आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुर्लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


आता मात्र माझाच दृष्टिकोन बदलला होता. मला स्वत:चीच लाज वाटायची. ज्या गोष्टीकडे मी अतिशय निरागसतेने बघायचे, तिला नुसता आनंदच नाही तर माझ्या मैत्रिणीनेही नात्याचं नाव दिलं होतं. सारखं मी फार घोर पाप केलंय असं वाटायचं. दरम्यान, बानी कुठलं काम सांगितलं की जिवावर यायचं. पहिली नजर आनंदकडे वळायची. तो डोळे मिचकावत जे काही हावभाव करायचा त्यातून हे स्पष्ट कळायचं की अंड्या मला चिडवतोय. मग मीही बाहेर पडल्यावर नेहमीच्या गतीपेक्षा जोरात चालायचे. जणू क वर्ग यायलाच नको असं वाटायचं. ही बिल्डिंग अशी बांधणा-या चा राग यायचा. कारण क वर्गावरून न जाता ऑ फिसमध्ये जायचा काही मार्गच नव्हता. क वर्गाजवळ आलं की सगळे 120 डोळे आपल्यालाच न्याहाळताहेत आणि हात तोंडावर धरून सूचक हसताहेत असं वाटायचं. प्राजक्ताच्या एका सरळ प्रश्नाला आनंदने दिलेल्या वाकड्या प्रतिक्रियेचे हे सारे परिणाम होते. हळूहळू मी परत जुन्या जगात आले. परत पूर्वीसारखा माझ्याच वर्गातल्या मैत्रिणीसोबत डबा खाऊ लागले. राकेशविषयी बोलणं जाणूनबुजून टाळू लागले. विषय तिकडे जायला लागला तर, अगदी क वर्गाचा विषय निघाला तरी, विषय दुसरीकडे वळवायला लागले. दोन गोष्टी मात्र कधीच थांबल्या नाहीत त्या म्हणजे आनंदचं चिडवणं आणि माझ्या मनाचं युद्ध!

तुला काय करायचंय आनंद आणि बाकीचे काय म्हणताएत त्याचं? - मी
जा एक सणसणीत लगावून दे त्या अंड्याच्या कानाखाली - दुसरी मी
अशी अनेक संतप्त विधानं माझं मन करायचं. पण आताशा मनाशी भांडायची हिंमत राहिली नव्हती. अशी आणीबाणीची परिस्थिती असताना शाळेचं गॅदरिंग येऊन ठेपलं. वाटलं, चला तेवढाच विरंगुळा या सा-या तून! पण हा विरंगुळा फार महागात पडणारे याची पुसटशीदेखील जाणीव मला नव्हती.

सालाबादप्रमाणे या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची आखणी करायची आहे. प्रत्येक वर्गाने मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन आपल्या कलागुणांना सादर करावे. कार्यक्रम ठरवून नावांची यादी श्री. पाठक सर यांच्याकडे दिनांक 10 जानेवारीच्या आधी द्यावी.'

हं.. कोण कोण सहभागी होणारेय. शारदाकडे नावं द्या. इतर वर्गातल्या मुलामुलींशी मिळून केलं तरी चालतंय. शारदा, यादी आधी मला दाखव.
बानी गॅदरिंगची सूचना वाचली आणि एकदाचं लक्ष दुस-या विषयावर वळलं. स्नेहसंमेलन हा माझ्यासाठी फार जिव्हाळ्याचा विषय होता. अंगात चैतन्य सळसळायचं. कोणाचा नाच, कोणाचं भाषण, कोणाचं गाणं, कोणाचं नाटक, कोणाचा सत्कार, बक्षीस वितरण, आदर्श विद्यार्थी, आदर्श वर्ग, आदर्श खेळाडू, हस्तलिखित प्रकाशन कित्ती सा-या रम्य गोष्टी असतात गॅदरिंगच्या दिवशी. आणि त्याआधीचे दोन रम्य फुलपाखरी आठवडे. तयारी. धावपळ. नव्या नव्या आयडिया. नवे नवे मित्र. नव्या नव्या ओळखी. आणि सगळ्यात मोठं, आपल्यातल्याच लपून बसलेल्या नव्या नव्या गुणांची ओळख.
शिक्षकांसकट विद्यार्थीही वर्गाबाहेर. या दिवसांत वर्गांमधे दंगा झाला तरी कोणी ओरडायचं नाही. मुख्य इमारतीच्या खाली असलेल्या तळघरातल्या वर्गांमधे सगळी प्रॅक्टिस चालायची. एका वर्गात नाचाची, एकात गाण्याची, एखाद्यात नाटकाची तालीम तर एखाद्यात कार्यक्रमांचा क्रम ठरवणारी शिक्षक मंडळी बसलेली असायची. मधे मुलं दारं लावून प्रॅक्टिस करायची आणि बाकीचे आगाऊ प्रेक्षक म्हणजे सहभाग न घेतलेले विद्यार्थी मिळेल तिथून हे सगळं बघण्याचा प्रयत्न करत. मग एखाद्याच्या खांद्यावर उभं राहून तर कधी कुठल्या तरी खिडकीतून. गुरव बाई फार ओरडायच्या या अधीर नमुन्यांना. पण तेवढंच हसायच्याही त्यांच्यावर.

इतर दिवसांत फारसं वापरलं न जाणारं तळघर गॅदरिंगच्या वेळी मात्र जिवंत झाल्यागत वाटायचं. माधव हा शिपाईदादा वाजवणा-या घंटेची तर कुणाला शुद्धच नसे. कारण प्रत्येक तास हा जवळजवळ मधली सुटीच असायचा! तरीही माधवदादा अगदी प्रामाणिकपणे घंटा द्यायचा. तो जेवढा गरीब होता त्याहून जास्त प्रेमळ होता.
मी गीतमंचात होते आणि पेटी वाजवायचे, त्यामुळे सकाळच्या प्रार्थनेच्या वेळेला माधवदादा माझा मदतनीस असायचा. ऑफिसच्या समोर टांगलेल्या घंटेखाली माधवदादा एखाद्या खांबासारखा उभा असायचा. गडद आकाशी शर्ट आणि खाकी पँट अशा नेहमीच्या स्वच्छ पेहरावात माधवदादा येणा-या - जाणा-या शिक्षकांना गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून वगैरे ठोकायचा. प्रॅक्टिसच्या वेळी मी यायच्या आधीच टेबलवर पेटी मांडून ठेवायचा. साफसूफ करून ठेवायचा. कधी-कधी कुतूहलाने वाजवायचाही! आता गॅदरिंगच्या प्रॅक्टिसलाही त्याने बिगीबिगी पेटी आणून दिली आणि बाजूला जाऊन उभा राहिला. पेटीवर मी, तबल्यावर पाठक सर आणि गाणा-या मुली, असा आमचा ऑर्केस्ट्राच तयार व्हायचा. एकदा तळघरात आमची गाण्याची प्रॅक्टिस सुरू असताना राकेश आला. मी गोंधळले, घाबरले. हा का आला इथे? चट्कन आजूबाजूला कुठे आनंद नाही नं हे पाहिलं..

ओह राकेश आला.. ए केस नीट कर पटकन - मन म्हणालं. सर, मला नाटक करायचंय. माझ्याकडे स्क्रिप्ट आहे एक. मस्त विनोदी. टॉम आणि टॉमी. हे पाहा. फक्त सोबत कुणीतरी लागेल. कारण नाटकात दोन पात्रं आहेत.
पाठक सरांनी नाटकावर एक नजर टाकली. तसं मीही दोन-तीन वेळा नाटक केलं होतं आणि त्याला बक्षीसही मिळालं होतं. माझा अभिनय तसा बरा होता असं मैत्रिणी, बाई, दादा सगळे म्हणत. पण पेटीच्या नादात तिकडे लक्ष देत नव्हते. आज मात्र राकेशच्या नाटकासाठी सरांनी माझं नाव सुचवावं अशी माझी खूप इच्छा होती.
अगं सरांची वाट पाहू नको.. स्वत:च सांग मी करते असं -मन
नको.. इतरांना संशय येईल, मी कर... कर हात वर! मन
अरे कर यार! म्हणणारे दोन्हीकडून म्हणतात. -मन
अरे गप्प बस ना येडपट. सरांना स्वत: म्हणू दे. नाही तर सगळे मला परत बोलतील. - मी
हं चोराच्या मनात चांदणं म्हणतात ते हेच. आणि म्हणे राकेश चांगला मित्र आहे. -मन.
आमचा संवाद चालू होता तोवर सरांनी राकेशला मनीषा परांजपेचं नाव सुचवलं. माझी आतडी पिळवटून निघाली. राकेशसोबत काम करण्याची संधी त्या मनीषाने काहीही न करता कशी हिरावून नेली हे चिडवून गेलं.
बघ बघ! सांगत होते स्वत: भाग घे. ऐकत नाही अजिबात. मूर्ख -मन त्यानंतर थोडा वेळ राकेश तिथेच थांबला. मी अजून ऐटीत उभी राहिले. चेह-या वर एका तरबेज गवयासारखे हावभाव आणण्याचा प्रयत्न केला. अगं ओव्हरअ‍ॅक्टिंग करू नको. इंप्रेशन पडायच्याऐवजी तूच पडशील त्याच्या मनातून. -मन
तो दिवस खूप चांगला गेला. राकेश पुढे रोज प्रॅक्टिस चालू असताना येऊ लागला. मनीषा आणि राकेशला एकत्र पाहून मनात ज्वालामुखी फुटायचा.
आणि मग हे कसे माझ्याच मूर्खपणाचे परिणाम आहेत, हे माझं मन मला सांगायचं. असेच दिवस जात राहिले. तालमी होत राहिल्या. कामांना गती आली. कार्यक्रमपत्रिका तयार झाली. स्टेज आणि शाळा सजली. आता सगळे फक्त गॅदरिंगच्या दिवसाची वाट पाहत होते.

avkpd08@gmail.com, esahity@gmail.com