आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय विषप्रयोग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘लव्ह जिहाद’ या टोकाच्या भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांनी हिंदू-मुस्लिम समाजात संशयाचे आणि अविश्वासाचे वातावरण तयार केले आहे. उत्तर प्रदेशातल्या पश्चिम भागात हिंदू मुलींना फसवून ‘लव्ह जिहाद’चे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप करून विहिंपसारख्या हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे, तर अशा प्रकारच्या तुरळक घटना घडल्या असतीलही; पण या घटनांचा संबंध राष्ट्रद्रोहाशी आणि सक्तीच्या धर्मांतराशी जोडून अपप्रचार तंत्र राबवले जात असल्याचे मत समाज अभ्यासकांत व्यक्त होत आहे. तसे असेल तर उत्तर प्रदेशातल्या होऊ घातलेल्या १२ जागांसाठीच्या पोटनिवडणुका आटोपल्या की ‘लव्ह जिहाद’चा मुद्दा अजेंड्यावरून गायब होईलही, पण धर्मांतरावरून राजकीय फायद्यासाठी दोन समाजांत पसरवले गेलेले िवष सहजपणे उतरेल? समाजात दुहीची बीजे पेरणाऱ्या घटनांचा ज्येष्ठ पत्रकार इब्राहिम अफगाण आणि नामवंत लेखक-दिग्दर्शक सतीश मनवर यांनी घेतलेला अभ्यासपूर्ण वेध...

सलमान लोकांचे जगभरात आक्रमण होत आहे. त्यांनी आता आपला धर्म वाढवण्यासाठी हिंदू तरुणींना प्रेमात अडकवून मुस्लिम बनवण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ नावाच्या कटाची अंमलबजावणी देशात सुरू केलेली आहे, असा ओरडा व्हायला लागला आणि सगळेच खडबडून जागे झाले. कारण आतापर्यंतची समस्या ही शेजारी राष्ट्रांमधला द्वेष, धर्मांमधला त्वेष, दोन वस्त्यांतली तेढ, दोन मिरवणुकांमधला वाद आणि दोन पक्षांमधले वाटे यापुरती मर्यादित होती. आता थेट हल्ला प्रेम आणि लग्न या अद्याप राजकीय शक्तींपासून शाबूत राहिलेल्या नाजूक आणि निजी भावनांवर होत आहे.
‘लव्ह जिहाद’ची चर्चा काही वर्षांपूर्वी केरळमध्ये सुरू झाली आणि नंतर कर्नाटकात. दोन्ही ठिकाणी सरकारी पातळीवर आणि न्यायालयीन पातळीवर त्यावर चर्चा, चौकशी आणि पडताळणी होऊन ‘लव्ह जिहाद’ नावाचा कोणताही प्रकार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. दोन्ही राज्यांत तेथील उच्च न्यायालयांनी पोलिसांना तशी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी चौकशी करून अशी बाब अस्तित्वात नसल्याचा अहवाल दिला. तरीही अद्याप ही चर्चा सुरू आहे. आणि ती प्रसारमाध्यमातून जिवंत ठेवली जात आहे.

या प्रकाराला जबाबदार कोण आहे, यावरही पुरेशी चर्चा झालेली आहे आणि त्यातून ही हिंदुत्ववादी संघटनांची एक रणनीती आहे, असाच बहुतांश अभ्यासकांनी निष्कर्ष काढला आहे. हिंदुत्वाचा झेंडा त्यांनी घेतलेला असल्याने ते वावगे नाही. त्यांचा आतापर्यंत विद्वेषाच्या भावनेवरच भर राहिलेला आहे. केरळ आणि कर्नाटकनंतर आता उत्तर प्रदेशात मेरठमधील घटनांना ‘लव्ह जिहाद’चे लेबल लावले गेले आहे. मेरठमधील मदरशामध्ये शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या हिंदू मुलीने तिच्यावर काही मुस्लिम तरुणांनी बलात्कार केल्याचे सांगितले आणि त्यांना अटक झाली. त्याची चौकशी पूर्ण होण्याआधीच विहिंपसारख्या संघटनांनी त्याला हा ‘लव्ह जिहाद’च्या व्यापक कटाचा भाग असल्याचे जाहीर केले आहे. ज्या ठिकाणी निवडणुकीतून फायदा मिळवायचा आहे, त्याच ठिकाणी ही विषपेरणी होत आहे; त्यासाठी संत महंत स्वामी म्हणवणारे त्यात हिरीरीने भाग घेत आहेत.

लव्ह जिहादचे ‘मॅन्युअल’
या बाबतीत उल्लेखनीय बाब म्हणजे, जे केरळ आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील पोलिसांना हाती लागले नाही, त्याचे सगळे पुरावे, कार्यपद्धती आणि अजेंडा याचे जणू ‘मॅन्युअल’च हिंदू जनजागृती समितीने आपल्या hindujagruti.com या वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार केरळमधील ‘लव्ह जिहाद’मध्ये सहभागी तरुणांसाठी एका हिंदू किंवा बिगर मुस्लिम तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी दोन आठवड्यांचा आणि लग्न करून तिचे धर्मांतर करण्यासाठी सहा महिन्यांचा काळ निश्चित केला आहे. हिंदू तरुणी जिहादी तरुणाच्या प्रेमाच्या जाळ्यात दोन आठवड्यांत नाही अडकली, तर त्याने तिला सोडून दुसऱ्या तरुणीला दोन आठवड्यांत फसवले पाहिजे. त्यासाठी नव्याने कॉलेजमध्ये जाणाऱ्या हिंदू मुलींची यादी तयार केली जाते. मग ते कॉलेजच्या बाहेर रोड रोमिओ बनून हिंडतात. (या पद्धतीने जहाँगीर रज्जाक या तरुणाने तब्बल ४२ तरुणींना फसवल्याची माहिती त्यात आहे.) दुसरी पद्धत म्हणजे, या तरुणांना फोनवर गोड गोड कसे बोलायचे, याचे प्रशिक्षण दिले जाते. ही पद्धत शाळेतील मुलीपासून आयटी इंजिनिअरपर्यंत सर्व तरुणींसाठी वापरली जाते. यासोबत हिंदू मुलींचे फोन नंबर कसे मिळवले जातात, इथपासून त्यांच्या ज्यूस अथवा आइस्क्रीममध्ये त्यांच्या मनावर ताबा मिळवून देणारी खास औषधे मिसळली जातात. वशीकरण, ब्लॅक मॅजिक अशा पद्धती अवलंबल्या जातात, इथपर्यंत गोष्टी सांगितलेल्या आहेत. वशीकरण आणि काळी जादू टाळण्यासाठी हिंदू मुलींनी काय काय उपाययोजना करायच्या आहेत, हेही त्यात सांगण्यात आले आहे. यातील कोणत्याही गोष्टीला पुरावा नाही; पण त्याने बुिद्धभेद साधता येतो. मी ही यादी वाचत असताना मला हसू आले, ते दोन कारणाने. पहिले म्हणजे, हिंदू मुली खरंच इतक्या मूर्ख असतात का? याचे उत्तर मी नक्कीच ठामपणाने देऊ शकतो की नाही. कारण माझ्या घरचेच उदाहरण आहे. दुसरे कारण म्हणजे, भाजपचे मुस्लिम नेते शाहनवाज हुसैन. त्यांनी रेणू शर्माच्या प्रेमासाठी काय काय केले आणि कसे लग्न केले, हे वाचले तर त्यांनीही हेच ‘मॅन्युअल’ वापरले असावे असा भास होईल. दुसरे मुस्लिम भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी यांच्या विवाहाची कहाणी फार वेगळी नाही.

अर्बन लिजेंड्स
हा एक अर्बन लिजेंड्स निर्माण करण्याचा प्रकार आहे. लहानपणी नसलेला बागुलबुवा दाखवून आपल्याकडून विशिष्ट गोष्टी करवून घेतल्या जायच्या. हाही प्रकार तसाच आहे. अशा शहरी आख्यायिका खऱ्या नसल्या, तरी त्या खऱ्या असाव्यात अशा पद्धतीने माणसं ती स्वीकारत असतात. उदा. भूत, पैशांचा पाऊस, गुप्त धन इत्यादी. आपण त्या एका प्रत्यक्ष अस्तित्वात नसलेल्या संकटाची, शत्रूची भीती दाखवली जात असताना, त्यात गुंतून पडतो. मात्र, त्या वेळी खिशातून काय काढून घेतले जात आहे, हे आपल्याला कळत नाही. तोच हेतू यातही दिसतो. राजकीय लोकांसाठी देशावरचे संकट, धर्मावरचे संकट, महनीय व्यक्तीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आदी बागुलबुवा नेहमीच यशस्वी होतात. आजही धार्मिक आणि जातीय दंगली होण्यामागचे कारण ही बाब अजून फायदेशीर ठरते, आहे. या दंगलीही शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनुसार तेजी-मंदी फेजमधून जातात. दुसरी गोष्ट म्हणजे, आताच्या काळात अशा शहरी आख्यायिका निर्माण करून त्या लोकांत रुजवणे सोपे आहे.

पूर्वी पहाटे दारावर थाप देणाऱ्या देवीची आख्यायिका किंवा अकरा पत्रं लिहायला लावणाऱ्या मातेच्या आख्यायिका लोकांत रुजवायला काही महिने आणि वर्षे लागायची. आता टीव्ही, फेसबुक, व्हॉट्सअॅप आदींतून काही तासांत ही सुरू करून माध्यमातून चर्चा घडवून दोन चार दिवसांत एखाद्या सिरियलच्या पुढच्या एपिसोडमध्ये आणून सर्वमान्य करता येते. कारण आता मीडियाच्या अंगात आलेलं आहे, हे त्यातील व्यावसायिकांना नीट माहिती आहे; त्याचाच गैरफायदा घेतला जात आहे. कोणता मीडिया कोणत्या गळाला कसा अडकेल, याचे डावपेच खूप मोठ्या पातळीवर आखले जातात. जनमानसाचे मानसशास्त्र किती प्रकट असू शकते याची कल्पना आपल्याला नाही, पण मीडिया पंडितांना आहे. गेल्या निवडणुकीत मीडियाच्या यंत्रणा काय काय परसेप्शन्स निर्माण करू शकतात, आणि कोणत्या प्रमाणात राजकीय लाभ मिळवून देऊ शकतात, याचे दाखले मिळाले आहेत.
तेढीपेक्षा सलोखा अधिक
तथापि, हे अधोरेखित केले पाहिजे की, आपल्या देशात हिंदू-मुस्लिम विषयाला धरून जितकी तेढ आहे त्याहून अधिक त्यांच्यात सलोखा आहे. याचे कारण त्यांच्यातील संबंध हे अनेक पिढ्यांमधून विणले गेलेले आहेत. अस्मानी-सुलतानी अरिष्टांपासून रोजच्या जगण्यातील संघर्षांशी लढताना लाभलेल्या एकमेकांच्या आधाराने निर्माण झालेले आहेत. हा इतिहास जनतेसाठी खूप मोलाचा आणि काही राजकीय शक्तींच्या दृष्टीने खूप गैरसोयीचा आहे. आणि म्हणूनच हिंदुत्ववादी संघटनांना हा धार्मिक एकसंघतेची वीण झलकवणारा इतिहास बदलण्याची खूप घाई आहे.
परंतु त्याचबरोबर या नवीन शहरी आख्यायिकांनी एका गोड समजाला मुळापासून उपटून काढलेलं आहे, याचे समाधान मानावे लागेल. ते म्हणजे, हे बंध इतकेही मजबूत झालेले नाहीत अजून! ते आताही एका राजकीय डावपेचाने तुटू शकतात; एका लेबलाने बदनाम होऊ शकतात. या बुद्धिभेदाला आजही लोक बळी पडू शकतात. हा अजेंडा यशस्वी होऊ शकतो; त्याचा राजकीय लाभ मिळू शकतो, ही शोकांतिका आहे. प्रेम आणि विवाह या क्षेत्रात आधीच खूप पोकळी आहे. ज्या आधुनिक आणि प्राचीन आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय प्रेमकथा आहेत, ते क्षीण असले, तरी ते अद्याप पेटत राहिलेले दिवे आहेत. एरवी झाकोळलेल्या सार्वजनिक जीवनात ते नवीन दिवे पेटत आहेत. निदान, त्यांना तरी या विद्वेषाच्या राजकारणापासून वेगळे ठेवायला हवे. हिंदू -मुसलमानपेक्षा कोणत्याही धर्मापेक्षा उच्च असलेली माणूस म्हणून जगण्याची धारणा हे दिवे दाखवत आहेत. आशेचे दिवे हे तेवढेच आहेत. ते निदान विझवू नका.

उनका जो काम है वो अहले सियासत जाने
मेरा पैगाम मुहब्बत है जहाँ तक पहुँचे...


(ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक.)
ibrahim.afghan@gmail.com