आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
कधी-कधी आपण एखादं पुस्तक वाचायला हातात घेतो एका उद्देशाने आणि वाचता-वाचता त्यातून काही वेगळेच सामोरे येते. रमाबाई रानडे यांच्याबद्दल शाळेत इतिहासाच्या धड्यातून काही वाचलेलं होतं. पण आताशा जाणवायला लागलं होतं की त्यांच्याबद्दल जाणून घेण्याजोगं खूप काही आहे. झी मराठीवरच्या ‘उंच माझा झोका’मुळे हे कुतूहल अधिक वाढलेलं होतं. त्यामुळे स्वत: रमाबानी लिहिलेलं एक आणि त्यांच्यावर लिहिलेली दोन पुस्तकं उपलब्ध आहेत हे कळल्यावर ती लगेच वाचायला घेतली. तिन्ही पुस्तकं वाचल्यावर रमाबाच्या वैयक्तिक व सामाजिक जीवनाबद्दल चकित करणारी माहिती हाती आली. परंतु सर्वात लक्षवेधी वाटले ते या दोघांचे अतिशय सहज, परस्परपूरक सहजीवन.सव्वाशे वर्षांपूर्वीच्या एक जोडप्याविषयी आपण वाचतोय, असे वाटेचना एवढे त्यांचे नाते मोकळे, आधुनिक म्हणावे असे होते.
माधवरावांची पहिली पत्नी सुमारे वीस वर्षांच्या संसारानंतर मरण पावली. त्यानंतर दोन महिन्यांच्या आतच त्यांच्या वडिलांनी त्यांचे लग्न रमाबाईंशी, माधवरावांच्या इच्छेविरुद्ध लावून दिले. या वेळी रमाबाई 11 वर्षांच्या होत्या तर माधवरावांनी तिशी ओलांडलेली होती. दुसरा विवाह करूच नये, किंवा केलाच तर विधवेशी करावा, हा नवमतवादी विचार मागे ठेवून वृद्ध वडिलांची इच्छा व त्यायोगे कुटुंबात शांतता राखण्यासाठी त्यांनी हे लग्न केले होते. तरीही, याचा राग पत्नीवर न काढता, माधवरावांनी तिला गमभनपासून इंग्रजीपर्यंत भाषांचेच शिक्षण दिले असे नव्हे तर घरातल्या वडीलधा-या स्त्रियांच्या विरोधाला न जुमानता शांतपणे कसे आपल्या उद्दिष्टापर्यंत वाटचाल करावी, याचेही शिक्षण दिले.
लग्नाच्या दिवशी माधवरावांनी रजा घेतली नव्हती. न्यायालयातील काम आटोपून गोरज मुहूर्तावर लग्न लागल्यावर ते घरी आले व रागाने त्यांनी खोलीत कोंडून घेतले. दुस-या दिवशी त्यांना या वागण्याचा पश्चात्ताप झाला व त्यांनी रमाबाशी संभाषण सुरू केले. त्यांच्या घरची चौकशी केली व त्या रात्रीच त्यांच्या शिक्षणाचा श्रीगणेशा केला. अर्थातच या शिक्षणाला घरातील समस्त स्त्रीवर्गाचा अतिशय विरोध झाला. रमाबाना अभ्यास करू न देणे, त्यांना त्यावरून टोचून बोलणे हे नेहमीचेच होते.
दिवसभरात असे काही झालेले असले की रमाबाईंशी च्या चेह-या वर रात्री ते दिसून येई. त्यांनी कधीच कोणाची कागाळी नव-या कडे केली नाही परंतु माधवरावांना ते नेमके ठाऊक होई. त्यावर ते म्हणत, ‘तू वाचन, अभ्यास चांगला करतेस, त्याचं मला फार समाधान वाटतं. इतर कोणी काही बोलले, तरी रडत जाऊ नकोस. थोडं सोसावयास शिकावं. त्यांना उत्तर दिलं नाही म्हणजे झालं. अभ्यास, वाचन चालू ठेवलेस म्हणजे तुझा तुलाच जास्त आनंद व समाधान वाटू लागेल.’ मात्र इतरांसमोर त्यांनी रमाबाईंचे कौतुक कधी केले नाही, कारण त्याचा परिणाम उलटाच झाला असता हे त्यांना माहीत होते.
काही काळाने माधवरावांची बदली नाशकास झाली व तेथे ते रमाबाईंना घेऊन गेले. घरातील इतर कोणी स्त्रिया तेथे नव्हत्या. त्यामुळे रमाबावर घराची जबाबदारी जशी पडली तसाच या दोघांना एकमेकांसोबत वेळ मिळू लागला. अर्थात त्यातला बराचसा वेळ लिखाण, वाचनात जाई, हेही खरे. परंतु दोघे एकत्र फिरायला जात. रमाबाच्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवातही याच काळात झाली. या काळातली एक आठवण आजही आदर्शवत आहे. रमाबाईंच्या हातून कै-या पाडताना सोन्याचा छंद हरवला. त्याने त्यांना फार अपराधी वाटू लागले व त्या हिरमुसून गेल्या. योगायोगाने त्याच दिवशी माधवरावांची जस्ताची तपकिरीची डबी हरवली. त्यावर ते एवढेच म्हणाले, ‘जिन्नस हरवणे म्हणजे सावधपणा किंवा हुशारी कमी, एवढा दोष येतो. तो न येण्यास जपावे, हे बरे. पण त्याबद्दल सगळा दिवस इतके खिन्न का व्हावे. हसून खेळून समाधानाने राहावे, म्हणजे दुस-यालाही बरे वाटते. त्या काळात माधवरावांना सुमारे हजार रुपये पगार होता, हे लक्षात घेऊनही 75 रुपये किमतीचा छंद हरवल्याबद्दल पत्नीची अशी समजूत काढणे, माधवरावांच्या परिपक्व व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगून जाते.
माधवराव रमाबाईंशी बोलताना अत्यंत सहज नर्मविनोदाचा वापर करत, तोही फार लोभस वाटतो. नाशिकला असताना एकदा रमाबाचे मुलींच्या शाळेत भाषण होते. तर माधवराव रात्री जेवताना त्यांना म्हणतात, ‘शाळेत व्याख्यान देण्याची आवश्यकता असेलच. मला ऐकल्यासारखे वाटते, गावातील लोक बोलत होते की येथे एक भल्या जाड्या विद्वान बाई आल्या आहेत. त्यांचे व्याख्यान आहे. हे शब्द तुझ्याबद्दलच असतील.’ रमाबाई हाडापेराने मोठ्या, बेताच्या उंचीच्या व चांगल्या शरीरप्रकृतीच्याही होत्या. त्यामुळे माधवरावांच्या विनोदावर त्या शालीनतेने व नम्रपणाने एवढेच उत्तर देत, ‘यापैकी भल्या जाड्या हे शब्द मात्र मला लागू पडतात.’
रमाबाई केवळ एका न्यायाधीशाची पत्नी न राहता त्यांना स्वतंत्र व्यक्तिमत्त्व होते व वहिनीसाहेब नावाने त्या परिचित होत्या. पतीच्या निधनानंतर 23 वर्षे त्यांनी समाजासाठी खपून व्यतीत केली. पती म्हणतो ते खरे व ते मला पूर्णपणे पाळायचे/पार पाडायचे आहे अशी त्यांची नितांत श्रद्धा होती. त्याच बळावर त्यांनी मोठा विरोध सोसून शिक्षण सुरू ठेवले तसेच माधवरावांच्या निधनानंतर केशवपन करण्याचे व सोवळ्यात जाण्याचेही नाकारले. पतीने आयुष्यभर ज्या मताचा पुरस्कार केला, तो त्याच्या निधनानंतर सुरू ठेवणे त्यांनी समाजाच्या व कुटुंबाच्या कडव्या विरोधाला न जुमानता पत्करले.
माधवरावांसारखा गुणग्राही पती न मिळता तर यमुना कुर्लेकरची रमाबाई रानडे झाली नसती हे खरेच. परंतु त्याच यमुनेत मूळ तीक्ष्ण बुद्धी, सोशिकपणा व कणखरपणा नसता तर माधवरावांच्या परिश्रमांना असे लखलखीत यश मिळाले नसते, असेच या दोघांबद्दल वाचल्यावर वाटते. परस्परपूरक असलेले हे जोडपे म्हणूनच आजही आदर्शवत वाटते.
mrinmayee.r@dainikbhaskargroup.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.