आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वत:चे सामर्थ्य ओळखा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मित्रांनो, नुकतंच मुंबईच्या डबेवाल्यांविषयीचं काही लिखाण वाचनात आलं. पठ्ठे बापूरावांनी म्हटल्याप्रमाणे ‘मुंबई नगरी गं बडी बाका, जैसी रावणाची दुसरी लंका’ अशी ही मुंबापुरी! आणि या मुंबापुरीचं वैशिष्ट्य, इथली झगमगाट, वलयांकित, तारांकित व्यक्तिमत्वे. इथली खाद्य, नाट्य, कला, साहित्य, संस्कृती आणि त्याच संस्कृतीला साजेसे मुंबईचे डब्बेवाले! यांना मुंबईच्या संस्कृतीमध्ये आपलं मानाचे स्थान आहे, नव्हे हे तर ठरले आहेत. ‘मॅनेजमेंट गुरू’! हे सगळं सांगण्याचं एकमेव कारण म्हणजे ‘करिअर’! आज या करिअरचा केवढा मोठा बोलबोला होताना दिसतोय. मला सांगा, ‘करिअर म्हणजे नक्की काय असतं’ असं जर कुणी विचारलं तर बहुतांश लोकांच्या मते ‘नोकरी’ असं उत्तर येतं किंवा येवू शकतं. मग पदरात पडेल ती नोकरी करणं म्हणजे करिअर होऊ शकतं का किंवा ‘कायम नोकरी’ म्हणजे करिअर म्हणता येतं का अशा संभ्रमात आपला विद्यार्थी मित्र पडलेला आढळतो. हाच संभ्रम दूर करण्यासाठी या लेखाचा प्रपंच! आणि वर डबेवाल्यांचा उल्लेखही त्याच अनुषंगाने केला की डबेवाल्यांची सेवा हासुद्धा एक करिअरचा महत्त्वपूर्ण भागच म्हणायला हवा.

फक्त गल्लत कुठे होते तर मानसिकतेमध्ये! (दुर्दैवाने) आपल्या समाजाने काही गोष्टीचं स्टॅन्डर्डायझेशन किंवा प्रामाणिकरण केलं आहे जसं इंजिनिअरींगशिवाय किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमाशिवाय कुठेच (फारसं) डोकं लागत नाही. त्यामुळे पोरगा इंजिनिअरींगला गेला म्हटलं की घरच्यांना कोण धन्यता वाटते. आता इंजिनिअरींगला ‘गेला’ याचा अर्थ दुस-या किंवा तिस-या सत्रातच बदलू शकतो हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. शिवाय आज नुसतं डॉक्टर म्हणजे एमबीबीएस शिक्षण होऊनही भागत नाही.


स्पेशलायझेशन किंवा सुपरस्पेशलायझेशन केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणजे कमीत कमी सात ते दहा वर्षांची गुंतवणूक आणि कितीतरी लाखांचा व्यवहार. त्यापेक्षा आपली आवड, इच्छा, ऊर्जा, क्षमता यांचा विचार करून जर एखादं निवडलं गेलं तर त्यात खरोखरीच अतिशय आनंद तर आहेच शिवाय अयशस्वी होणं तेवढंस कठीण नाही. आपण एक ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी केली. त्यांचं एक उदाहरण अतिशय उपयुक्त आहे. मॅट्रिकचा निकाल लागलेल्या आपल्या मुलाला टिळकांनी पत्र पाठवले आणि त्या पत्रात त्यांनी म्हटले की अभ्यासात कमी गुण मिळाले किंवा नापास व्हावं लागलं त्याने फारसं काही बिघडत नाही. कारण मनापासून केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही. फक्त तू जे काही करशील आयुष्यामध्ये ते ‘चांगलं’ कर. अगदी जोडे बनविण्याचं काम जरी तू करायचं म्हटलेस तरी माझी काही हरकत नाही. जगातील सर्वोत्तम जोडे कुठे मिळतील असं कुणी विचारलं तर त्यांना सांगता यायला हवं की, ‘टिळकांकडे उत्तम प्रतीचे जोडे मिळतील.’


म्हणजे मित्रांनो बघा- वरील संवाद दोन गोष्टींकडे आवर्जून लक्ष वेधून घेतो. एक म्हणजे पालक-पाल्य संवाद आणि दुसरे म्हणजे मानसिकता! मला हेच सांगायचं आहे की जगात चांगलं करिअर किंवा वाईट करिअर असं काही नसतं. आपण आपल्या मेहनतीने, कष्टाने, चिकाटी आणि संयमाने ते चांगलं करावं लागतं. यासाठी काही टिप्स आपण बघुयात.
1) स्व-अभ्यास आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक कुवतीचा अंदाज घ्यायला शिकायला हवं. इतरांशी फाजील तुलना करण्यापेक्षा स्वत:ला काय आवडतं किंवा स्वत:मधील बलस्थाने आणि मर्यादा कोणत्या आहेत याचा विचार केल्यास पुढील प्रवास खूप सोपा जावू शकतो.
2) सकारात्मक विचार, सद्गुणांची कास आणि सत्कर्म : एखाद्या निवडलेल्या क्षेत्राचा सर्वांगिण विचार व्हायला हवा. सगळ्यात वाईट काय होऊ शकतं याची मानसिक तयारीही व्हायला हवी म्हणजे पुढील निराशा टाळता येऊ शकते. यश मिळवणं सोपं पण टिकवणं कठीण असतं म्हणून ते टिकवण्यासाठी सद्गुणांचा, चांगल्या विचारांचा प्रभाव आपल्या व्यक्तिमत्वावर पडायला हवा. आयुष्यात ख-या अर्थाने यशस्वी होण्यासाठी मुळात आपण एक चांगली व्यक्ती असणं गरजेचं असतं हे कुणाच्या लक्षातच येत नाही. वृत्तीने वाईट, विचारांनी अपरिपक्व, लबाडी करणारी व्यक्तिमत्वाकडे कितीही पदव्या असल्या तरी पत नसते.
3) प्रतिभा- आपण जे क्षेत्र निवडू त्यामध्ये आपण उत्तमता मिळविण्याकडे किंवा ‘उत्तम’ होण्याकडेच कल दिला पाहिजे. सचिन तेंडुलकरच्या पदवी परीक्षेतील मार्कांमध्ये कुणाला रस नसतो. लताबाई मंगेशकरांना स्वयंपाकघरातील एखादा पदार्थ येतो का असं विचारण्याचीही हिम्मत कुणाची होऊ शकत नाही कारण आपल्या क्षेत्रामध्ये त्यांनी संपूर्ण विश्वावर जणू मोहिनी टाकलेली आहे. तेव्हा मित्रांनो, मला ठाऊक आहे तुमच्यामध्येही प्रचंड गुणवत्ता, ऊर्जा क्षमता आहेत. फक्त त्यांना एक चॅनल देण्याची आवश्यकता आहे. त्याच अनुषंगाने मला तुमच्याशी संवाद साधायला खरोखरीच आवडेल. आर्टस्, कॉमर्स, सायन्स किंवा त्यापलीकडेसुद्धा बरेचसे कोर्सेस आहेत, करिअर्स आहेत, संधी आहेत त्या सर्वांचा मागोवा आपण पुढे घेणार आहोत. टेक्निकल कोर्सेस किंवा स्वयंरोजगार, उद्योजकता, गृहिणींसाठी करता येण्याजोगे करिअर अशा अनेकविध गोष्टींचा आस्वाद आपण लुटू शकता व आपलं करिअर निवडू शकता. गरज आहे ती स्व-अभ्यास आणि बाकी सांगितलेल्या गोष्टींची! श्रीकृष्णाने गोविंदासारखा खेळ खेळून संघ भावना, नेतृत्व, कर्तृत्व, खिलाडू वृत्ती आदी गोष्टींची सुरुवात केलीय.. तेव्हा तमाम मित्रांना गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा... कुठल्या ‘थराला’ जायचं हे तुम्ही त्या दिवशी ठरवणार पण कुठल्या करिअरला हे मात्र येत्या काही महिन्यांतच कळेल.. आमच्या हार्दिक शुभेच्छा आहेतच...


vilasgavraskar@yahoo.co.in