापडत होते. त्यामुळे रंगीत कागद, चित्रं जमवून ठेवण्याचा एक विशेष छंद जडला होता. रंगीत चित्रांचा आणखी एक नवीन प्रकार शांताने आणि कोजागिरीने मिळून तयार केला होता. एक मोठी को-या कागदांची वही बाइंड करून आणली होती. चित्रं आवडली की त्या वहीवर ती चिकटून ठेवायची. अशी छान चित्रांची वही तयार झाली होती. त्यात फुलपाखरं, अनेक प्रकारची फुलं, प्राणी, पक्षी, फळं, सूर्योदय, सूर्यास्त, चंद्र, ढग अशा अनेक चित्रांची जमवाजमव झालेली होती. ही चित्रांची वही म्हणजे कोजागिरीचा चांगला विरंगुळा झाला होता. केव्हाही ही चित्रांची वही काढून ती पाने उलटत बसायची. घरी कोणी लहानगी आली की आवर्जून ही चित्रांची वही बघितली जायची. रंगीत कागद, जमविलेली चित्रं, शिवाय स्वत: तयार केलेली चित्रं यातून छान छान भेटकार्डं तयार होत होती. कोजागिरीने तयार केलेल्या भेटकार्डांची उत्सुकतेने सर्वजण वाट पाहत असत. त्यामुळे कोजागिरीचा हा छंद जोपासायला मदत झाली.


आपल्याला लागणा-या जास्तीत जास्त गोष्टी घरीच बनविण्याकडे शांताचा कल होता. शिवणकाम त्याचाच एक भाग होता. बाबाचे सुतारकामही असायचे. कोजागिरी हे सर्व खूप लहानपणापासून पाहत असल्याने ती स्वत:चे कौशल्य अजमावायला लागली होती. ‘तू कात्रीने कापड कापतेस तो आवाज मला खूप आवडतो,’ कोजागिरी एकदा म्हणाली. तोपर्यंत कात्रीचा एका लयीत येणारा, कापडाच्या पोताप्रमाणे बदलणारा आवाज शांताच्या लक्षात आलेला नव्हता. कापड आणल्यापासून ते त्याचा ड्रेस तयार होईपर्यंत वेगवेगळ्या अवस्थेत तो अंगावर टाचून बघण्याचा कोजागिरीचा उत्साह कधीच कमी झाला नाही. त्यामुळे कपडे शिवणे हा एक चांगला आनंददायी उद्योग होता. या खेळातून एकदा कोजागिरी म्हणाली होती, ‘आता हा ड्रेस मी शिवणार. आता मी मोठी झाले आहे ना...’ शांताला वाटले होते कोजागिरीचा उत्साह दोन-तीन टिपा मारेपर्यंत तरी टिकेल की नाही कोण जाणे. शांताला कोजागिरीने सुखद धक्काच दिला. शेवटपर्यंत सांगेल त्याप्रमाणे टिपा घालत ड्रेस तयार होईपर्यंत तिचा उत्साह आणि चिकाटी टिकून राहिली होती. शांता बघतच राहिली! त्याचबरोबर हातशिलाई, काजं-बटणं, आय-हुक कशी करायची हेही शांताने कोजागिरीला हळूहळू शिकवून टाकले होते. कपडा उसवला तर हाताने किवा मशीनवर शिवून टाकायचा, बटणे तुटली तर पिन न लावता सुई-दोरा घेऊन लावून टाकायची, हे कृतीतून शांता शिकवत होती. कधी-कधी कोजागिरीच्या कपड्यांना पिना दिसायच्या. आळस मध्ये येत होता. कपडे धुताना बाईच्या हाताला पिन लागू शकते, आपल्यालाही झोपेत टोचू शकते असे सांगितल्यावर कोजागिरी विशेष काळजी घ्यायला लागली होती.


शिवणाप्रमाणेच घरातील इतर गोष्टीही आपण स्वत: करू शकतो हेही कोजागिरी अजमावत होती. उदा. नळ गळत असेल तर वॉशर बदलणे, ट्यूब किंवा दिवा गेला तर बदलणे, भिंतीला तडे गेले तर सिमेंट भरणे, छोटे-मोठे सुतारकाम अशा कितीतरी गोष्टी. अलीकडे मोठी झाले आहे मी म्हणून कोजागिरी स्वयंपाकात लक्ष घालू लागली होती. प्रत्येक पदार्थ कसा करतात, त्यास फोडणी कशी देतात, मसाले काय काय घालतात इत्यादी सर्व माहिती करून घेत होती. ‘मोठी माणसं स्वयंपाक कसा करतात हे पाहिले तरी आपोआप करायला येतो. आता तो फक्त नीट पाहत जा. हळूहळू येईल,’ शांता सांगायचा प्रयत्न करत होती. पण प्रत्येक गोष्ट स्वत:च करून बघण्यात कोजागिरीला खूप मजा वाटत होती.
बाई आल्या नाही की आई-बाबा कामाला लागत. कोजागिरी लगेच भांडी घासायला तयार असायची. ‘मला कपडे मात्र धुता येत नाहीत. काठीने वाळत तर मुळीच घालता येत नाहीत,’ असे कोजागिरी म्हणत होती. ब-याच वेळा प्रयत्न करून शांताने या दोन गोष्टी तिला शिकविल्या होत्या. कामचलाऊ कपडे धुणे आणि ते वाळत घालणे यायला लागले होते.
एकदा एका पुलावरून बस जात होती. खाली एक छोटीशी मुलगी डोक्यावर पाण्याचे दोन हंडे घेऊन घरी चालली होती. तिच्याकडे लक्ष वळून कोजागिरी शांताला म्हणाली होती, ‘असे डोक्यावर हंडे ठेवून हात सोडून चालता येईल का गं आपल्याला? मला येते हे सारे ...’ असे वाटणारी कोजागिरी आजूबाजूचे सूक्ष्म निरीक्षण करत आहे ही गोष्ट शांताला समाधान द्यायची.