आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औदर्याचा आदर्श

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातील सर्व धर्मांच्या धर्मग्रंथांपेक्षा शिखांच्या ‘श्रीगुरुग्रंथसाहिब’ या धार्मिक ग्रंथाचे वेगळेपण म्हणजे त्यास ‘गुरुपद’ प्राप्त झाले आहे. ग्रंथास देहधारी रूपातून पाहणे, हे शिखांचे व या ग्रंथाचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल. महाराष्‍ट्रातील नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा श्री हजूरसाहेब येथे 4 ऑक्टोबर 1708 या दिवशी श्रीगुरुगोविंदसिंघजी यांनी ग्रंथास गुरुपदी स्थापित केले व सांगितले
आगिआ भई अकाल की तभै चलायो पंथ।
सम सिखन को हुकम है गुरू मानिओ ग्रंथ॥
गुरू ग्रंथजी मानिओ प्रगट गुरां की देह।
जोप्रभ को मिलबो चहै खोज शबद महिलेह ॥
याचा अर्थ असा की, प्रभू परमात्म्याच्या आज्ञेप्रमाणे हा खालसा पंथ स्थापन केला. सर्व शिष्यांना आज्ञा आहे की, यापुढे या ग्रंथासच गुरू मानावे. हा ग्रंथ प्रत्यक्ष देहधारी गुरू आहे, असे मानावे. ज्यांना परमेश्वराची प्राप्ती व्हावी असे वाटत असेल त्यांनी या गुरुवाणीतून त्याचा शोध घ्यावा.


‘श्रीगुरुग्रंथसाहिब’ हा 1430 पानांचा महाग्रंथ आहे. त्यात 5894 पदे आहेत. श्रीगुरुग्रंथसाहिबमधील पदांना ‘सबद’ किंवा ‘बाणी’ असे म्हणतात. तसेच पानांना ‘अंग’ असे म्हणतात. हा ग्रंथ पद्यमय आहे आणि या ग्रंथातील बहुतांश पदे (शब्द किंवा सबद) ही कोणत्या ना कोणत्या शास्त्रीय रागात गाता व ऐकता येतात. या ग्रंथाचे इतर धर्मग्रंथांपेक्षा आणखी वेगळे वैशिष्ट्य म्हणजे, हा ग्रंथ एकाच काळात व एकाच व्यक्तीने लिहिलेला नाही. सहा शीख गुरूंनी वेळोवेळी केलेल्या उपदेशाचे हे एकत्र संकलन आहे. शिखांच्या दहा गुरूंपैकी पहिले पाच गुरू व नववे गुरू अशा सहाच गुरूंनी पद्यरचना केली. ती या पवित्र ‘श्रीगुरुग्रंथसाहिब’मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. दहावे गुरू श्रीगुरुगोविंदसिंघ यांनी केलेली पद्यरचना स्वतंत्रपणे ‘दशमग्रंथ’मध्ये समाविष्ट केली आहे. या ग्रंथाचे आणखी वेगळेपण असे की, शीख धर्म स्थापनेपूर्वीही भारतात होऊन गेलेल्या अनेक संतांच्या रचनांचा समावेश या ग्रंथात केला आहे. थोडक्यात, गुरुनानकांपूर्वीपासून ते गुरू तेगबहाद्दरजींपर्यंतच्या 500 वर्षांच्या प्रदीर्घ काळातील संपूर्ण भारतातील भक्तिमार्गाचा, अध्यात्ममार्गाचा एकत्र असा भक्तिकोश किंवा ज्ञानकोशच आहे. शिखांचे पाचवे गुरू श्रीगुरुअरजनदेव यांनी या सर्व पद्यमय पदांचे एकत्रित संकलन करण्याचे काम 1595मध्ये सुरू केले व 1604मध्ये पूर्ण केले. 1 सप्टेंबर 1604 या दिवशी त्याची अमृतसरमधील हरी मंदिरात श्रद्धेने व भक्तिपूर्वक स्थापना केली. या ग्रंथास, त्या वेळी ‘श्रीआदिग्रंथ’ किंवा ‘पोथीसाहेब’ असे म्हटले जायचे. ही ‘पोथीसाहेब’ करताना सर्व पद्यांच्या अस्सलतेची खात्री करणे, त्यात काही पदांत अशुद्धता आली असल्याने ती शुद्ध करणे, विखुरलेली व हरवलेली पदे मिळवणे, त्यांची सत्यता पडताळून पाहणे, हे अतिशय जिकिरीचे काम श्रीगुरुअरजन देवांना करावे लागले. परंतु पुढील गुरूंनी एक पथ्य पाळले, ते म्हणजे प्रत्येकाने पद्यरचना केल्यावर पानाच्या शेवटी आपली नाममुद्रा स्पष्ट उठवणे. त्यामुळे पुढील काळात अस्सल व नक्कल याचा शोध सहजसुलभ झाला. पुढील सर्व गुरूंनी आपल्या पदाचा शेवट ‘नानक म्हणे’ - नानक सांगतात, असा केला आहे. त्याचे कारण सर्व गुरूंची अशी समजूत आहे की, गुरुनानकांचा देह त्यांच्याच देहात सामावलेला आहे व तेच गुरुनानक आपणाकडून हे कार्य करवून घेत आहेत. हा ग्रंथ संकलित करताना प्रत्येक रचना कोणत्या गुरूची आहे, हे समजावे म्हणून त्या पदाअगोदर ‘महला’ असा शब्द वापरला आहे. उदा. ॥म. 1॥ याचा अर्थ म. 1 म्हणजे श्रीगुरुनानकदेव व ॥म. 4॥ म्हणजे श्रीगुरू रामदास इत्यादी. गुरुग्रंथ लेखनाचे काम अमृतसरपासून तीन कि. मी. अंतरावर असलेल्या ‘रामसर’ तलावाच्या काठी बोरीच्या झाडाखाली बसून झाले. हा आदिग्रंथ श्रीगुरुअरजनदेवजी यांनी भाई गुरुदासांना सांगितला व तो त्यांनी लिहून घेतला. श्रीगुरुअंगदेवजी यांनी तत्कालीन लिपीत सुधारणा केली. या लिपीस ‘गुरुमुखी लिपी’ म्हणतात. हा महाग्रंथ गुरुमुखी लिपीत लिहिला आहे. अमृतसर येथे श्रीगुरू रामदास यांनी सुरू केलेले तलावाचे काम ‘श्रीगुरुअरजन देव’ यांनी पूर्ण केले.

तलावाच्या मध्यभागी एक मंदिर बांधले, त्यास ‘हरि मंदिर’ म्हणतात. ‘हरि मंदिरात’ 1 सप्टेंबर 1604 रोजी ग्रंथाची उच्चासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. वयोवृद्ध नानकशिष्य भाई बुढाजी यांनी प्रथम ग्रंथपठण केले. तेच आदिग्रंथाचे पहिले ‘ग्रंथी’. सदर ग्रंथात गुरुनानकांपासून ते गुरुअरजनपर्यंतच्या पाच गुरूंच्या रचना व उत्तर भारतातील काही संतांच्या रचनांचा समावेश होता. पुढे दहावे गुरू श्रीगुरुगोविंदसिंघ यांनी आपले पिता नववे गुरू तेगबहाद्दरजी यांच्या रचना समाविष्ट करून सुधारित आवृत्ती तयार केली. हे काम त्यांनी दमदमासाहेब या गावी केले म्हणून त्यास ‘दमदमी बीड’ असे म्हणतात. बाबादीपसंघजी यांनी श्रीगुरुगोविंदसिंघजी यांच्या आदेशाप्रमाणे त्याच्या चार प्रती केल्या त्यापैकी एक हरि मंदिर (अमृतसर), दुसरी आनंद साहेब, तिसरी हुजूरसाहेब (नांदेड) व चौथी श्री पटणासाहेब या गुरुद्वारात पाठवून दिल्या. नांदेड येथे आल्यानंतर आपल्या अंतकाळी त्याची गुरुपदी प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून त्यास ‘दशम ग्रंथ’ म्हणतात. या ग्रंथात शिखांचे सहा गुरू ‘श्रीगुरुनानकदेव’, ‘श्रीगुरुअंगददेव’, ‘श्रीगुरुअमरदास’, ‘श्रीगुरुरामदास’, ‘श्रीगुरुअरजनदेव’ व ‘श्रीगुरुतेगबहाद्दर’ यांच्या रचनांबरोबरच भारतातील मध्ययुगीन संतांची वाणीही संकलित केली आहे. ‘श्रीसंत कबीर’, ‘शेख फरीद’, ‘संत नामदेव’, ‘संत रविदास’, ‘संत त्रिलोचन’, ‘संत भीखन’, ‘संत जयदेव’, ‘संत सधना’, ‘संत रामानंद’, ‘संत सूरदास’, ‘संत धन्ना’, ‘संत वेणी’, ‘संत पीपाजी’ व ‘संत परमानंद’ या महान संतांच्या रचनाही या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत. शीख संप्रदायातील गुरू-शिष्यांची काही पदे यात समाविष्ट केली आहेत. त्याचबरोबर कलसहारजी, नळजी, भलजी, सलजी, बलजी, जालपजी, कीरतजी, भिखाजी, मधुराजी, गयंदजी, हरिवंसजी या भाटांची वाणीही ग्रंथित केली आहे. ही सर्व नामावली पाहिली तर असे स्पष्ट होते की, हे सर्व रचनाकार विविध जातीचे, वर्णाचे होते. ही सर्व पदे कोणत्या ना कोणत्या विशिष्ट रागात बद्ध केली आहेत. मात्र, काही पदे कोणत्याच रागात म्हणता येत नाहीत. उदा. जपू, गाथा, चऊबोले, फुनहे, सलोक, सवैये, मुंदावणी, रागमाला इत्यादी.

श्रीगुरुनानकदेव यांनी आपल्या जीवनात सुमारे 24 वर्षे संपूर्ण भारत, तिबेट, श्रीलंका, अफगाणिस्तान, अरबस्तान, इराण, इराक, तुर्कस्थान अशा विविध ठिकाणी सर्वदूर प्रवास केला असल्यामुळे गुरुनानकांच्या रचनांत आणि श्रीगुरुग्रंथात मध्ययुगीन भक्तांच्या रचनांचा समावेश केला गेला आहे. भारतातील तत्कालीन भाषांचा म्हणजे पंजाबी, साधुकडी, प्राकृत, अपभ्रंश, व्रज, अवधी, गुजराती, मराठी, बंगाली, फारसी, अरबी या भाषांचा प्रभाव पडलेला आहे. गुरूंची, संतांची जशी यात पदे आहेत, तशीच शिष्यांची व भाटांची वाणी आहे. शिखांच्या सर्वसमावेशक व अशा मोठ्या मनाचे प्रतिबिंब सर्वार्थाने या महाग्रंथात उमटलेले आहे.

arunjakhade@padmagandha.com