आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बा.सी.मर्ढेकरांच्या स्मारकाची दुरवस्था

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केशवसुतांनंतर युगप्रवर्तक कवी किंवा नवकवितेचे आद्यप्रवर्तक म्हणून ज्यांचा सन्मान केला जातो; त्या कविवर्य बा.सी.मर्ढेकर यांचे मर्ढे येथील स्मारक अद्याप पूर्णत्वाच्या, उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. या वर्षी तरी हे स्मारक पूर्ण होणार का, हा मढ्याच्या ग्रामस्थांचा प्रश्न आहे.

बासींचा जन्म खान्देशातील फैजपूरचा. धुळ्याला शिक्षण, तर तत्कालीन आयसीएस परीक्षेसाठी त्यांनी आंग्ल भूमीकडे प्रयाण केले. दुस-या महायुद्धाच्या वातावरणाचा, परिस्थितीचा त्यांच्या मनावर परिणाम झाला. त्यांच्या काव्याला वेदनेचे काव्य असे संबोधण्याचे कारण युद्धाचा त्यांच्या लिखाणावर झालेला परिणाम. आशय आणि अभिव्यक्तीचा संवाद त्यांच्या काव्यात दिसून येतो तो यामुळेच! अशा या प्रतिभावान बासींचे मूळ गाव मर्ढे. सातारा येथून 19 कि.मी अंतरावर. गावात श्री सिद्धामृत मठ आहे, त्याची देखभाल त्यांच्या पूर्वजांकडे होती. रामदासी असणा-या मर्ढेकरांचे मूळ आडनाव गोसावी; पण कालांतराने मर्ढे या गावावरून त्यांनी मर्ढेकर हे आडनाव स्वीकारले. या मठात त्यांची मूळ वास्तू आहे. या वास्तूची अवस्था अत्यंत दयनीय आहे. पावसाळ्यात येथे मोठ्या प्रमाणावर ओल येते. राहणे अवघड होते. गावाने फरशी घातल्याने सारवणे वाचले; पण ही वास्तू त्यांच्या नातेवाइकांनी ताब्यात घ्यावी, अशी कळकळीची विनंती मर्ढेकरांच्या वास्तूची देखभाल करणा-या हिराबाई लक्ष्मण निकम करतात. हिराबाईंच्या आई-वडिलांवर बासींच्या आई-वडिलांचा लोभ. त्यामुळे त्यांनी या घराची देखभाल त्यांच्याकडे सोपवली. मात्र, आता हिराबाईंना वयोमानाप्रमाणे ही देखभाल करणे अवघड झाले आहे. बासींचा मुलगा राघव या घराकडे फिरकत नाही. दोन-तीन महिन्यांनी हजार रुपये पाठवतात; पण त्यात घरपट्टी भागत नाही. त्याऐवजी मला या जबाबदारीतून मुक्त करा, अशी हिराबाईंची मागणी आहे.

बासींचे शेजारी बाळासाहेब शिंगटे यांनी आपण बासींच्या गावचे रहिवासी असल्याचा अभिमान व्यक्त केला; पण शासनाने अद्याप रेंगाळत ठेवलेल्या स्मारकाबद्दल नाराजी व्यक्त केली. बासींच्या घराच्या चौकटीवर आजही अनेक जण माथा टेकतात. ते पाहिले की त्यांची महानता समजते आणि मी त्यांचा शेजारी असल्याचा आनंद, अभिमान वाटतो, असे शिंगटे सांगतात. बळीभाऊ श्ािंगटे यांना बासींचा सहवास लाभलेला. बासींच्या, किती तरी दिवसांत नाही चांदण्यात गेलो... या कवितेच्या निर्मिती अवस्थेचे सहयोगी.. बासी नदीच्या काठावर बसले असताना त्यांना पोहायला बोलावले, पण ते आले नाहीत. ते म्हणाले, मी कविता करतोय. आम्ही फारसे ध्यान दिले नाही. मग त्यांनी किती तरी दिवसांत ..ही कविता वाचून दाखवली. आज त्याच्या पहिल्या ओळी आठवतात, असे सांगताना, तो खूप प्रेमळ माणूस होता, असे आवर्जून सांगतात.
महामार्गालगत असलेल्या मर्ढे येथील त्यांच्या स्मारकाचा प्रस्ताव अनेक वर्षे रखडला होता. सातारा येथे साहित्य संमेलन झाल्यावर त्याला गती आली. तत्कालीन आ. अभयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. आज 47 लाख 50 हजार रुपयांचे हे स्मारक थोडक्यासाठी अडकले आहे, 10 टक्के काम पूर्ण व्हायचे आहे. या गावचे नोव्हेंबरपर्यंत सरपंच असलेले अरविंद शिंगटे यांनी स्मारकाचे काम 85 टक्के पूर्ण झाले आहे. एकूण 47 लाख रुपयांचा निधी मिळाला; पण आता किरकोळ काम पूर्ण करावे तसेच यापुढे देखभालीसाठी शासनाने निधी द्यावा, अशी मागणी केली. स्मारकाचे डिझाइन ‘मौज’चे संपादक अनिरुद्ध कुलकर्णी यांचे चिरंजीव उदयन यांनी केले आहे.

स्मारक सुमारे सहा खोल्या आणि एका मोठ्या सभागृहासह पूर्णत्वाच्या मार्गावर असताना असा हलगर्जीपणा का? भंगू दे काठीण्य माझे, किती तरी दिवसांत, गणपत वाणी, पिपात पडले.. यांसारख्या आशयघन कविता लिहिणारे मर्ढेकर आणि त्यांच्या स्मारकाची दुरवस्था का, असा प्रश्न मर्ढे येथील ग्रामस्थांच्या मनात आहे.