आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जर परमेश्‍वर आहे, तर असे का घडते?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखादी घटना घडणे ‘अयोग्य’ आहे, असे जसे वाटते; तसेच ते घडण्यामागे काहीतरी कारण असले पाहिजे, अशीही एक भावना असते आणि माणसाला अस्तित्वाचे भान आल्यापासून ती मानवी स्वभावात, त्याच्या विचारांत आणि जाणिवा-नेणिंवामध्ये खोलवर मुरलेली आहे; जणू एखाद्या घटनेला कारणाचे परिमाण लाभले की त्याला ‘अर्थ’ प्राप्त होणार असतो. परंतु काही घटना या मानवी सहवेदनेच्या, संवेदनांच्या आणि आकलनाच्याही पलीकडे असतात; त्या घटनांना सामावून घेणार्‍या अथांग विश्वाप्रमाणेच स्तिमित करणार्‍या. अशेष विश्वाचे भान येऊन विषाद मांडणार्‍या.

प्रस्थापित ‘अर्थ’ लावणार्‍या प्रक्रियेपलीकडल्या. अर्थातच ती प्रक्रिया शतकानुतके माणसाच्या अस्तित्वापासून विकसित आलेली आहे; किंबहुना जगाच्या भानातून व आत्मभानातून त्या सर्वांना सामावून घेणारे काहीतरी असावे, अशी जाणीव माणसाला होत गेली. त्यात माणसाच्या अपूर्णत्वाचे जसे भान होते, तसे घटनांचे अर्थही उमगू लागतात. तेथून सुरू होते ज्ञानाची प्रक्रिया. देवाच्या संकल्पनेचा व त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न हा ज्ञान व भानाच्या वास्तवाशी निगडित आहे. ‘काचेच्या गोलात बारीक तारा, ओतती रात्रीत प्रकाशधारा, तशीच माझ्या दिव्याची वात, पाहते दूरच्या अपारतेत, अथवा नुरले वेगळेपण, अनंत काही जे त्याचाच कण’या कुसुमाग्रजांच्या काव्यओळींप्रमाणे जाणीव वैश्विक होती व धर्म, धर्मसंस्था व धर्मगुरू यांनी त्यांचा ताबा घेतला; ते स्वाभाविक होते, कारण ज्ञानाची व्यवस्था अस्तित्वात नव्हती. अर्थातच त्यामुळे ते सर्व देव या संकल्पनेत आणणे व पर्यायाने त्याला धर्माची व्यवस्था देणे शक्य होते. आपल्या आजुबाजूच्या वास्तवाची कारणमीमांसा करण्याचा तो मार्ग होता; त्याला नैतिक अधिष्ठान दिल्याने तो अधिक बळकट झाला. सर्व जगात व संस्कृतीत कमी-अधिक प्रमाणात हीच परिस्थिती होती. माणसाच्या ‘अपूर्णत्वाची’ ती अपरिहार्यता होती. बाह्य जगाच्या होणार्‍या संवेदनांच्या जाणिवेपेक्षा ती अधिक मजबूत होती. आणि त्या अपूर्णतेतच ‘मुक्तीची’ बीजे होती.

15व्या शतकात युरोपात त्या जाणिवेने जोर धरू लागला होता. निकोलस कोपर्निकस नंतर गॅलिलिओने प्रस्थापित व्यवस्थांना धक्के द्यायला सुरुवात केली होती. अज्ञाताचा संपूर्ण प्रदेश पादाक्रांत करण्याऐवजी ज्ञाताच्या छोट्या भूभांगाचा वेध घेणे अधिक सोपे होते. आधुनिक विज्ञानाचा पाया तिथे रचला गेला. आपल्या आजूबाजूला घडणार्‍या घटनांचा साक्षेपी पद्धतीने वेध घेणे व प्रयोगाद्वारे त्या वारंवार सिद्ध करणे, या पद्धतीत एक अलिप्तता होती. त्यासाठी सर्वंकष ज्ञान असण्याची पूर्वअट नव्हती. वरून खाली पडणार्‍या वस्तूंचे निरीक्षण करून गणिती सिद्धांत प्रस्थापित करू पाहणार्‍या गॅलिलिओस विश्वात आढळणार्‍या सर्व गतिमान वस्तुमानांचे मापन करण्याची आवश्यकता नव्हती. एका ठिकाणी लागू न होणारा सिद्धांत जगात कुठेही त्याच पद्धतीने लागू होणार होता. त्या सिद्धांताला गणितीय सूत्रांची जोड होती. ते गणित अलिप्त होते, सर्वव्यापी होते आणि सत्याचा आविष्कार होते. गणितातून होणारी विश्वाची ‘जाणीव’ ही आधुनिक विज्ञानाची सुरुवात होती. अपौरुषेय परमेश्वराने ‘निर्माण’ केलेल्या विश्वाची भाषा गणित होती. 16व्या शतकात धर्माने बांधलेल्या देवाला गणिताने मुक्त करायला सुरुवात केली होती...

गणिताने धर्म नावाच्या सामूहिक संकल्पनेला धक्के दिलेच, पण देव-मनुष्य व विश्व या तीन बिंदूंना जोडणार्‍या त्रिकोणाची पुनर्मांडणी केली. देव विश्वात व्यापून राहिला होता हे खरे, पण त्याची जाणीव-नेणीव व रेणीवही माझ्यातल्या ‘मी’ला होत होती. कदाचित ती भावना सामूहिक असेलही, पण एका विशिष्ट अर्थाने तो ‘व्यक्तिगत’ धर्म होता. तार्किकदृष्ट्या सिद्ध करता येऊ शकणारी गणिती सूत्रे व प्रमेये हा त्याचा मंत्र होता व सर्व विश्वच व त्यातील वस्तू, प्राणीमात्र एका विशिष्ट नियमावलींनी वागत होते. 17व्या शतकात ज्या तत्त्ववेत्त्यांनी आधुनिक जगाचा पाया रचला, त्यात न्यूटन व डेकार्टस यांचे नाव आघाडीवर होते.
प्लेटोच्या तत्त्वज्ञानापासून सुरुवात झालेल्या शरीर आणि मन, आत्मा आणि शरीर यातील फरकाच्या पुनर्मांडणीने आता एक वर्तुळ पूर्ण केले होते. देवाची व्याख्या अजूनही सर्वव्यापी असली ती ‘मी’पणाच्या जगाबरोबरच्या नात्यात याचे स्थान फक्त आता अत्युच्च उंचीवरचे अज्ञात, अगम्य असले, तरी फक्त संदर्भाचेच होते. न्यूटनने गुरुत्त्वाकर्षणाचा सिद्धांत मांडून त्याला एक क्रांतिकारी वळण दिले. वरवर पाहता तो सिद्धांत दोन वस्तूंच्या आकर्षण, आवेग व अंतरावरील होता, तरी त्याचा विस्तार फिरणार्‍या वस्तू, वाहणारे द्रवपदार्थ, कंपणार्‍या वस्तू व अंतराळातील ग्रहतारे यांना लावणे शक्य होते. विद्युत चुंबकीय क्षेत्राचा शोध लागल्यानंतर न्यूटनच्या सिद्धांताचा वापर त्यावर होऊ लागला. माणसाच्या अनुभवाचे क्षेत्र त्यामुळे प्रचंड वाढले, निसर्गातल्या अंगभूत नियमांचे ज्ञान त्याला होऊ लागले व माणसाच्या कार्यकारणभावाला, कुतुहूलाला विज्ञानाचे सशक्त माध्यम मिळाले. घटनांना अधिक अर्थ प्राप्त होऊ लागला व आपण पूर्णत: पराधीन नाही, ही भावना बळावू लागली.

पुढची जवळजवळ दोनशे वर्षे या भावनेने विविध व्यवस्था उदयाला आल्या, नवेनवे शोध लागले, माणसाचे जीवन सुसह्य झाले, तरी अपूर्णतेची जाणीव मात्र कमी झाली नाही; माणूस आणि देवाचे नाते मात्र विलक्षण बदलले. न्यूटनने प्रस्थापित व्यवस्थांना सुरुंग लावलेच होते. पण माणसांच्या जाणिवेतही प्रचंड फेरफार केले होते. त्याच्या विचारांना दिशा दिली होती. त्याचा परिणाम इतर क्षेत्रात होणे स्वाभाविक होते. त्यामुळे माणसाच्या स्वत:च्या व समूहाशी असलेल्या नात्यांना विविध तणावातून जावे लागले होते. परंतु विश्व जर नियमबद्ध असेल तर माणसाच्या या तणावांनाही काही नियम असले पाहिजेत, या जाणिवेने जोर धरला होता. आणि त्या तणावातून ‘मुक्त’ करून अधिक स्वातंत्र्य मिळाले, तर मानवी समाजही ‘मुक्त’ व ‘स्वतंत्र’ होऊ शकेल, ही त्यामागे भावना होती.

19व्या शतकात उदयाला आलेले हेगेलचे तत्त्वज्ञान व पुढे कार्ल मार्क्सने त्याचे केलेले ‘क्रांतीचे’ विवेचन यांचा हाच पाया होता. माणसाचे मन व वैश्विक मन हे वस्तुत: एकच असून त्या अंतिम ध्येयासाठी, बंधनात असणार्‍या ‘व्यक्तिवादी’ मनाला मुक्त व्हावे लागेल. किंबहुना, इतिहास म्हणजे त्या सामूहिक मनाने केलेला तार्किक व आवश्यक प्रवास; व त्याने विशिष्ट नियमांच्या व्यवस्था निर्माण केल्या, तर हे शक्य आहे.’ त्यामुळे राजकीय व सामाजिक पातळीवर सैद्धांतिक व्यवस्थांचा (ङ्मिू३१्रल्ली२) उदय झाला.

फ्रेंच राज्यक्रांती व औद्योगिक क्रांती 16व्या शतकात झालेल्या व वैचारिक उलथापालथींचे सामाजिक पर्यवसान होते. तर्कशास्त्र, ज्ञानावर आधारलेली व्यवस्था व गणिती पद्धतींनी भाकीत करता येऊ शकतील, असे विश्वाचे नियम व त्यांनी पादाक्रांत केलेले हे भौतिकवादाचे नियम हे 20व्या शतकापर्यंतच्या जगाचे वैशिष्ट्य होते. अर्थातच त्या नियमांपासून मानवाचा जैवशास्त्रीय विकास व माणसाच्या मनाचा विकास दूर राहणे शक्यच नव्हते. मन म्हणजे जणू त्या भौतिक जगाच्या संवेदनांचा आरसा होता. त्यामुळे भौतिक जगाला असलेला कार्यकारणभाव मनाला लावणे शक्य होते. आधुनिक मानसशास्त्राचा उगम त्यातूनच झाला. त्याचबरोबर डार्विनच्या उत्क्रांतवादाचाही. म्हणजेच विश्वाचे नियम आता मानवी कक्षेत येऊ लागले होते. कोणतीही घटना त्या कार्यकारणभावाद्वारे स्पष्ट करणे शक्य होते. जणू त्या अज्ञात, अथांग विश्व नियमाने आपली सर्व गुपिते उघडी करायला सुरुवात केली होती. माणसाचे आणि ईश्वराचे संबंध पुन्हा एकदा आमूलाग्र बदलले होते; आता फक्त थोडाच अवधी बाकी होता!

chinmay.borkar@gmail.com
( या विषयावरील आपल्या प्रतिक्रिया, भाष्य आणि मते पत्ररुपाने वा इमेल द्वारे जरुर कळवावी.)