आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नयी है महफिलें...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परिचय होऊन खूप काळ लोटला आहे. आता आपल्या बोलीतही तिचा समावेश झालाय आणि कवींच्या अभिव्यक्तीचेही ते एक अंग होऊ लागले आहे. गालिब, मीर, दाग, जौक, जफर ही क्लासिकल शायरांची नावे आणि शायरीही पाठ झालेली आहे. सीमाब अकराबादी, नासीर काजमी आणि सलीम कौसरसारखी नावे व गझलाही संग्रहात जमा झालेल्या आहेत. याला मुख्यत: कारण ठरलं आहे, ते गझलगायकीचं वेड. बेगम अख्तर, मेहंदी हसन, गुलाम अली, जगजित सिंग, पिनाझ मसानी आणि हरिहरनसारख्या गायकांनी गझल कागदावरून मनापर्यंत पोहोचवली. त्यात अहमद हुसेन, महंमद हुसेन, आबिदा परवीन, आशा भोसले आदींचेही मोलाचे योगदान आहे. या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायकांसोबत अशोक खोसला, रूपकुमार राठोड, तलत अझीझ, विनोद सहगल यांचीही नावे उल्लेखनीय आहेत.

मग आता या सगळ्या माहीत असलेल्या, काही अंशी पाठ असलेल्या आणि मोबाइलमध्ये एका टचवर उपलब्ध असलेल्या गझलांबद्दल नवीन काय लिहायचं? त्या वेळी उत्तर देण्यासाठी पुढे आला, तो रघुपती सहाय ‘फिराख’ गोरखपुरी यांचा जगण्याच्या ताजेपणाची हमी देणारा एक शेर.
हजार बार जमाना इधर से गुजरा है
नयी नयी सी है, कुछ तेरी रहगुजर फिर भी
खरं आहे, जगतो हरेक; पण एकाचा जीवन प्रवास, जीवनानुभव दुसर्‍यासारखा नाही.

आपल्या प्रियतमेशी ‘गुफ्तगु’चे माध्यम म्हणून सुरू झालेल्या गजलच्या फॉर्मने वर्तमानाशी मीर आणि गालिबच्या काळातच जोडून घेतले आणि आता ती भवतालाशी भांडतेही आहे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात ती आपल्या युगाचा स्वरही बनली. अलीकडे त्यात आजचे वर्तमान आपला सूर शोधत आहे. या सातत्याच्या बदलत्या भूमिका बजावताना गझलेने कधी आयुष्याचा हात सोडला नाही. त्याच्याशी ती सच्ची राहिली. म्हणून आजही आत्म्याच्या सच्च्या सुराला पक्का आधार शोधताना गझलकडेच पाहतो. साडेचारशे वर्षांपूर्वी आपल्या प्रियेच्या स्मरणार्थ हैदराबाद शहराची निर्मिती करणारा कुली कुतुबशाह
पिया बाज प्याला पिया जाए ना
पिया बाज यक तिल जिया जाए ना
हे व्यक्त करू शकला; शतकांनंतरही त्याची प्रियेविना होणारी घुसमट त्याच्या अभिव्यक्तीतून आज आपल्या अस्वस्थतेशी एकरूप होते.
असं का?
कुली कुतुबशाह हा राजा होता. भागमती या नर्तकीला आपली बेगम हैदर बनवणारा. त्याच्या आर्त भावनेने माझं हृदय गलबलून का यावं?
याला कारण एकच असावं की, आपण सगळे आयुष्याच्या एका विशाल पात्रात आपापल्या प्रवाहात पोहत आहोत. म्हणून आपला जीवनानुभव जितका एकमेवाद्वितीय, तितकीच त्यातील वैश्विकताही सर्वमान्य!
म्हणूनच अगदी मीर तकी मीर यांचे समकालीन शायर मीर दर्द, यांनी आयुष्याबद्दलचा जो अनुभव व्यक्त केला, त्याबद्दल क्वचितच कोणी असहमत होईल.
जिंदगी है या कोई तुफान है
हम तो इस, जिने के हाथों मर चले

उर्दू गजलेतील शेर हा काळ, स्थितीचा परीघ ओलांडून प्रवास करण्याची क्षमता असलेला फॉर्म आहे. फॉर्मपेक्षाही ती अभिव्यक्ती आहे. त्यातील इन्फर्मेशनपेक्षा आपल्याला भिडतो तो अभिव्यक्तीचा भाव. अंदाज ए बयाँ! मीर म्हणाला होता की,
आरजुएँ हजार रखते है
फिर भी हम दिल को मार रखते है...
त्यानंतर पन्नासेक वर्षांनंतर गालिबने तीच बाब आपल्या ‘अंदाज ए बयाँ और' पद्धतीने सांगितली.
हजारों ख्वाहिशें ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले
बहोत निकले मेरे अरमाँ, लेकिन फिर भी कम निकले

या गझलांनी, शेरांनी माणसाच्या प्रवृत्तींचा, त्याच्या भल्याबुर्‍या अस्तित्वाच्या आणि इच्छा-आकांक्षांच्या ध्वनी-प्रतिध्वनींना शब्दरूप दिले. जगातील सर्व माणसांना एका विशाल प्रवाहात आपापल्या स्वतंत्र प्रवाहासकट सामील करून घेतले. माणूस बदलत नाही. त्याच्या मूळ प्रवृत्ती त्याच आहेत. त्याच्या या प्रवृत्तींची अभिव्यक्ती बदलत्या भवतालात वेगवेगळ्या पद्धतीने होते. ‘आधीचा काळ बरा होता, लोक चांगले होते, आता काळ वाईट आहे आणि माणसंही वाईट आहेत’ या समजावर आघात करताना ओशो आपल्या एका व्याख्यानात म्हणतो, ‘मग गौतम बुद्ध, महावीर हे लोक कोणाला सांगत होते की, चांगले वागा, चोरी करू नका, द्वेष करू नका, एकमेकांवर प्रेम करा..?’

उर्दू गझलने आपल्या भवतालातील माणसांच्या मुख्य भावभावनांशी आणि प्रवृत्तींशी सतत संवाद जारी ठेवला. म्हणून ती केवळ प्रियतमेची राहिली नाही. ती वेदनेची दुखरी नसही बनली आणि बंडाची ठिणगीही झाली. प्रेमाला शब्दरूपात नवनवीन पद्धतीने धुंडाळत राहिली आणि राजकीय प्रतिकूलतेवर उपरोधाची आसूडही बनली. त्यामुळे सगळे तिच्या प्रेमात आहेत. अर्थात, त्यातील सिंबॉलिझम, प्रतीकात्मकतेने त्याला कालमुक्त आणि परिस्थितीमुक्तही केल्याने त्याचा वापर रोजच्या जगण्यात मुबलक होऊ लागला. एखादा हजार शब्दांचा मुद्दा क्षणांत सामावून घेण्याची सर्वमान्यताही त्याला प्राप्त झाली. त्याचबरोबर त्यातील प्रतीकात्मकतेमुळे वेगवेगळ्या परिस्थितीत त्याचे नवनवीन अर्थ लावले गेले. ती त्याची ताकद बनली.
मीरचा एक शेर आहे-
नाहक हम मजबुरों पर यह तोहमत है मुख्तारी की
चाहते है सो आप करे है हमको अबस बदनाम किया
याचा थोडक्यात अर्थ असा होतो की, आम्ही मजबूर लोक हेच खरे समर्थ लोक आहेत, असे म्हणणे हा आमच्यावर आरोप आहे. कारण, तसे आम्हाला काहीही करायला मिळत नाही, फक्त आमची बदनामी तेवढी होते. कारण आमच्या नावाने मनमानी तुम्ही करत आहात.

मीरच्या अठराव्या शतकातील आग्रा आणि दिल्लीदरम्यानच्या सतत प्रवासातील वेदनादायी आयुष्याच्या टप्प्यात कधी तरी आलेल्या अनुभवाची ही अभिव्यक्ती आहे. हाच शेर आपल्या कॉमन मॅनच्या दृष्टिकोनातून आपल्या जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीच्या संदर्भात, पुन्हा वाचून पाहा. असं वाटतं ना की, ताज्या परिस्थितीवर अलीकडेच लिहिलाय हा शेर!
अर्थात, उर्दू शेरांनी नेहमीच मनोधैर्य बुलंद केलं. उदासीच्या क्षणांना स्वर देत एकटेपणा दूर केला. संकटांची चाहूल दिली, समस्यांना सामोरे गेले आणि काळोखाच्या गर्भात प्रकाश पाहिला. दुबळ्यांना उभारी दिली, दु:खीजनांना साथ दिली, अस्वस्थांना हाक दिली.
म्हणून ती चिरतरुण आहे, राहील.

एका नवीन दृष्टिकोनातून, आजच्या काळाच्या संदर्भात, आजच्या परिस्थितीच्या परिघात, या गझलेकडे नव्याने पाहता येईल का? तोच हा एक प्रयत्न आहे, त्याचा शेवट काही पण असू देत; पण प्रवास मजेदार असेल, याची खात्री बाळगायला हरकत नाही.
आणि नव्याने या गझलांकडे, त्या शायरांकडे का पाहू नये?
एका शायराने म्हटलंच आहे,
ये क्या गजब है के, पीर ए मुगाँ वही है अभी
नयी है बज्म, नयी है मै, नयी है महफिलें
अर्थात, जीवनाचे जुने तत्त्वज्ञान फजूल आहे. कारण आता भरलेल्या जीवनाच्या मैफलीत सर्व काही नवीन आहे...

ibrahim.afghan@gmail.com