आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
सूक्ष्म नियोजन, उत्तम व्यवस्थापन आणि पुरेसा संयम या त्रिवेणी संगमात चिपळूणला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं घोडं न्हालं, या एकाच वाक्यात 86 व्या संमेलनाचं वर्णन चपखलपणे बसवता येईल. या संमेलनाने मराठी भाषेला, मराठी सारस्वतांना आणि मराठी रसिकांना काय दिलं, याचा काथ्याकूट पुढच्या साहित्य संमेलनापर्यंत होत राहील. त्यावर चर्चेच्या फैरीही झाडता येतील. ते काम करण्यासाठी मराठी भाषिक विद्वानांची कमतरता मुळीच नाही. त्यामुळे ती जबाबदारी त्यांच्यावरच सोपवून या संमेलनाकडे पाहायचं म्हटलं तर ठळकपणे काय समोर येतं?
* मराठी रसिकांचा भरभरून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद. थंडीचा कडाका प्रचंड वाढलेला असताना सकाळी साडेआठ वाजता साहित्य संमेलनाच्या मंडपात गर्दीचा प्रवाह सुरू व्हायचा आणि रात्री उशिरापर्यंत मंडप तुडुंब भरलेले राहायचे. हे चित्र अगदी उद्घाटन समारंभापासून समारोपापर्यंत कायम राहिलं.
*संमेलनपूर्व अनेक धमक्यांचे नगारे वाजवले गेले असले तरी संमेलनाच्या काळात टाचणीही पडली नाही. अत्यंत आनंदात आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता संमेलन पार पडलं.
*साहित्यावर चर्चा झाली; पण ती साहित्यबाह्य ओळख असलेल्या मंडळींनीच अधिक केली. नामवंत साहित्यिकांपैकी ज्यांना निमंत्रण दिलं होतं त्या मर्यादित यादीतल्या बहुतांश साहित्यिकांनी हजेरी लावली खरी; पण त्यांची नावे इतकी मर्यादित का ठेवण्यात आली, या प्रश्नाचं उत्तर रसिकांनाही मिळालं नाही आणि पत्रकारांनाही नाही.
*एवढी काठोकाठ रसिकता दिसत असतानाही पुस्तकांची विक्री आधीच्या तुलनेत कमीच राहिली.
हे सारं कसं आणि का घडलं असावं, याची उत्तरे शोधायला हवीत. या उत्तमात आणखी उत्तम काही करता आलं असतं. ते का केलं गेलं नाही, यावरही प्रकाश पडायला हवा आणि त्यातून पुढच्या आयोजकांनी काही गोष्टी शिकायलाही हव्यात. उदाहरणार्थ- रसिकांचा ओघ या संमेलनाकडे इतका प्रवाही का असावा? चिपळूणमध्ये याआधी 22 वर्षांपूर्वी साहित्य संमेलन झालं होतं. म्हणजे तब्बल एका पिढीचं अंतर. या अंतरानेच स्थानिक मराठी माणसाची उत्कंठा आणि उत्साह वाढवला असणार, हे उघड आहे. म्हणजे साहित्य संमेलनांमध्ये रसिकांचा प्रवाह हवा असेल तर दोन संमेलनांमध्ये एका पिढीचं अंतर असायला हवं, असा निष्कर्ष काढता येईल. सोप्या शब्दात सांगायचं तर संमेलनांचे आयोजकत्व वारंवार एकाच प्रांतात किंवा विशिष्ट शहरांमध्येच राहणार नाही, याची काळजी साहित्य महामंडळाने घ्यायला हवी. पुण्याभोवती संमेलन फिरतं राहणार नाही, म्हणजेच 87 व्या संमेलनासाठी पिंपरी-चिंचवडशिवाय दुसरं कुठलं लांबचं आमंत्रण येतंय का, हे चाचपडून पाहायला हवं.
धमक्यांचे नगारे वाजूनही संमेलनस्थळी मात्र टाचणीही पडली नाही, याचं श्रेय कोणाला द्यायचं? असं विचारलं तर सामान्य चिपळूणकरांपासून थेट शरद पवारांपर्यंत श्रेयनामावली वाढायला हरकत नाही. सामान्य चिपळूणकरांना श्रेय यासाठी की, छोट्या-मोठ्या वादापेक्षा, द्विपक्षीय वृथा अस्मितांपेक्षा साहित्य आणि साहित्यिकांविषयीच्या कार्यक्रमाला त्यांनी अधिक महत्त्व दिलं. शरद पवारांपर्यंत श्रेय जाण्याचं कारण असं की, धमकीचे नगारे वाजवणारे सारेच ‘त्यांचे’ होते. साहित्यिक लक्ष्मण माने यांनी तर उघडपणे पवारांच्या समर्थकाचा शिक्का व्यक्तही केला. ‘संभाजी ब्रिगेड’ च्या बाबतीत वेगळे काही सांगायची गरज नाही. आता संमेलनाच्या उद्घाटनालाच पवार येणार म्हटल्यानंतर कोणाची हिंमत होती संमेलन उधळून लावण्याची? अर्थात, संयोजन समितीने घेतलेली संयमी भूमिका, आवश्यक तिथे दोन पावलं मागे सरकण्याची दाखवलेली तयारी याचेही श्रेय आहेच. किती महत्त्व कशाला द्यायचं, हे शिकायचं असेल तर चिपळूण संमेलनाच्या आयोजन समितीकडून पुढच्या आयोजकांनी नक्कीच शिकायला हवं.
या संमेलनाला एका परिसंवादासाठी बोलावलेले विश्वास पाटील वगळले तर निमंत्रितांपैकी सर्वांनीच आवर्जून उपस्थिती लावली. मधू मंगेश कर्णिक हे कोकणातलेच लेखक. तरीही ते येणार नव्हते. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांची हजेरी लागली.
उत्तम कांबळे आणि कर्णिक हे माजी अध्यक्ष उद्घाटन समारंभापुरते हजर राहिले. रिसबूड अर्थात सुमेध वडावाला हेही वाचकांना ब-या पैकी माहिती असलेलं नाव. त्यांचा समावेश दोन कार्यक्रमांमध्ये करण्यात आला होता. असे काही सन्माननीय अपवाद वगळले तर मान्यवर लेखकांची नेहमीप्रमाणे संमेलनस्थळी वानवाच होती. त्यामुळे चिपळूणवासीयांची काही प्रमाणात निराशाही झाली असणार. अर्थात, असं करण्यात सर्वात मोठा वाटा असावा तो महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांचाच. नेहमी नावाजलेल्या लेखकांनाच बोलवायचं तर मग नव्या लेखकांची आपल्याला ओळख ती कशी होणार, असा प्रश्न त्यांनी थेट संमेलनाच्या व्यासपीठावरूनच रसिकांनाच विचारला. पुण्या-मुंबईत नका बोलावू, पण चिपळूणसारख्या लांबच्या ठिकाणी काय हरकत होती बोलवायला, असा प्रश्न एका रसिकाने हळूच विचारला होता. मुंबईच्या उषाताईंना ते कोण विचारणार?
निर्माता-दिग्दर्शक नितीन देसार्इंचा संमेलनावर जरा जास्तच प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीतले असतील-नसतील तेवढे मान्यवर मराठी भाषक निर्माते, दिग्दर्शक एका परिसंवादासाठी गोळा करून आणले होते. वाढलेल्या संख्येने एक झालं, कोणालाच पुरेसं बोलता आलं नाही. त्यात लेखक असलेले भडकमकर बिचारे एकटेच पडले. त्यांच्यावर निर्माते आणि दिग्दर्शकच हावी झाले होते. संयोजन समितीतल्या माइकधारी पदाधिका-या ंनी त्यांना जे महत्त्व देणं चालवलं होतं, ते खटकणारं होतं.
या संमेलनावर राष्ट्र वादीचे मंत्री सुनील तटकरे यांचा प्रभाव राहिला. कारण संमेलनाचे ‘कर्ते-करविते’ तेच होते. चिपळूण ज्या रत्नागिरी जिल्ह्यात येतं तिथले पालकमंत्री भास्कर जाधव यांना संमेलनाचं स्वागताध्यक्ष करण्याऐवजी आयोजकांना पटवण्यात लांबच्या रायगडचे सुनील तटकरे यशस्वी झाले. केंद्रीय मंत्री शरद पवार यांचेच ते पत्ते होते, हे नंतर उघड झालं. पवारांनी व्यासपीठावर येऊन कै. बाळासाहेब ठाकरेंविषयी सकारात्मक विधान करणे, गाजणा-या परशुरामाच्या विषयावर ब्र शब्दही न काढणे, पवारांनंतर उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावणे आणि काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसह नारायण राणेंनीही संमेलनावर अघोषित बहिष्कार टाकणे याचा अर्थ राजकारणाच्या पातळीवर काय निघायचा तो निघतो आहेच.
संमेलनाच्या समारोपाला आणि मधे-मधेही सांस्कृतिक कार्यक्रम झाले. हे सर्व कार्यक्रम दूरदर्शनच्या पडद्यावर नेहमी पाहायला मिळतात तसेच होते. राज्यभरातून आलेल्या मराठी सारस्वतांना कोकणच्या कोकणी, मालवणी भाषेची मेजवानी देणारा एखादा कार्यक्रम सहज करता आला असता. त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही.
कोकणातल्या पर्यटनस्थळांचं थोडंही मार्केटिंग कुठेच दिसलं नाही. नाही संमेलनस्थळी, पण संमेलनाबाहेर, बसस्थानकाजवळ, रेल्वेस्थानकाजवळ, रस्त्यात कुठेही कोकणच्या पर्यटनाची माहिती सहज उपलब्ध करून दिली असती तर कोकणच्या पर्यटनाला थोडा तरी लाभ नसता का झाला, असा प्रश्न सहज मनात येत होता.
अर्थात, या छोट्या छोट्या गोष्टी सोडल्या तर 86 वं हे संमेलन नीटनेटकं, टापटिपेचं आणि व्यवस्थित पार पडलं, याविषयी वादच नाही. हा ‘कोकणस्थ’ बाणा संमेलनात दिसला नसता तरच आश्चर्य वाटलं असतं.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.