आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी म्हणेन ती पूर्व .....

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायत्रीच्या आईची कायम एक तक्रार असते; आपल्या मुलीच्या मैत्रिणी सतत बदलणा-या. शाळेपर्यंत हे सारे ठीक होते; म्हणजे वर्गाबरोबर कधी तुकडी बदलायची, मैत्रिणींची जागा बदलायची, नवनव्या मुलींचा सहवास. साहजिकच अगोदरच्या मैत्रिणी थोड्या दूर अंतरावर जायच्या. पण महाविद्यालयात दर महिन्यागणिक गायत्री प्रत्येकीची तक्रार करू लागली, तेव्हा आईची काळजी वाढली. एखादीला मोठ्या प्रेमाने आई घरी बोलवायची, खाऊपिऊ घालायची, काही दिवस गायत्री या नव्या मैत्रिणीच्या अगदी गळ्यात पडायची. रात्री राहाच, असा आग्रह धरायची. कॉलेज सुटले की दोघी घरी बरोबर येणार, तिच्याचकडे दुपारी गप्पा मारत लोळत पडणार, संध्याकाळी फिरून आल्या तरी गायत्रीला आपल्या या सखीला सोडणे जिवावर यायचे. अचानक ही मैत्रीण गायत्रीला नकोशी व्हायला लागली. तिचे नाव जरी घरात निघाले तरी प्रचंड संताप तिच्या मनात दाटून यायचा. आईला कळेना, गायत्रीशी कसे वागावे? एखादी वस्तू तरी चार-पाच महिने टिकते, इथे तर दर दीड-दोन महिन्यानंतर गायत्रीला आपल्या मैत्रिणीमधील दोष दिसू लागतात; तिचे वागणे खटकते; कपडे, स्टाइल आवडत नाही; मुख्य म्हणजे घरातल्या सर्वांनीच तिच्या या नवीन नकाराला स्वीकारले पाहिजे, हा तिचा हट्ट. सारे घर दर वेळेस तिच्या नव्या नात्याला आनंदाने सामोरे जाणार आणि त्यांचे नाते रुजेस्तोवर गायत्री त्या व्यक्तीशी नातेसंबंध तोडणार.. वडलांनी हा प्रश्न फारसा गांभीर्याने घेतला नाही.

कॉलेजला जाणारी मुलगी, तिचे वर्गातल्या इतरांशी असलेले नाते, त्यात खोलवर डोकवावे कशाला? होतात भांडणे, डोके आले ठिकाणावर की घालतील परत गळ्यात गळा... वर्षभरात अशा बारा मैत्रिणी झाल्या तरी बिघडले काय? गायत्रीची आई मात्र थोडा वेगळा विचार करत होती. जवळचे मित्र-मैत्रिणी असणे, कॉलेजमध्ये आपले आत्मीयतेने कोणी ऐकून घेणे, एक चांगला ग्रुप एकत्र येणे, त्याकरिता आपल्या मुलीला तिच्या अशा दोन-तीन तरी मैत्रिणी असल्या पाहिजेत. गायत्रीशी शांतपणे बोलताना आईच्या अनेक गोष्टी लक्षात येऊ लागल्या. कॉलेजमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांत, उपक्रमांत जोपर्यंत गायत्री सहभागी व्हायची, तोपर्यंत मैत्रिणीने सहभाग घेणे तिला खटकायचे नाही. मात्र ज्या उपक्रमात ती नसेल, तेथे कोणी जायचे नाही. कोणत्याही संधीचा लाभ एकट्याने घ्यायचा नाही. गायत्रीला जी विरोध करायची, त्या प्रत्येकीशी तिचे भांडण ठरलेले. प्रथम गायत्रीचा सहवास हवासा वाटणा-या इतर मुलींना तिची एकाधिकारशाही मान्य होईना.

आपले कुणी ऐकत नाही, आपण प्रत्येकीवर जीव ओवाळून टाकतो, दिवस नि दिवस तिला बहाल करतो, घरातल्यासारखे वागतो, आपली साधी गोष्ट ऐकू नये..? एखाद्या लेक्चरला नाही बसायचे हे ठरल्यावर मुद्दाम मैत्रीण जाऊन बसते, या कारणामुळे अनेकींशी तिने संबंध तोडले. आपण एकटे राहू शकतो; इतरांशी घेणे-देणे नाही, या तिच्या अ‍ॅटिट्यूडचा खरपूस समाचार घ्यावा, असे आईला वाटले. पण तिची आत्ताची परिस्थिती पाहता तू जे म्हणतेस ते बरोबर, असा पवित्रा घेत आईने तिच्यापासून दूर जाणा-या मैत्रिणींची यादी तिला सांगितली. या सगळ्या एकमेकींशी घट्ट बांधलेल्या; जिवलग. त्यांचे चांगले गुण, जपलेले छंद, जीवनात काही करून दाखवण्याची ईर्षा... अशा मैत्रिणी गायत्रीला मुद्दाम वेगळे का काढतील? छोट्या, क्षुल्लक गोष्टींवरून वाद घातल्याने त्या दुखावल्या, तीन वर्षांत अनेक जणी एकत्र येऊन खूप काही करू शकल्या असत्या. स्वभावाने सगळ्याच समंजस आहेत, प्रत्येकीला स्वत:ची मते आहेत. त्याचा आदर न करता आपल्या मताप्रमाणे त्यांनी वागावे, हा आग्रह धरणे चुकीचे नाही का? त्यांच्या जागी स्वत:ला ठेवत अनेक प्रश्न गायत्रीने विचारावेत, उत्तरे तिची तिला मिळतीलच. आईला बरेच सुचवायचे असते, सुनवायचे असते. आपल्या मुलीची चूक आईला उमगलेली असते. मात्र गायत्री मान्य करायला तयार नसते. आईकडे आपल्याबद्दल कोणी तक्रार केली की काय, आपण जे सांगतो त्याचा विचार करण्यापेक्षा सगळ्या जणींचा पुळका आईला अधिक येतो, खरे तर आपण एकटे पडलो आहोत; तेव्हा सहानुभूती दाखवण्याऐवजी आई त्यांची बाजू घेते. पण हे सगळे व्यक्त करावे कोणाजवळ? गायत्रीला समजेना. तिचा दिवस उजाडायचा एखाद्या एसएमएसने, कॉलेजपर्यंत सोबत करणा-या मैत्रिणीच्या फोनमुळे. गप्पा, हसणे, सतत आनंदी राहणे, आता याची जागा एकटेपणाने घेतली. गंमत म्हणजे आपल्या वर्गातल्या मुलींशी आई फोनवर बोलू शकते, आपण नाही. याचा अर्थ आपलेच काहीतरी चुकलेय.

जोपर्यंत आपण चूक मान्य करत नाही, तोपर्यंत आपल्याला व्यक्त होण्याची संधी मिळणार नाही. लेक्चर अटेंड करण्यासाठी आपण कॉलेजला जातो, खरे कारण तेवढेच थोडी असते? आसपास असणारे सारे जण, तिथले वातावरण... आपण हे खूप मिस करतोय. इतक्या महिन्यांत फटकून वागत गेलो, आता जुळवून घेतले तर आपल्याजवळ सर्व राहतील. आई म्हणते तसे. काही पाय-या आपण उतराव्यात, सगळे सोपे होऊन जाते. आई गायत्रीला कसे समजवायचे म्हणून काळजीत; तर गायत्री मैत्रिणींना कसे सामोरे जायचे म्हणून चिंतेत... प्रश्न मात्र तात्पुरता सुटणार, यात शंका नाही...


bhargavevrinda9@gmail.com